उद्योजक आणि माणूस (संदीप वासलेकर)

उद्योजक आणि माणूस (संदीप वासलेकर)

अनेक वैश्विक महत्त्वाचे उद्योग जन्माला घालणारे उद्योजक भविष्याकाळात भारतात उदयाला येतील, याची मला खात्री आहे. त्यांना यशही मिळेल, त्यांच्याकडं संपत्ती जमेल. मात्र, हे सगळं करताना क्रॉक-झुकरबर्ग यांच्यासारखा नीतिमूल्यांना, प्रेमाला, नात्यांना तिलांजली देण्याचा मार्ग स्वीकारायचा की गुगल-स्काइपच्या निर्मात्यांसारखा कल्पकता, नैतिकता आणि उद्योजकता या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारायचा, याविषयी त्यांनी जागरूकतेनं निर्णय घेणं आवश्‍यक ठरणार आहे.

‘द फाउंडर’ हा इंग्लिश चित्रपट भारतात काही चित्रपटगृहांत अलीकडंच झळकला. मॅक्‌डोनाल्ड या बहुराष्ट्रीय उद्योग साम्राज्याचे संस्थापक रे क्रॉक यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. आता रे क्रॉक हयात नाहीत. त्यांच्या पत्नी जोन क्रॉक यांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं. दरम्यान, मॅक्‌डोनाल्डचा पसारा जगभर पसरला...पसरत आहे.

कंपनीची मालकी जरी रे क्रॉक व त्यांच्या वारसदारांकडं असली, तरी मॅक्‌डोनाल्ड या कल्पनेला रिचर्ड मॅक्‌डोनाल्ड यांनी जन्म दिला होता. एका मिनिटाच्या आत ‘झटपट जेवणाचा पुडा’ ग्राहकाच्या हाती देण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलं होतं. ‘मॅक्‌डोनाल्ड’च्या दुकानावरच्या पिवळ्या कमानी, कामगारांचा गणवेश, स्वच्छता हे सर्व रिचर्ड मॅक्‌डोनाल्ड यांच्या कल्पकतेचं फळ आहे. रे क्रॉक रे त्यांच्याकडं काही उपकरणं विकायला गेले असता त्यांना मॅक्‌डोनाल्ड यांची झटपट व स्वच्छ भोजन स्वस्तात विकण्याची कल्पना आवडली.

स्वतः रिचर्ड मॅक्‌डोनाल्ड हे अल्पसंतुष्ट होते. त्यांचा स्वभाव निर्मळ होता. ग्राहकाला फसवायचं नाही व अतिमहत्त्वाकांक्षा ठेवायची नाही, अशी त्यांची भूमिका होती. रे क्रॉक यांनी त्यांच्याशी भागीदारी केली व मॅक्‌डोनाल्डची साखळी संपूर्ण अमेरिकाभर तयार केली. त्यासाठी त्यांनी जोखीम घेतली. रात्रंदिवस परिश्रम घेतले व गावागावांत मॅक्‌डोनाल्डच्या पिवळ्या कमानी उभ्या केल्या.

हे करताना रे क्रॉक यांनी वकिलांच्या मदतीनं स्वतःचं ‘मॅक्‌डोनाल्ड-साम्राज्य’ उभारलं. ते वाढू लागल्यावर रिचर्ड मॅक्‌डोनाल्ड व त्यांचे वडीलबंधू यांच्या हातात सुपारी ठेवून त्यांना कंपनीच्या बाहेर काढलं. इतकंच नव्हे तर, मॅक्‌डोनाल्ड-बंधूंना ‘मॅक्‌डोनाल्ड’ हे स्वतःचंच नाव वापरण्यावरदेखील कायद्यानं बंदी आणली!
***

एखाद्या कल्पनेच्या निर्मात्याकडून चांगली कल्पना ताब्यात घ्यायची... सुरवातीला त्याच्याशी भागीदारी करायची... नंतर कट करून त्याला बाहेर फेकायचं...पण स्वतः परिश्रम करून व जोखीम घेऊन व्यवसाय देशभर व देशाबाहेर वाढवायचा...त्यातून हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण करायचा...नफ्यातला एक मोठा भाग कला-विज्ञान-सामाजिक गरजा यांसाठी दान करायचा हे अमेरिकेतलं तंत्रच झालं आहे. याच्या दोन बाजू आहेत. कल्पनेच्या जन्मदात्यावर सरळसरळ अन्याय करायचा, ही एक बाजू झाली; परंतु त्या कल्पनेचा जगभर प्रसार करून संपत्ती, रोजगार व सामाजिक कामासाठी द्रव्य निर्माण करायचं, ही दुसरी बाजू.

