सोशल मीडियावरचं गाजलेलं... (बिपीन कुलकर्णी)

सोशल मीडियावरचं गाजलेलं... (बिपीन कुलकर्णी)

सगळ्यांना धन्यवाद...
नुकतीच तव्यावरून काढलेली कुरकुरीत रचना. मंगेश पाडगावकर यांच्या ‘सलाम’चा यावर प्रभाव आहे, अशी कुरकुर तुम्ही करण्याआधी मीच तो तसा असण्याची कबुली देतो.
***
डावा इंडिकेटर दिल्यावरही डावीकडून ओव्हरटेक करणाऱ्याना धन्यवाद
फोनवर बोलत, मेसेज टाइप करत गाडी चालवणाऱ्यांना धन्यवाद
‘वन-वे’मध्ये उलट्या बाजूने घुसून पुन्हा आपल्यालाच लाइट ‘फ्लॅश’ करणाऱ्यांना धन्यवाद
लाल सिग्नलला स्वतः न थांबता, जे थांबले आहेत त्यांना सतत हॉर्न देणाऱ्यांना धन्यवाद
गावातल्या गावात ‘अप्पर’ टाकून फिरणाऱ्यांना धन्यवाद

‘हवा येऊ द्या’ला धन्यवाद, टीव्हीवर स्पर्धांमध्ये खोटे-खोटे कौतुक करणाऱ्या जज्ज लोकांना धन्यवाद
जगातल्या कोणत्याही विषयावर चर्चा करणाऱ्या टीव्हीवरच्या एक्‍स्पर्ट लोकांना धन्यवाद
कुणालाच बोलू न देता स्वतः किंचाळून किंचाळून चर्चा करणाऱ्या ‘अँकर’ लोकांना धन्यवाद
रवाळ, तुपाळ ‘गुऱ्हाळ’ चालवणाऱ्याना पण धन्यवाद
हिंदी सिनेमाच्या पॅकवर जास्तीत जास्त डब केलेले ‘डबडे’ मद्रदेशीय सिनेमे दाखवणाऱ्यांना धन्यवाद
जाहिरातीचा अतिरेक करून चांगला सिनेमासुद्धा ‘डोक्‍यात’ जाईल याची दक्षता घेणाऱ्या वाहिन्यांना धन्यवाद

‘बेन हर’पासून ‘गोलमाल’पर्यंत क्‍लासिक सिनेमांचे रिमेक करून मातेरे करणाऱ्यांना धन्यवाद
‘लैला मैं लैला’पासून ‘हम्मा हम्मा’पर्यंत जुन्या गाण्यांची वाट लावणाऱ्या भिडूंना धन्यवाद
अतीव खोटे प्रेम दाखवणाऱ्या जोहर-चोप्रा मंडळींना धन्यवाद, इतिहासाशी संबंध नसलेले ऐतिहासिक कपडेपट बनवणाऱ्या भन्साळींना धन्यवाद, फॉर्म हरवलेल्या भांडारकर आणि गोवारीकरांना ‘कर जोडून’ धन्यवाद
श्रद्धा कपूरला ‘सेक्‍सी’ आणि सनी लिओनीला ‘क्‍युट’ दाखवू पाहणाऱ्यांना धन्यवाद
तुषार कपूरपासून टायगर श्रॉफपर्यंतच्या खानदानी ‘न-अभिनेत्यां’नाही धन्यवाद

रोज नवे नोटिफिकेशन काढणाऱ्या आरबीआयला धन्यवाद. त्याचे खच्चून समर्थन करून वात आणणाऱ्या लोकांना पण धन्यवाद
एकच एक बाजू लावून धरून दुसरी बाजू नेहमी चुकीचीच असते, असे समजणाऱ्या लोकांना धन्यवाद
सोशल मीडियावर उच्छाद मांडणाऱ्या लोकांना धन्यवाद
सोनोग्राफीत दिसणारे बाळ मुलगा आहे की मुलगी, हे फर्ड्या इंग्रजीतून विचारणाऱ्यांना धन्यवाद
वीस लाखांची कार, सत्तर-ऐंशी हजारांचा फोन, एक हजार रुपयांच्या अंडरवेअर वापरताना डॉक्‍टरच्या कन्सल्टेशन फीमध्ये मात्र पन्नास-शंभर रुपयांची घासाघीस करणाऱ्यांना धन्यवाद
मला प्रिय असणारी मूल्ये जपणाऱ्यांना धन्यवाद, न जपणाऱ्याना पण धन्यवाद
मला सहन करून बऱ्याच काळापासून मित्र यादीत असणाऱ्यांना धन्यवाद , मला ‘अनफ्रेंड’, ‘ब्लॉक’ करून गेलेल्यांना पण धन्यवाद
तुम्हाला धन्यवाद, मला धन्यवाद, या धन्यवाद शब्दालासुद्धा
धन्यवाद !!!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com