दमकोंडी (उमेश मोहिते)

दमकोंडी (उमेश मोहिते)

राजारामनं बायकोकडं रडक्‍या चेहऱ्यानं पाहिलं अन्‌ कसायाच्या मागं ढोर चालत राहावं तसा धडधडत्या मनानं तो श्‍यामरावबरोबर सुभानरावच्या वाड्याकडं निघाला... अवघ्या पाचेक मिनिटांत ते दोघं वाड्यासमोर आले. वाड्यातल्या ढाळजंतच पांढरेधोट कपडे घातलेला सुभानराव राजारामला दिसला अन्‌ त्याची धडधड वाढली. राजारामला बघून सुभानराव गरजला ः ‘‘राजाराम्या, मधी यंऽऽ’’

राजाराम बीड-परळी बसमधून पाचच्या दरम्यान गावच्या फाट्यावर उतरला व अवघ्या पाच मिनिटांतच रानात पोचला. अलीकडच्या पडकामध्ये म्हैस चारत असलेली सखू बघून तो हबकलाच...! त्याच्या मनात आलं ः आता ती नाय नाय ते बोलणार, रिकाम्या हातानं आलाव म्हणून...

बायकोला टाळण्यासाठी तो तिच्याकडं न जाता थेट वावरात आला. कापसावर नजर टाकली. वीत वीत कापूस बघून त्याचा जीव कळवळला... ‘म्हैना झालं ना पाणी पडून, मंग काय होणारंय... धान कशाला उबदाऱ्या येईन? नायतर आजपसवर हारभर नसती का झाली सरकी...’ पिवळ्या पडलेल्या कापसाकडं पाहून तो असा स्वतःशीच बोलत एके ठिकाणीच उभा होता. गळाठल्यासारखा. इतका की सखू आल्याचं त्यानं पाहिलं; पण काहीच बोलला नाही. सखूला राजारामचा संतापच आला. रोजगार बुडवून उसने दाम आणण्यासाठी बहिणीकडं गेलेला तो काहीच बोलत नाही असं दिसताच, तिनं ठसक्‍यातच विचारलं ः
‘‘ठिवलं हातावर बहीण म्हणणारीनं काई? का आलाव माघारी रिकाम्या हातानं...?’’
‘‘.....’’ तो काहीच बोलला नाही. त्यानं तिच्याकडं फक्त पाहिलं. तिनं आवाज चढवून पुन्हा विचारलं ः
‘‘आवं गप का बसलाव? काय म्हन्ली ती...?’’
‘‘सद्या काई गुंजाइस नाय म्हन्ली...’’ राजाराम.
‘‘काय करावं माय आता... गेल साली दोन रोज राहुनशिनी पैशे नेले तिनं. त्यो हैवानासारखा बाबा निस्तं आधण आणायलाय आन्‌ ती तिकडं बिनघोर बसलीया हितं आमच्या गळ्याला फास लावून... आता उंद्याचा वायदा हाय दाम द्यायचा... काय करावं गं मायऽऽ...’’ तिनं भरून आल्यानं गळाच काढला. त्यालाही गलबलल्यागत झालं; पण सावरत तो बोलला ः
‘‘रानावनामंदी इवळू नकू बग... करतो मी यवस्था कायतरी... बघूतं...’’
‘‘ठाव नाय व्हय तुमाला... गेल साली त्या शिंद्याची बैलजोडी नव्हती का नेली धरून... तसं उद्या त्या बाबानं म्हशीचं दावं धरू नी म्हंजी झालं...’’ डोळे पुसत ती म्हणाली.
‘‘काय बी काय बोलतीस गं...? वाचंला जी यीन ती बोलतीस झालं...’’ उसनं अवसान आणून राजाराम म्हणाला अन्‌ चितागती झाला.
...खरंच असं कशावरून होणार नाही पण...? त्याच्या मनात आलं.
‘‘काय खोटंय का मी म्हन्ते ती, त्यो बावा हैच तसला...’’ ती म्हणाली.
‘‘बरं, बघूतं काय व्हतंय ती...’’ एवढं बोलून तो लगबगीनं गावाकडं निघाला.
***

