चुकांमधून शिकत गेलो... (सुनंदन लेले)

चुकांमधून शिकत गेलो... (सुनंदन लेले)

शिक्षणातून लक्ष उडालेला आणि जवळपास वाया गेलेला डेव्हिड वॉर्नर नावाचा विद्यार्थी नंतरच्या दहा वर्षांत केवळ जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनतो, ही खरंच एक अजब कथा आहे. विशेष म्हणजे तो भारतातच पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. पहिल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातून त्यानं चमकदार कामगिरी केली आणि त्याची ऑस्ट्रेलियालाही दखल घ्यावी लागली. आज खात्यात १८ कसोटी आणि १३ एकदिवसीय शतकं जमा असलेल्या या बहुपैलू खेळाडूशी बातचीत.

पहिल्या आयपीएल स्पर्धेचे बिगुल वाजत असताना दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टी. ए. शेखरनं क्रिकेट जगताला जास्त माहिती नसलेल्या डेव्हिड वॉर्नर नावाच्या खेळाडूची निवड केली होती. पहिल्याच स्पर्धेत वॉर्नरमधली चुणूक लक्षात आली. लहान चणीच्या या फलंदाजाच्या फटक्‍यात वेगळीच ताकद होती, जी वीरेंद्र सेहवागला जाम भावली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या वॉर्नरकडं निवड समितीला जास्त काळ दुर्लक्ष करता आलं नाही. प्रथम अपेक्षेप्रमाणं वॉर्नरला ‘टी-२०’ संघात जागा मिळाली. मग लगेच एका आठवड्यात तो एकदिवसीय संघात दाखल झाला. दोन वर्षं चांगली छाप पाडल्यावर निवड समितीनं डेव्हिड वॉर्नरला कसोटी कॅप दिली. आज वॉर्नरच्या खात्यात १८ कसोटी आणि १३ एकदिवसीय शतकं जमा आहेत. इतकंच नाही तर तो ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार आहे.

‘‘सगळंच स्वप्नमय वाटतं आहे मला...’’ बंगळूरला भेटलो असताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला. ‘११ जानेवारी २००९ मी आकाशात तरंगत होतो- कारण त्या दिवशी दक्षिण आफ्रिकेसमोर पदार्पण करायची मला संधी लाभली होती. पहिल्याच सामन्यात दडपण झुगारून देत मी माझी नैसर्गिक आक्रमक फलंदाजी केली. कडाकड फटकेबाजी करत ७ चौकार आणि ६ षटकार मारत ४३ चेंडूंत ८९ धावा केल्या. चौदाव्या षटकात मी बाद झालो आणि पदार्पणात शतक करायची संधी हातची घालवली. अजून मला आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ सामन्यात शतक करता आलेलं नाही. आहे की नाही गंमत? त्या खेळीनं माझ्याकरता एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात मला यश मिळालं नाही. डेल स्टेननं मला लगेच बाद केलं होतं,’’ आठवणीत रमताना डेव्हिड वॉर्नर सांगू लागला.

‘‘हे झाले क्रिकेटचं; पण मला समजलं, की शाळेत तू अत्यंत व्रात्य मुलगा होतास, फार दंगा करायचास...’’ वॉर्नरचा चांगला मूड बघून मी ‘बॉलिंग’ सुरू केली.
‘‘दंगा हा फार लहान शब्द आहे... दंगल हा शब्द कदाचित बरोबर ठरेल,’’ प्रचंड जोरानं हसत वॉर्नर म्हणाला. ‘‘शाळेत माझं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसायचं. सगळं लक्ष फक्त खेळात होतं. माझ्या टीचर मला म्हणायच्या, की ‘डेव्हिड, क्रिकेट तुला काही देणार नाही... कुठंही घेऊन जाणार नाही... त्यापेक्षा इंग्लिश भाषेवर लक्ष दे.’ आज जेव्हा मी त्या टीचरना भेटतो, तेव्हा आम्ही दोघंही आठवणी काढत हसतो. चेष्टा बाजूला ठेव... मला वाटतं, की मी शिक्षणाकडं दुर्लक्ष करून मोठी चूक केली. त्या वेळी माझी साथसंगतही चुकीची होती. आज मागं वळून बघताना जाणवतं, की शिक्षणाकडं दुर्लक्ष करता कामा नये. पायाभूत शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळं माणसाला सारासार विचारांची बैठक मिळते, जी कठीण काळात मोलाची साथ देते. तीच गोष्ट चांगल्या मित्रांच्यात राहण्याची आहे. कोणाच्या संगतीनं कोणी घडतो किंवा बिघडतो, यावर माझा विश्‍वास नाही; पण साथसंगत खराब असेल, तर वाईट सवयींकडे तुम्ही ओढले जाण्याची शक्‍यता वाढते.’’