‘फेसबुक’चे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी याच तंत्राचा वापर केला. वास्तविक, ‘फेसबुक’ची मूळ कल्पना विंक्‍लेवॉस-बंधू व त्यांचा मित्र दिव्या नारायण यांची होती. त्यांनी मार्क झुकरबर्ग यांना फक्त संगणकप्रणाली तयार करण्याचं काम दिलं होतं. त्यातून झुकरबर्ग यांनी थोडा बदल करून ‘फेसबुक’ची निर्मिती केली. ते विकसित करण्यासाठी एडवार्डो सेवेरिन या युवकाशी भागीदारी केली व एडवार्डोला पैसे उभे करायला सांगितलं. नंतर खुबीनं व वकिलांच्या मदतीनं एडवार्डो सेवेरिनला ‘फेसबुक’मधून बाहेर काढले. नंतर शॉन पार्कर या युवा-उद्योजकाची मदत गेतली. शॉन पार्करला अमली पदार्थांच्या सेवनामुळं ‘फेसबुक’मधून बाहेर पडावं लागलं. मार्क झुकरबर्ग यांनी नंतर कंपनीचा संपूर्णतः ताबा घेतला व आज जगातले एक अब्जाहून अधिक लोक ‘फेसबुक’चे सभासद आहेत. झुकरबर्ग हे जगातल्या सगळ्यांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

***

‘ॲपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज्‌ यांनी ‘ॲपल’चे खरे संस्थापक स्टीव्ह वाझनियाक यांना फसवलं का? बिल गेट्‌स यांचा सुरवातीच्या काळात प्रवास कसा झाला? ‘डॉस’ ही संगणकप्रणाली कुणी तयार केली होती? असे अनेक प्रश्‍न सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चेचा विषय आहेत. गुगल, स्काइप व ट्‌विटर या संदर्भात मात्र जाणीवपूर्वक फसवणूक केली गेल्याची चर्चा नाही. हे उद्योग कल्पकता व प्रामाणिकपणा या गुणांद्वारेच यशस्वी झाले आहेत.

भारतातल्या उगवत्या उद्योजकांनी आपल्याला ‘मॅक्‌डोनाल्ड-फेसबुक मार्गा’नं जायचं की ‘गुगल-स्काइप मार्गा’नं जायचं, यावर विचार केला पाहिजे. असे प्रश्न पूर्वी भारतात निर्माण झाले नाहीत. कारण, जगभर पसरेल असं नवं तंत्रज्ञान कुणी शोधलं नाही. आतापर्यंतचा आपला भर मुख्यत्वे परदेशातल्या तंत्रज्ञानात बदल करून ते कमीत कमी खर्चात इथं कसं उपलब्ध करता येईल, यावर आहे किंबहुना आपली ‘इनोवेशन’ची व्याख्याच ‘परदेशी लागलेल्या शोधाचा कमी खर्चातला अवतार मोठ्या प्रमाणात निर्माण करणं’ ही आहे! म्हणून आपण पहिला भारतीय संगणक, पहिलं भारतीय वैद्यकीय उपकरण, पहिलं भारतीय सॉफ्टवेअर यांचा अभिमानानं उल्लेख करतो. संपूर्ण जगात कुणी कधीही विचार केला नाही, असं काही शोधायचं व त्यातून एका तंत्रज्ञानाची अथवा उपकरणाची निर्मिती करायची म्हणजे खरं नावीन्य हे आपल्याला अजून समजलेलं नाही. याला एक अपवाद म्हणजे, अवकाशक्षेत्रातली ‘इस्रो’ची कामगिरी. कृष्णविवरांच्या लहरींपासून चंद्र व मंगळ यांची जडणघडण व केवळ एकाच फेरीत १०० हून अधिक उपग्रह अवकाशात सोडण्याची ‘इस्रो’ची कामगिरी जगाला थक्क करणारी आहे. अर्थात ‘इस्रो’ ही सरकारी संस्था आहे. खासगी क्षेत्रांत मात्र मूलतः नावीन्यपूर्ण कामगिरी कुणी आतापर्यंत केलेली नाही.

