कबड्डी कोट्यधीश झाली!

शैलेश नागवेकर
रविवार, 28 मे 2017

अस्सल देशी खेळ असलेल्या कबड्डीला आता ‘प्रो कबड्डी’च्या माध्यमातून ग्लॅमर प्राप्त होत आहे. प्रो कबड्डीच्या नव्या लिलावात १२ संघांच्या संघमालकांनी मिळून ४७ कोटी रुपये कबड्डीपटूंवर खर्च केले आहेत. या संघमालकांमध्ये अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रूवाला हे तर आधीपासून आहेतच; पण आता जिंदाल, अदानी, जीएमआर उद्योग समूह आणि दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकरही आहे! आता क्रिकेटलाही प्रो कबड्डीची भुरळ पडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. भारतातला पहिल्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ आणि जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू जर कबड्डीसाठी पैसा देत असेल, तर नक्कीच या खेळात आणि खेळाडूंमध्ये दम आहे. मात्र, प्रो कबड्डीच्या ग्लॅमरमध्ये धन्यता न मानता ‘भारतीय कबड्डी फेडरेशन’नं या संधीचा फायदा घेत ऑलिम्पिकप्रवेशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तरच कबड्डीचा दम ऑलिम्पिकमध्ये घुमेल. प्रो कबड्डीच्या लिलावांच्या निमित्तानं या देशी खेळाच्या बदलत्या रूपाचा हा वेध...

रोमांचकारी अंतिम सामन्यानंतर आयपीएलचा पडदा पडला आणि दुसऱ्याच दिवशी प्रो कबड्डीच्या लिलावाचा पडदा वर गेला. आपल्या देशात सध्या दोन खेळांची मोठी चलती आहे. त्यातला पहिला अर्थातच क्रिकेट आणि दुसरा खेळ प्रो कबड्डी. या दोन्ही खेळांच्या स्पर्धांचा विचार केला तर सध्या क्रिकेट संपलं आहे आणि कबड्डीचा दम घुमणार आहे. या आठवड्याच्या सुरवातीला झालेला लिलाव ही त्याची रंगीत तालीम होती.

क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांनी आपल्या देशात आणला; परंतु आपल्या मातीतल्या कबड्डीनं घेतलेली मोठी झेप अफलातून आहे. काही वर्षांपूर्वी कबड्डी हा खेळ साधारणतः ग्रामीण भागापुरता मर्यादित होता; पण आता ‘प्रो’ नावाचं चकचकीत कोंदण लाभलेल्या या खेळाचे सामने जेव्हा आलिशान बंदिस्त स्टेडियममध्ये होतात, तेव्हा ते पाहण्यासाठी गलका असतो तो शहरी प्रेक्षकांचा!

खेळ तोच... त्याच्यामध्ये घेण्यात येणारा ‘कबड्डी...कबड्डी’ हा दमही तोच...पण सादरीकरणं बदललं आणि ग्लॅमर आलं! हिऱ्याला पैलू पडावेत आणि चमत्कार व्हावा, तसा बदल घडला.

प्रो कबड्डीचं बिगुल तीन वर्षांपूर्वी वाजले, तेव्हा त्या वेळीही देशातल्या सर्वोत्तम आणि आघाडीच्या खेळाडूंचा लिलाव मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. त्यानंतर काही दिवसांत संघमालक असलेले अभिनेते अभिषेक बच्चन यांनी आपल्या संघाची माहिती देणारा एक कार्यक्रम मुंबईतल्या आणखी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतला. तसं पाहायला गेलं तर हे दोन कार्यक्रम एखाद्या खेळासाठी फार दखल घेण्याजोगे नव्हते; पण कबड्डीसाठी ते ऐतिहासिक होते. कारण, या कार्यक्रमांद्वारे ‘कबड्डी’ हा शब्द प्रथमच ‘पंचतारांकित’ झाला आणि आता बघता बघता तो ‘कोट्यधीश’ही झाला आहे!

