#InnovativeMinds ‘जुगाड’ म्हणजे इनोव्हेशन नव्हे!

Abhay-Jere
Abhay-Jere

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही जागर करीत आहोत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा आणि नवकल्पनांचा. मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुकर करण्यासाठी या इनोव्हेशनचा, नवकल्पनांचा उपयोग कसा करता येईल, हे तुम्हाला जाणून घेता येईल. यासंदर्भात तुमच्याकडेही काही कल्पना व समस्या सोडविण्यासाठीची उत्तरे असल्यास आम्हाला कळवा.

आम्हा भारतीयांना आपला भूतकाळ व त्या काळातील विज्ञानाचा आधार असलेल्या संस्कृतीबद्दल अभिमानाने बोलायला खूप आवडते. आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी मांडलेल्या संशोधनविषयक संकल्पना आणि गृहितके याबद्दल आपण उच्च स्वरात बोलतो. दुय्यम व तळागाळातील लोकांसाठी केल्या गेलेल्या संशोधनाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि आपण त्याला ‘जुगाड’ म्हणतो. मात्र संशोधनाच्या एवढ्या मोठ्या परंपरेबद्दल अभिमानाने बोलणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात सर्वांना हादरवून सोडेल अशी एकही कल्पना मांडलेली नाही, हा खूप मोठा विरोधाभास आहे. आपली सर्जनशीलता मोठ्या काळापासून गोठून गेल्यासारखीच स्थिती आहे. अमित बालोनी यांनी या स्थितीचे यथार्थ वर्णन करताना लिहिले आहे, ‘जग मानवजातीसाठी उपयुक्त आणि विविधांगी नवकल्पना साकारत असताना, आपण आपली भूक फारसा आधार नसलेल्या ‘शून्य’, ‘पुष्पक विमान’ आणि त्यांसारख्या फारशा प्रभावशाली नसलेल्या ‘जुगाडां’वर भागवीत आहोत.’ 

मला २०१२मध्ये अशी खात्री पटली, की भारताला वैश्‍विक ‘इनोव्हेशन’चे आगार बनायचे असल्यास एक चळवळ उभी करावी लागेल. त्यातून आपल्या समाजाला जागृत करून इनोव्हेशनचे महत्त्व पटवून द्यावे लागेल.

‘इनोव्हेशन आणि उत्तम होण्यासाठीची तळमळ’ ही संस्कृती समाजामध्ये नव्याने रुजवावी लागेल. याची सुरवात आम्ही पुण्यामध्ये ‘सकाळ मीडिया ग्रुप’च्या सहकार्याने करण्याचा निर्णय घेतला. या चळवळीची सुरवात करण्यासाठी आम्ही काही चांगल्या भारतीय संशोधकांच्या कामाला दर आठवड्याला ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व मान्यताप्राप्त संशोधकांना पुण्यात आमंत्रित करून त्यांचे संशोधन शालेय विद्यार्थी व नागरिकांसमोर सादर करण्यात आले. आमच्या या उपक्रमाला मोठे यश मिळाले आणि आम्ही १४० संशोधकांना एक लाखापेक्षा अधिक लोकांसमोर आणले. 

आम्ही सुरवातीला या संकल्पनेवर विचारविनिमय करीत असताना माझ्या सहकाऱ्यांनी त्याला ‘जुगाड मेळा’ किंवा ‘फ्रूगालोव्हेशन’ (फ्रूगल आणि इनोव्हेशन यांचे संकर) असे नाव सुचविले. मी ताबडतोब या दोन्ही सूचना नाकारल्या. माझ्या मते, जुगाड हे काही इनोव्हेशन नाही. ते केवळ जोडकाम आहे. काम पूर्ण करण्याचा हा खूपच कच्चा मार्ग आहे आणि त्याचे योग्य मोजमापही होत नाही. 

जुगाड हे स्थानिक मर्यादांवर 
मात करण्यासाठीचे काम असून, बहुतांश वेळा ते तंत्रज्ञानदृष्ट्या किरकोळ आणि अपरिपक्व असते. दुर्दैवाने, भारतीय ‘जुगाड’ची तुलना इनोव्हेशनशी करतात.

माझ्या मते इनोव्हेशनकडे पाहण्याचा हा सर्वांत भ्रष्ट मार्ग आहे. जुगाडमध्ये बऱ्याचदा ग्राहकाच्या सुरक्षेचे निकष पाळले जात नाहीत आणि ते खूपच धोकादायक ठरू शकते. 

उदाहरणार्थ, गाजलेला हिंदी चित्रपट ‘थ्री इडियट्‌स’मध्ये रॅंचो (आमीर खान) बाळाला जन्म देण्यासाठी व्हॅक्‍यूम क्‍लीनरचा उपयोग जुगाड म्हणून करतो. ही मुलाला जन्म देण्याची आदर्श पद्धत असू शकते का? ती सुरक्षित आहे का? याचे उत्तर अर्थातच ‘नाही’ असेच आहे. 

(लेखक  भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com