सावी आणि प्राण्यांची भेट (बालमित्र कथा)

Balmitra
Balmitra

स्टोरीबोधी हा इशा पालकर यांनी भारतीय बालमित्रांसाठी सुरू केलेला उपक्रम आहे. या उपक्रमात बालमित्रांसाठी स्थानिक पात्रे निर्माण केलेली आहे. लहानपणीच्या 'आजीच्या गोष्टीं'सारखी Storybodhi ची रचना आहे; मात्र त्यामध्ये आजच्या काळाचा संदर्भ आहे. बालमित्रांमध्ये कल्पनाशक्ती विकसित व्हावी, हा या कथांचा उद्देश आहे.

सावी तिच्या आजीआजोबांच्या घरी जाण्यासाठी तयार होत आहे. ती खूप खूष आहे. आनंदाने घरभर उड्या मारत आहे. 

आई - सावी नीट उभी रहा. मला तुझे केस विंचरू दे. आणि आधी तो ड्रेस बदल, चुरगळलाय सगळा. 
सावी - नाही आई, मी हाच ड्रेस घालणार, हा माझा आवडता रंग आहे नारंगी. 

सावीची आई तिला आजीआजोबांच्या घरी सोडवते, तिथे वीर आणि जान्हवी आधीपासूनच तिची वाट पाहत असतात. 

आजोबा - सुप्रभात सावी. मला माहितीय तू तुझे प्रश्‍न घेऊन तयार असशील. 
सावी - सुप्रभात आजोबा. मी तयार आहे. 

वीर - सावी ताई, तुझी वही आणि पेन कुठंय? 

सावी तिच्या लाल पिशवीमध्ये तिची वही आणि पेन शोधू लागते. तिला ते सापडत नाही. ती निराश होऊन आजोबांकडे पाहते. 

आजोबा - पटकन जा आणि माझ्या टेबलवरून वही घेऊन ये. तुला तिथे पेन सुद्धा मिळेल. 

ते सगळे मिळून शेतातल्या घरी जातात. ते वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या असलेलं मोठ्ठं घर होत. तिथे ताज्या शेणाचा वास येत होता. त्यामुळे सावी आणि जान्हवी पटकन नाकाला हात लावतात. बदकांचं कुटुंब तळ्यातल्या पाण्यात पोहत होतं. तेवढ्यात त्यांना तिथे गुरगुरण्याचा आवाज येतो. जान्हवी घाबरून सावीचा हात घट्ट पकडते. 

सावी - जान्हवी अगं घाबरू नको. ती डुकराची पिल्लं त्यांच्या आईला बोलावतायत. चल मी तुला दाखवते. 

ते सर्व आत जातात. तिथे कोपऱ्यात राखाडी रंगाची डुकराची दोन पिल्लं बसलेली असतात. तिथेच काही शेळ्या असतात. दुसऱ्या कोपऱ्यात एक तपकिरी रंगाचा घोडा निवांत उभा असतो. 

वीर - आजोबा, हा घोडा असा कोपऱ्यात एकटाच का उभाय? 
आजोबा - वीर, लक्षपूर्वक बघ. तो झोपलाय.

सावी - पण आजोबा कुणी असं उभ्या उभ्या कसं काय झोपू शकत? 
आजोबा - घोड्याला विशेष पाय मिळालेले असतात. जे त्याचे गुढगे घट्ट ठेवायला मदत करतात. त्यामुळे तो असा उभ्या-उभ्या झोपू शकतो. 

जान्हवी - पण ते असं का झोपतात? 
आजोबा - घोड्याला उठून उभं राहायला पुष्कळ वेळ लागतो. घोड्यावर दुसऱ्या कुणा प्राण्याने हल्ला केला तर तो पटकन त्याच्यामागे धावू शकतो. 

सावी कुतूहलाने रवंथ करत बसलेल्या एका मोठ्या काळ्या म्हशीकडे पाहत असते. 

सावी - आजोबा, तो भला मोठा प्राणी कोण आहे? बाकीचे प्राणी त्याला घाबरतायत का? जर त्यानं सगळ्या प्राण्यांना खाल्लं तर? 

आजोबा हसायला लागतात. 

आजोबा - त्या मोठ्या प्राण्याला म्हैस म्हणतात. ते बघ तिकडे चिखलात अजून काही म्हशी बसल्यात. आणि त्या दुसऱ्या कुठल्या प्राण्यांना खाणार नाहीत. कारण त्या शाकाहारी आहेत. 

वीर - आजोबा.. शाका.. काय? 
आजोबा - शाकाहारी म्हणजे जे फक्त वनस्पती खातात. म्हणजे पान, गवत, फूल, फळ, झाडाची साल इत्यादी. 

जान्हवी - आजोबा, सगळे प्राणी शाकाहारी असतात? 
आजोबा - नाही. शेतातले सगळे प्राणी गाय, शेळी, म्हैस, घोडा हे सगळे शाकाहारी आहेत. 

सावी - याच सर्व प्राण्यांकडून आपल्याला दूध मिळतं ना? 
आजोबा - हो सावी, तू बरोबर आहेस. आपल्याला गाय, म्हैस, शेळी या सर्वांकडून आपल्याला दूध मिळत. दात आणि हाडासाठी दूध उत्तम असत. दुधामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. 

जान्हवी - आजोबा, आजपासून मी रोज एक ग्लास दूध पिणार. मला मोठी झाल्यावर एक शक्तिवान मुलगी व्हायचंय. 

छोटूला थोडा वेळ गायीचं दूध काढताना पाहून, ते सगळे खुराड्यात ठेवलेल्या कोंबड्या आणि त्यांच्या पिल्लांना भेटायचं ठरवतात. 

वीर - या छोट्याशा घरांना काय म्हणतात? 
सावी - वीर, हे अगदी आपल्या घरासारखं दिसतंय ना? 
आजोबा - हो सावी, आपण जसे बंगला किंवा सदनिकेमध्ये राहतो. तसं या कोंबड्या या छोट्याशा घरात राहतात. याला खुराडं म्हणतात. 

जान्हवी - आजोबा आपल्याला कोंबडीकडून काय मिळत? 
सावी - जान्हवी त्या आपल्याला अंडी देतात. बरोबर न आजोबा? 

आजोबा - हो, जान्हवी तू बरोबर आहेस. अंडी आपल्या डोळे, केस आणि नखांसाठी चांगली असतात. अंड्यामुळे हाडं बळकट होतात. सावी, जान्हवी आणि वीर मला वचन द्या. आजपासून तुम्ही अंडी खाल. 

सावी - हो आजोबा, आम्ही नक्की अंडी खाऊ. 
तळ्यातल्या बदकांशी थोडावेळ खेळून ते सगळे थकून घरी परत येतात. सावीची आई त्यांची वाट पाहत असते. 

आई - तुमची शेतातल्या घराची सहल? 
सावी - आई, आम्ही खूप मज्जा केली. आम्ही काही डुकराची पिल्लं एकमेकांशी खेळताना पाहिली. काही शेळ्या पाहिल्या. एक घोडा त्याच्या तबेल्यामध्ये शांतपणे उभा असलेला पाहिला. आई, तुला माहितीय का घोडा उभ्या उभ्या झोपू शकतो. छोटू न म्हशीचं दूध काढलं. मी आणि जान्हवी ते प्यायलो. ते खूप मस्त होत. आणि आम्ही तळ्यातल्या बदकांशी खेळलो. 

आई - अरे वा, खूप छान. सावी आता आपण घरी जाऊया. उद्या शाळा आहे लक्षात आहे ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com