नव्या लिलावात बारा संघांच्या संघमालकांनी मिळून ४७ कोटी रुपये कबड्डीपटूंवर खर्च केले आहेत. बरं, हे संघ मालक कोण? अगोदरचे अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रूवाला तर यात होतेच; पण त्यात आता आले आहेत जिंदाल, अदानी, जीएमआर उद्योगसमूह (जीएमआर उद्योगसमूहाची आयपीएलमध्ये दिल्ली संघाची मालकी आहे ) आणि दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकर!  आपल्या देशातला पहिल्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ आणि विश्वातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू जर कबड्डीसाठी पैसा देत असेल, तर नक्कीच या खेळात आणि खेळाडूंमध्ये दम आहे. सचिन तेंडुलकरसह जीएमआर समूहाचा विचार केला, तर क्रिकेटलाही प्रो कबड्डीची भुरळ पडली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.

नोटबंदी आणि तेजी
आयपीएल आणि प्रो कबड्डी यांच्यातलं साम्य हे केवळ सचिन आणि जीएमआर समूह एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर आयपीएलची मुख्य प्रायोजक असलेली मोबाईल कंपनी यंदा प्रो कबड्डीचीही प्रायोजक आहे. चीनमधली ही मोबाईल कंपनी, जिचा कबड्डी या खेळाशी सुतराम संबंध नाही; परंतु मोबाईल-स्पर्धेच्या युगात तिनं तिजोरीचा दरवाजा उघडला आहे तो भारतातली या खेळाची लोकप्रियता ओळखून! या मोबाईल कंपनीच्याच नावानं आयपीएलनंतर प्रो कबड्डी ओळखली जाणार आहे. एकूण काय तर, नोटबबंदीनंतर काही उद्योगांमध्ये आर्थिक मंदी आली असेल; पण प्रो कबड्डी मात्र तेजीत आली आहे.

अर्थकारण मालकांचं आणि खेळाडूंचं
कोणतीही व्यावसायिक लीग हे एक ‘बिझनेस मॉडेल’ असतं. सर्वाधिक लोकप्रिय आयपीएलचे आठ संघ. त्यातला एक संघ अंबानी यांचा; पण बहुतेक संघ तोट्यातलेच असतात. बीसीसीआयकडून आणि सामन्यांच्या प्रक्षेपणातून काही वाटा आयपीएलच्या संघमालकांना मिळत असतो. त्यातच हे संघमालक स्वतःचे वेगवेगळे प्रायोजक मिळवत असतात. उत्पन्नाचा हा मार्ग असताना खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रक्कमेत त्यांच्या प्रवास-निवासाचे खर्चही असतात. त्यात मेळ बसवताना कधी वजाबाकी होत असते. प्रो कबड्डीच्या संघमालकांनाही अजून फायद्याचं गणित जुळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असली, तरी देशातल्या प्रसिद्ध उद्योगसमूहांची संघमालकी केवळ आर्थिक फायद्यासाठीच आहे, असं वाटत नाही.

जिंदाल समूह हा क्रिकेट सोडून इतर आणि प्रामुख्यानं ऑलिम्पिक खेळ व खेळाडूंशी संबंधित आहे. या खेळाडूंना ते प्रायोजकत्व देतात ते फायदा कमावण्यासाठी नाही. या समूहाचे कार्यकारी संचालक पार्थ जिंदाल यांनी प्रो कबड्डीच्या लिलावाच्या वेळी आपली ही भूमिका मांडली. इतर उद्योगसमूहांचंही तसंच म्हणणं होतं. प्रो कबड्डीतून त्यांना फायदा होईल न होईल, हा नंतरचा प्रश्न; पण या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्वसामान्य कबड्डीपटूंचा बॅंकबॅलन्स वाढेल आणि त्यांचं अर्थकारण सुधारेल, हे मात्र नक्की.   
लिलावाचं अर्थकारण व राजकारण

तब्बल ३५० हून अधिक खेळाडू उपलब्ध असलेल्या आणि १२ संघमालकांना खेळाडूखरेदीसाठी प्रत्येकी चार कोटी, म्हणजेच ४८ कोटींची उलाढाल झालेल्या लिलावाचं बारकाईनं विश्‍लेषण करायचं म्हटलं, तर मैदानापेक्षा लिलावातच कबड्डीतले जास्त डावपेच तयार करण्यात आले आणि खेळण्यातही आले! चार वर्षांपूर्वी पहिला लिलाव झाला, तेव्हा मुळात प्रत्येकासाठी हा प्रकार नवा होता; त्यामुळं साधंसुधं गणित होतं. या वेळी हुशारीनं लिलाव कसा करावा, याच वस्तुपाठच घालून देण्यात आला.