हे चित्र भविष्यात बदलण्याची शक्‍यता आहे. माझ्या लहानपणी बॅंकेत नोकरी मिळणं अथवा कोपऱ्यावर दवाखाना सुरू करणं ही महत्त्वाकांक्षा असायची. आता युवकांमध्ये हिंमत आली आहे. नवीन कल्पनांवर काम करून स्वतःचा ठसा जगावर उमटवण्याची इच्छा त्यांच्यात आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, असे युवक प्रामुख्यानं पुणे, नाशिक, औरंगाबाद व इतर जिल्ह्यांच्या आणि तालुक्‍यांच्या ठिकाणी मला नेहमी भेटतात. त्यामुळं भविष्याकाळात भारतातूनही अनेक वैश्विक महत्त्वाचे उद्योग जन्माला घालणारे उद्योजक उदयाला येतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यांना यशही मिळेल, संपत्ती जमेल; परंतु हे सगळं करताना नीतिमूल्यांना, प्रेमाला, नात्यांना तिलांजली देण्याचा आणि संपत्तीतला काही भाग समाजकार्यासाठी दान केला म्हणून समाधान मानण्याचा रे क्रॉक यांचा अथवा मार्क झुकरबर्ग यांचा मार्ग स्वीकारायचा की नाही हा प्रश्न आहे. याउलट गुगल व स्काइपच्या संस्थापकांनी दाखवून दिलेला व कल्पकता, नैतिकता आणि उद्योजकता या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचाही दुसरा मार्ग आहे. भौतिक यश हे कल्पनेचा जन्मदाता-ग्राहक-सरकार यांना फसवूनच मिळतं असं नाही, तर सदसद्विवेकबुद्धीनं आयुष्यात मार्गक्रमण करूनदेखील ते मिळू शकतं.

सध्या युवकवर्ग जसा उद्योजकतेकडं वळू लागले आहे, तसा त्यांनी आपल्या ध्येयाचा व त्यासाठी आखलेल्या मार्गाचाही सर्वांगीण विचार करणं आवश्‍यक आहे. आपल्या नफ्यापैकी चार टक्के भाग सामाजिक कार्यासाठी वाटला म्हणजे सामाजिक दायित्व निभावलं, असं काही जणांना वाटतं. त्यातही दिलं जाणारं धन हे स्वतःच्याच ट्रस्टला द्यायचं म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ते समाजाला दिलं; परंतु प्रत्यक्षात स्वतःच्याच अधिकाराखाली ते राखायचं, ही कलाही अनेकांना जमते! देशात चार-पाच लाख खेड्यांमध्ये सातवी इयत्तेच्या वर शाळा नाहीत. बहुसंख्य विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये मूलभूत संशोधनाची सोय नाही. तरीही स्वतःच्या नावानं विद्यापीठ काढलं म्हणजे शिक्षणक्षेत्रास योगदान दिलं, असे समजणारे अनेक धनाढ्य आहेत.

त्याहीपेक्षा नवलाची गोष्ट म्हणजे भागीदार, ग्राहक व कामगार, सरकारी कर खाते या सगळ्यांना फसवून फक्त एक शैक्षणिक संस्था काढली म्हणजे खूप मोठं कार्य केलं, असं समजणारेही महाभाग आपल्या समाजात आहेत.
नव्या पिढीतल्या उद्योजकांनी अशा प्रवृत्तींपासून सावध राहणं आवश्‍यक आहे. नैतिकतेचा मध्यबिंदू हा सहकारी, कामगार, ग्राहक, सरकार अशा सर्व भागधारकांशी प्रामाणिक राहणं हाच आहे. त्यानंतर निसर्ग व सामाजिक स्वास्थ्य यांची देखभाल करण्यासाठी जमेल ते करणं याच्याशीही संबंधित आहे. नैतिकतेच्या मार्गानं जाऊन संपन्नता मिळवणं यातच आयुष्याचं खरं श्रेय आहे.

केवळ नैतिकतेचा जप करून गरिबीत अथवा गुलामीत राहणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होय. केवळ भौतिक यशाच्या मागं जाऊन विश्वासघात, फसवणूक आणि चोरी करणं म्हणजे नालायकपणा आहे. आयुष्यात एक उद्योजक अथवा व्यावसायिक म्हणून यशस्वी होणं हे जसं आनंददायक आहे, तसंच आयुष्यात एक मित्र, नागरिक व माणूस म्हणून यशस्वी होणंदेखील महत्त्वाचं आहे. आयुष्यातली विविध मूल्यं, विविध पैलू, विविध बाजू जोपासण्याची कला ज्या व्यक्तीकडं आहे, त्याच व्यक्तीला सुख व समाधान मिळणं शक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com