‘‘आक्रमकतेच्या नावाखाली काही वेळा तू लक्ष्मणरेषा ओलांडली आहेस,’’ मी म्हणालो.
‘‘होय. मी जरा जास्तच आक्रमक असायचो, ज्यातून मैदानावर किंवा मैदानाबाहेर चुका घडल्या. त्यांचा मला मोठा भुर्दंड सोसावा लागला. बर्मिंगहॅमला ज्यो रूटबरोबर झालेली मारामारी मला मोठा फटका देऊन गेली. ‘चॅंपियन्स ट्रॉफी’सारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेला मला मुकावं लागलं. दक्षिण आफ्रिकेसमोरच्या एका सामन्यातही माझी मैदानावर जरा बाचाबाची झाली होती. त्या दोन प्रसंगांतून मी बरंच काही शिकलो. आक्रमकता फलंदाजी करताना पाहिजे. तोंडानं नाही- बॅटमधून निघणाऱ्या धावांनी बोलायला पाहिजे, हे मला उमगलं,’’ वॉर्नरनं सांगितलं.
‘टी-२०’ आणि एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर यशस्वी होणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती; पण कसोटी क्रिकेटमधे मिळालेलं घवघवीत यश सगळ्यांना आश्‍चर्यचकित करून गेलं.

‘‘दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत असताना वीरेंद्र सेहवागनं मला सांगितलं होतं, की आक्रमक फलंदाजाकरिता कसोटी सामन्यात खेळणं जास्त मजेदार असतं. मर्यादित षटकांच्या सामन्यात क्षेत्ररचना पांगवलेली असते. कसोटी सामन्यात जास्त खेळाडू झेल पकडण्याच्या जागी उभे केले जातात, ज्यामुळं मैदानात मोकळ्या जागा भरपूर दिसतात. सेहवागनं मला आधीच सांगितलं होतं, की मी कसोटी सामन्यात जास्त चांगल्या खेळ्या उभारीन. मला स्वत:ला सेहवागची शैली खूप आवडायची. जबरदस्त आक्रमक फलंदाजी करूनही सेहवाग मोठ्या खेळ्या उभारायचा, हे निरीक्षण मी केलं होतं. सेहवागसोबत घालवलेला काळ मला बरंच काही शिकवून गेला,’’ वॉर्नर सांगत होता.

कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत बोलताना वॉर्नर म्हणाला, ‘‘प्रेक्षकांच्या दृष्टीनं ‘टी-२०’ क्रिकेट प्रकार जास्त रंगतदार आहे, हे मान्य करावंच लागेल. प्रत्येक चेंडूवर काही तरी नाट्य ‘टी-२०’ सामन्यात घडतं. तीन तासांच्या खेळात बरीच धमाल प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. त्या अर्थानं कसोटी क्रिकेटला किंचित धोका जाणवतो. खेळाडू म्हणून मला स्वत:ला कसोटी क्रिकेटच जास्त भावतं, आवडतं. खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वाची खरी परीक्षा कसोटी क्रिकेटमधेच बघितली जाते. तसंच कोण खेळाडू काय पाऊलखुणा मागं ठेवून जातो आहे, हे फक्त कसोटी क्रिकेटच्या कामगिरीवरच तोललं जातं, याची मला पूर्ण कल्पना आहे. मला वाटतं, की ‘डे अँड नाईट टेस्ट मॅच’ची कल्पना चांगली रुजते आहे. ऑस्ट्रेलियातल्या सर्व ‘डे अँड नाईट’ कसोटी सामन्यांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.आहे. ‘डे अँड नाईट टेस्ट मॅच’ फलंदाजांकरता जास्त आव्हानात्मक ठरते, कारण चांगला स्थिरावलेला फलंदाजही रात्री चेंडू हलायला लागला, की चमकतो आणि चाचपडत खेळू लागतो. ‘डे अँड नाईट टेस्ट मॅच’नं कसोटी क्रिकेटला एक वेगळा रंग दिलाय हे नक्की,’’ डेव्हिड म्हणाला.