प्रथम अभिषेक बच्चन यांच्या जयपूर संघाचे उदाहरण पाहू या. प्रत्येक संघाला एक खेळाडू कायम ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. आठ संघांपैकी जयपूरनं मात्र जसवीरसिंग आणि राजेश नरवाल हे दोन खंदे खेळाडू असतानाही कुणालाच पसंती दिली नाही आणि लिलावासाठी पूर्ण चार कोटी शिल्लक ठेवले. (लिलावातून ज्या खेळाडूला सर्वाधिक रक्कम देणार, त्याच्या १० टक्के रक्कम संघात कायम राखलेल्या खेळाडूला द्यावी लागणार होती). लिलावात अभिषेक यांनी मनजित चिल्लरला ७५ लाखांना आपल्या संघात घेतलं आणि जसवीरसाठी ५१ लाख मोजले. आता जर अभिषेक यांनी जसवीरला अगोदरच आपल्या संघात कायम ठेवलं असतं आणि तर सर्वाधिक किमतीच्या खेळाडूच्या दहा टक्के अधिक म्हणजेच, मनजितला दिलेल्या ७५ लाखांमध्ये १० टक्के अधिक, म्हणजे ८२ लाख ५० हजार द्यावे लागले असते; पण त्याच संघात लिलावाच्या  मार्गानं आल्यामुळं जसवीरला ५१ लाख रुपयेच मिळाले. आता लिलावाच्या अर्थकारणाचा फटका कोणाला बसला आणि फायदा कोणाला झाला, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

लिलावाअगोदर आपल्या संघात कायम ठेवणं (रिटेन) आणि लिलावातून जास्तीत जास्त (की कमीत कमी?) किमतीत खेळाडू विकत घेण्याच्या या गणितात अनुप कुमार, मुंबई (५६ लाख ६५ हजार), जसवीर (५१ लाख), दीपक हूडा, पुणे  (७२ लाख ६० हजार), अजय ठाकूर, तमिळनाडू (६९ लाख ३० हजार), राहुल चौधरी (‘तेलगू’) (पाच लाख ९० हजार) या दिग्गजांच्या हाती फार काही लागलं नाही. कारण, त्यांच्या त्यांच्या संघातून ज्या सर्वाधिक रकमेला खेळाडू खरेदी करण्यात आले, त्याच्या १० टक्केच अधिक रक्कम त्यांना मिळाली. मात्र, या दिग्गजांच्या तुलनेत यान कुन ली या दक्षिण कोरियाच्या खेळाडूला ८० लाख ३० हजार मिळणार आहेत. म्हणजेच भारताच्या या दिग्गजांपैकी सगळ्यात जास्त रक्कम परदेशी खेळाडूला मिळणार! 
हा लिलावातला दोष समजायचा की ‘स्मार्ट डावपेच’ समजायचे ?

शह-काटशह
एखाद्या स्पर्धेचा लिलाव हा स्वतःच्या संघासाठी खेळाडू निवडण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही; प्रो कबड्डीत तर नाहीच नाही. प्रतिस्पर्धी संघांची पर्स (खेळाडू घेण्यासाठी असलेली रक्कम) कशी कमी करता येईल, याबाबतीतही शह-काटशहाचे खेळ केले जातात.  उत्तर प्रदेश आणि तेलगू टायटन्स या संघमालकांमध्ये लिलावाच्या टेबलवर असाच सामना रंगला होता.

उत्तर प्रदेश हा नवा संघ. त्यात त्यांनी खेळाडूनिवडीला प्राधान्य दिलं. (ड्राफ्टमधून एकही खेळाडू निवडला नाही; त्यामुळं त्यांची पर्स पूर्ण चार कोटी एवढी होती) ते नितीन तोमरसाठी हे बोली लावणार, याचा सुगावा आणि अंदाज आल्यानंतर ‘तेलगू’नं त्यांच्याशी नितीनसाठी स्पर्धा सुरू केली. ७०...७२....७५..८०...८५ लाख असा बोलींचा खेळ सुरू झाला. ‘तेलगू’चे मालक श्रीनि श्रीरमणी हे जाणीवपूर्वक किंमत वाढवत आहेत, हे जाणवत होतं. अखेर हा खेळ ९३ लाखांवर थांबला आणि तोमर सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. ‘‘तोमर हा सेना दलातून खेळत असला, तरी मूळचा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे, आम्हाला तो संघात हवाच होता आणि त्यासाठी कितीही रक्कम मोजायला आम्ही तयार होतो,’’ असं उत्तर प्रदेश संघाची मालकी असलेल्या जीएमआर कंपनीचे सीईओ हेमंत दुवा यांनी सांगितलं.

