‘बचपन बचाओ’ (पांडुरंग कुंभार)

‘बचपन बचाओ’ (पांडुरंग कुंभार)

पाच-सहा दिवसांपूर्वी, मला थोडा फावला वेळ मिळाला होता, म्हणून सहजच मी घरात टीव्ही पाहत बसलो होतो आणि अचानक अंगावर काटा आणणारी एक बातमी माझ्या नजरेसमोर आली.

भारतातल्या प्रत्येक राज्यातून दर वर्षी साधारणपणे तीन ते चार हजार लहान मुलं हरवली जातात. लहान मुलांना चोरी करणं किंवा भीक मागणं अशा कामाला लावलं जातं, तर मुली मोठ्या झाल्यावर त्यांना वेश्‍याव्यवसाय करायला भाग पाडलं जातं. ती बातमी पाहून माझ्या काळजाचं अगदी पाणी-पाणी झालं. अचानक माझं मन दहा वर्षं पाठीमागं गेलं.

सकाळचे आठ वाजले होते. आमची गाडी दौंड स्टेशनवर येऊन पोचली होती. अगदी तासाभरात पुणे स्टेशन येणार होतं. तितक्‍यात कुठून तरी ढोलकी वाजल्याचा मला आवाज आला. माझं तिकडं लक्ष गेलं.

चार-पाच वर्षांचं, नजर लागावं इतकं सुंदर, गुटगुटीत आणि गोरंगोमटं पोर माझ्या नजरेस पडलं. मळकट जीन्स आणि अगदी साधासा टी-शर्ट त्यानं अंगात घातला होता. त्याच्या ओठाच्या वरच्या बाजूस, स्केचपेनच्या साह्यानं पातळशा मिशा कोरल्या होत्या. लिपस्टिकच्या साह्यानं, त्याचे कळकटलेले गाल बळेच लाल करण्यात आले होते. ते मूल अतिशय गोरंपान असल्यानं त्याच्या गालावर असणारे काही कळकट डाग माझ्या नजरेतून सुटत नव्हते. त्याचे पाणीदार डोळे मला जागेवर खिळवून ठेवत होते आणि कोड्यातसुद्धा पाडत होते. त्या मुलाच्या पाठोपाठ, एक तिशीतली काळीकुट्ट बाई छोटीशी ढोलकी वाजवत त्या मुलाच्या मागोमाग चालत पुढं येत होती. त्या बाईला पाहून कोणत्याही प्रकारे तो तिचा मुलगा वाटत नव्हता. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. हा नेमका काय प्रकार असावा? हे मूल नेमकं त्या बाईचंच असावं का, की लहानपणी त्याला कुठून तरी चोरलं वगैरे असावं?...अशा नानाविध प्रश्नांनी मला अगदी भंडावून सोडलं. ते गोड बाळ, गालातल्या गालात हसत भीक मागत चाललं होतं आणि नकळत माझ्या डोळ्यांत अश्रूंची दाटी झाली होती. बघता-बघता ते लहान बाळ माझ्या नजरेआड झालं आणि पुढं थोड्या वेळात पुणे स्टेशनसुद्धा आलं. मी गाडीच्या बाहेर पडलो आणि घरी पोचलो.

तेव्हाचा तो लहान मुलगा आज पंधरा वर्षांचा झाला असावा. आज तो काय करत असेल, ते परमेश्वरच जाणे. त्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर टीव्हीवरची ती बातमी पाहून माझं मन थोडं सुखावलं- कारण त्यात सांगत होते, की जन्मणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचं एका वर्षांनंतर ‘आधार कार्ड’ काढून ठेवा. त्यामुळं ते मूल हरवलं किंवा चोरीला गेलं, तरी ते आपल्याला सापडू शकतं.

या ठिकाणी मी सर्व वाचकांना एक गोष्ट सांगू इच्छितो. दहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत जो प्रसंग घडला होता, तसा प्रसंग अन्य कोणासोबत घडला, तर इतर लोकांची मदत घेऊन, त्या संशयित मुलासोबत पोलिस केंद्रात दाखल होऊ शकता. त्या लहान मुलाचं आधी कुठं आधार कार्ड काढलं गेलं असेल, तर त्या मुलाची खरी माहिती आणि ओळख आपल्याला नक्कीच मिळू शकेल. ते मूल चोरीचं असेल, तर त्या गुन्हेगाराला शिक्षा तर होईलच आणि त्या लहान मुलाला त्याचं घर परत मिळेल. त्यामुळं तुमच्या घरातल्या, शेजारच्या किंवा ओळखीतल्या प्रत्येक लहान मुलाचं ‘आधार कार्ड’ तुम्ही तातडीनं काढून घ्या आणि भविष्यात घडू शकणाऱ्या नको त्या गोष्टींपासून चिंतामुक्त व्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com