पुणे कसोटी सामन्यातल्या विजयाचा विषय निघाल्यावर डेव्हिड वॉर्नरचा चेहरा चांगलाच उजळला. ‘‘मायदेशात दक्षिण आफ्रिकेसमोर आम्ही दोन कसोटी सामन्यांसह मालिका गमावली. तसंच आशिया उपखंडातली आमची कामगिरी चांगली होत नव्हती. या सगळ्याचा विचार करता पुणे कसोटी सामन्यातला विजय फार सुखावह आहे. प्रथम फलंदाजी करायला मिळालेल्या संधीचा आम्ही फायदा उचलला. एक सांगतो, त्या विकेटवर फलंदाजी करणं खरंच कठीण होतं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमनाकरता जोरदार प्रयत्न करेल, याची आम्हांला पूर्ण कल्पना आहे. पहिल्या कसोटीतल्या विजयाचा आनंद आहे; पण आम्ही हुरळून जाणार नाही, कारण भारतीय संघाची क्षमता आम्ही जाणून आहोत,’’ वॉर्नरनं भूमिका मांडली.
‘१८ कसोटी शतकं, १३ एकदिवसीय सामन्यातली शतकं... सगळंच विस्मयकारक नाही वाटत तुला,’’ मी विचारलं.

‘‘प्रचंड आश्‍चर्य वाटतं. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असं वाटतं. मी आज जे काही आहे ते केवळ क्रिकेटमुळे आहे, हे मी कबूल करतो. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. आई-वडिलांना मुलांना बरंच काही द्यायचं असून ते देता येत नव्हतं. त्यातून माझं शिक्षण अपुरं झालं होतं. पुढं काय होणार, याची खूप काळजी होती; पण ‘क्रिकेट देवा’ची मी आराधना केली आणि मला सगळं काही मिळालं. नुसतंच मला नाही, तर आई - वडील आणि भावाकरता काही तरी करता आलं. त्यांना इंग्लंडला नेता आलं- जे त्यांचं स्वप्न होतं. हे सगळंच स्वप्नमय वाटतं. माझ्या या विचित्र कहाणीची पुस्तके निघाली, ज्यांना भरघोस प्रतिसाद लाभलाय. काय सांगू तुला- मला पालक भेटून सांगतात, की आमचा मुलगा किंवा मुलगी कोणतंही पुस्तक वाचत नाहीत; पण डेव्हिड वॉर्नरची रंजक कथा वाचायला त्यांना आवडते. मला हे सगळं ऐकून मजा वाटते. हसायलाही येतं,’’ कृतज्ञ वॉर्नर बोलून गेला.
‘‘भारताचं आणि तुझं एक वेगळं नातं आहे...’’ मी शेवटचा चेंडू टाकला.

‘‘माझं आणि भारताचं नातं कमाल आहे खरं. आयपीएल स्पर्धेनं मला खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आणलं. तिथपासून ते गेल्या वर्षी मी कर्णधार असलेल्या हैदराबाद संघानं आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा प्रवास सगळंच कमाल आहे. २००६मध्ये मी पहिल्यांदा भारतात आलो. हैदराबाद विमानतळापासून हॉटेलवर पोचायला दोन तास लागायचे. आता झकास फ्लायओव्हर झाला आहे, ज्यामुळं विमानतळावरून बरोबर अर्ध्या तासात आम्ही हॉटेलवर असतो. भारतातल्या सोयी-सुविधा, रस्ते गेल्या पाच-सात वर्षांत खूप बदलले. ऑसी संघासोबत फिरलो, त्यापेक्षा जास्त मी आयपीएल संघाकरता भारतातल्या विविध शहरांत फिरलो. खूप बदल जाणवतो मला. भारतीय लोक क्रिकेटवेडे आहेत, हे ऐकून होतो. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळाच अनुभव होता. मला भारतीय प्रेक्षकांचं प्रचंड कौतुक आहे. क्रिकेटचा आनंद लुटण्याची मोठी समज आहे त्यांना. म्हणूनच मला भारतात खेळायला खूप आवडतं,’’ डेव्हिड वॉर्नर डोळे मिचकावत म्हणाला.

शिक्षणातून लक्ष उडालेला आणि जवळपास वाया गेलेला डेव्हिड वॉर्नर नावाचा विद्यार्थी नंतरच्या दहा वर्षांत केवळ जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनतो, ही खरंच एक अजब कथा आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचे आधारस्तंभ आहेत. दोघांच्याही फलंदाजीतलं सातत्य वाखाणण्याजोगं आहे. मैदानावर आक्रमकतेची कॅप सतत डोक्‍यावर मिरवणारा डेव्हिड वॉर्नर विचारांनी किती प्रगल्भ आहे, हे भेटल्यावर समजतं. पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ चमकला; पण वॉर्नर जास्त चमकू शकला नाही. उरलेल्या तीन कसोटी सामन्यांत वॉर्नर आपला ठसा उमटवायला काय करामत करतो, हे बघणं रंजक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com