‘‘आयपीएल संघासाठी आम्ही गेली दहा वर्षं काम करत आहोत. खेळाडूंचा लिलाव आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे. त्यांचा (तेलगू) ‘खेळ’ आमच्या लक्षात आला होता; परंतु आम्ही खेळाडूंना प्राधान्य दिलं,’’ असं दुवा यांनी म्हटलं, तर श्रीरमणी यांनी ‘‘आम्ही त्यांची पर्स कमी करत होतो,’’ असं स्पष्टीकरण दिलं. लिलावातही शह-काटशह कसे केले जातात, हे या प्रकारावरून उघड झालं.

आता तंदुरुस्तीचं आव्हान
लाखांची किंमत मिळाल्यामुळं खेळाडू खूश नक्कीच झाले आहेत; पण यंदाच्या प्रो कबड्डीचा मोसम तीन ते साडेतीन महिने चालणार आहे. प्रत्येक संघाला किमान २२ साखळी सामने खेळावे लागणार आहेत. कबड्डी हा शरीरवेध घेणारा खेळ; त्यामुळं दुखापतींची शक्‍यता अधिक. आत्तापर्यंच्या चार मोसमांत १४ साखळी सामने खेळताना दुखापती होत होत्या. आतातर त्यापेक्षा अधिक सामने खेळताना अधिक दुखापती होण्याचा धोका. त्यामुळं खेळाडूंसाठी तंदुरुस्ती ही त्यांना मिळालेल्या पैशापेक्षा अधिक महत्त्वाची ठरणार आहे. ‘‘ज्या संघाचे खेळाडू अखेरपर्यंत चांगले, फिट राहतील, त्यांना विजेतेपदाची अधिक संधी असेल,’’ हे मनजित चिल्लरचं वक्तव्य आणि ‘आधी तंदुरुस्ती, नंतर खेळ,’ हे अनुपकुमारचं मत बोलकं आहे. 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करण्यासाठी क्लिक करा

नव्या पिढीसाठी अनुकूल वातावरण
आपल्या संघाचं एखाद्या स्पर्धेतलं विजेतेपद किंवा कपिलदेव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंकडं पाहून अनेक पिढ्या तयार झाल्या. कबड्डी हा खेळ आत्तापर्यंत दुर्लक्षितच होता. ‘कबड्डी काय खेळतोस? अभ्यास कर...’, ‘कबड्डीनं भलं होणार नाही,’ असा ‘दम’ घराघरांतून मिळायचा; पण आता कबड्डीचं हे ग्लॅमर पाहून कुणीही पालक आपल्या पाल्यांना असा दम देणार नाही. प्रो कबड्डी ही नव्या पिढीमध्ये आवड निर्माण करण्यासाठी, त्या पिढीला घडवण्यासाठी मॉडेल ठरू शकली, तर ते एक मोठं यश असेल. 

सर्वाधिक किमतीचे खेळाडू (कंसात संघ आणि रक्कम)

 • नितीन तोमर    (उत्तर प्रदेश, ९३ लाख)
 • रोहितकुमार    (बंगळूर बुल्स, ८१ लाख)
 • मनजित चिल्लर    (जयपूर पिंक पॅंथर, ७५ लाख ५० हजार)
 • सुरजितसिंग    (बंगाल वॉरिअर्स, ७३ लाख)
 • सेल्वामणी    (जयपूर पिंक पॅंथर, ७३ लाख)

सर्वाधिक किमतीचे पहिले पाच परदेशी खेळाडू

 • यान कुन ली (दक्षिण कोरिया)    (बंगाल संघात कायम,  ८० लाख ३० हजार)
 • अबोझर मोहजेमघई (इराण)    (संघ ः गुजरात,  ५० लाख)
 • अब्दोफझल मेघशालदो (इराण)    (दिल्ली, ३१ लाख आठ हजार)
 • फहाद रहीम (इराण)     (तेलगू, २९ लाख)
 • कोमसान थाँगकाम (थायलंड)     (हरियाना, २० लाख ४० हजार)

ब श्रेणीतले पहिले पाच खेळाडू

 • सूरज देसाई    (दिल्ली, ५२ लाख ५० हजार)
 • जयदीपसिंह     (जयपूर, ५० लाख)
 • नीलेश साळुंखे     (तेलगू, ४९ लाख)
 • सोमवीर शेखर     (जयपूर, ४५ लाख ५० हजार)
 • बाजीराव होडगे     (दिल्ली, ४४ लाख ५० हजार)

ऑलिम्पिकवारी कधी?
एकीकडे प्रो कबड्डीच्या मार्गातून कबड्डी मोठी झेप घेतली असली, तरी जेव्हा ऑलिम्पिकमध्ये कबड्डीला स्थान मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थानं कबड्डी वैश्विक होईल. कोणत्याही खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्यासाठी तो पाच खंडांत आणि किमान ५० देशांमध्ये खेळला जावा लागतो. यंदा अहमदाबादमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, अर्जेंटिना यांचे संघ तयार करण्यात आले होते. त्या वेळी कबड्डीचा या देशांत प्रसार करण्याचा निर्धार करण्यात आला होता; परंतु किती प्रसार झाला, याची माहिती नाही. आता दोन वर्षांनी पुन्हा विश्वकरंडक होईल, तेव्हा परत एकदा ऑलिम्पिकप्रवेशाचे धुमारे फुटतील. प्रो कबड्डीच्या ग्लॅमरमध्ये धन्यता न मानता भारतीय कबड्डी फेडरेशनने या संधीचा फायदा घेत जर ऑलिम्पिकप्रवेशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तरच कबड्डीचा दम ऑलिम्पिकमध्ये घुमेल.

महाराष्ट्रातले काही लखपती कबड्डीपटू 
नीलेश साळुंखे (४९ लाख), काशिलिंग आडके (४८ लाख), रिशांक देवाडिगा (४५ लाख ५० हजार), बाजीराव होडगे (४४ लाख ५० हजार), संकेत चव्हाण (२४ लाख), आनंद पाटील (२० लाख ५० हजार), सुलतान डांगे (१६ लाख ६० हजार), तुषार पाटील (१५ लाख २० हजार), उमेश म्हात्रे (१५ लाख), विकास काळे (१२ लाख ६० हजार), विराज लांडगे (८ लाख), शशांक वानखेडे (८ लाख), स्वप्नील शिंदे (८ लाख), शुभम पालकर (६ लाख, १० हजार), सारंग देशमुख (६ लाख), हरीश नाईक (६ लाख), मयूर शिवथरकर (६ लाख).

भारतीय कबड्डीत मला मानाचं स्थान मिळावं, हे स्वप्न होतं व ते आता साकार झालं. प्रो कबड्डीत मिळालेली सर्वाधिक रक्कम मला अधिक चांगला खेळ करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत खेळताना दडपण असेल; परंतु सेना दलातल्या शिस्तीनं मला मानसिकदृष्ट्याही कणखर बनवलं आहे.
- नितीन तोमर

ब श्रेणीत असूनही मला अव्वल श्रेणीतल्या खेळाडूंच्या तोडीस तोड स्थान मिळालं, याचा अभिमान आहे. या विश्वासामुळं मला अधिक चांगला खेळ करण्याला आणि त्यासाठी सराव करण्याला प्रोत्साहन मिळेल.
- सूरज देसाई, ब श्रेणीतला सर्वाधिक किमतीचा खेळाडू

प्रो कबड्डीत एका संघाचा मालक असल्याचा मला अभिमान आहे. कबड्डीच्या या प्रगतीत माझा वाटा ‘केवळ संघमालक’ एवढाच नाही. भारतातला एक खेळ म्हणून या खेळाची प्रगती करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आता आम्हा सगळ्यांच्या सहभागामुळं कबड्डी एका नव्या स्तरावर जात आहे. 
- अभिषेक बच्चन