राजाराम दोन एकर कोरडवाहू जमिनीचा धनी होता. आधी तो दुसऱ्याच्याही शेतात कामं करत असे; पण पाच-सहा वर्षांपूर्वी सुगीच्या दिवसांत मालकाच्या घरी जोंधळ्याचं पोतं उतरवत असताना त्याला अपघात झाला. गाडीमधून पोतं वाड्यात नेत असताना चिरेबंदी वाड्याच्या पायरीवरून त्याचा पाय निसटला आणि पाठीवरचं पोतं पायावरच पडलं. अगदी जिवाचं पाणी झालं तेव्हा त्याच्या. अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात भरती व्हावं लागलं अन्‌ डाव्या पायात रॉड टाकावा लागला. थोडक्‍यात, तो कायमचा अधू झाला. आता इथून पुढं अंगमेहनतीचं काम करणं शक्‍य नव्हतं. म्हणून त्यानं गावातल्या हॉटेलमध्ये बारीकसारीक काम धरलं; पण त्यानंतर संकटांवर संकटं येतच राहिली. गेल्या वर्षी बी-भरणासाठी पाचेक हजार उसनवारी झाली होती. ती फेडता फेडता आख्खं वर्ष गेलं आणि दुष्काळामुळं वावरातलं हाती काही आलं नाही. त्यातच सारजाआक्कानं - त्याच्या विधवा बहिणीनं - लेकीचं लग्न करण्यासाठी त्याच्याकडूनच दहा हजार रुपये नेले. त्यानं स्वतः सुभानरावाकडून ही रक्कम व्याजानं काढली होती. पुन्हा या वर्षी पोरीचे- राधाचे- शिकवणीचे पैसे भरण्यासाठी पाच हजार संपत सावकाराकडून व्याजानं काढले होते. यातच भर म्हणून गेल्या महिन्यात सखू आजारी पडली पावसात भिजण्याचं निमित्त होऊन, तेव्हा दवापाण्याला दोनेक हजाराचा खड्डा पडला, शिवाय त्याचा रोजगारही बुडाला होता आणि राधाची शाळाही बुडाली होती. आता कुठं थोरल्या लेकीच्या- पारबतीच्या- लग्नाच्या देण्या-पाण्यातून सुटका होत आली होती, तर आता ही अधिकची भर पडली होती आणि या सगळ्याच परिस्थितीनं तो पुरता गोंधळून गेला होता. अगतिक- हतबल झाला होता, त्याची दमकोंडी झाली होती!
सारजाआक्काकडून पैशाची काही सोय होते का ते पाहण्यासाठी काल तो गेला होता; पण तिनंही रिकामंच परत पाठवलं होतं. आता उद्या सकाळी काय करायचं, या काळजीनंच तो निघाला...

***

अंधार पडायला राजाराम घरी आला. दारातच छोटा पिंट्या काहीतरी खेळत होता. बापाला बघून पिंट्यानं त्याच्याकडं झेप घेतली. त्यानं पिंट्याला उचलून घेत त्याचा मुका घेतला. पिंट्या खूश होऊन म्हणाला ः
‘‘दादा, खाया चिवडा नाय आनला?’’
राजारामला त्याच्या प्रश्‍नानं कसंसंच झालं. काळजीमुळं आज त्याचा नेहमीचा शिरस्ता मोडला गेला होता... तो सारवासारव करत म्हणाला ः ‘‘गडबडीत ध्यानातच राह्यलं नाय बघ...’’ त्यानं पिंट्याला कडेवरून खाली उतरवलं. खिशातून पाच रुपयाचा रोकडा काढून त्याला देत तो म्हणाला ः
‘‘ह्ये धर. आन तात्याच्या दुकानातू चिवडा... जा पळ...’’
पिंट्यानं धूम ठोकताच दार लोटून तो वाड्यात आला. त्याला छपरात स्वैपाक करत असलेली राधा दिसली. ती त्याच्याकडं बघून हसताच तोही बळंच हसला. त्यानं पायातला बूट सोडला व तो थेट न्हाणीत घुसला. हात-पाय धुतले. चूळ भरली. त्यानं ओसरीवरच्या रांजणातून तांब्या भरून घेतला व पटांगणातल्या बाजेवर बसला. शांतचित्तानं पाणी प्यायला. तेवढ्यात राधानं विचारलं ः ‘‘दादा, चहा करू का?’’
‘‘नकू चाहा... मघा फाट्यावरच घेतलाया मी...’’ तो तिच्याकडं बघत म्हणाला. त्यावर राधा पुन्हा भाकरी थापू लागली. जराशानं ती राजारामजवळ आली.
त्याच्या बाजूला बाजेवर बसली व म्हणाली ः ‘‘ताईचा फोन आला होता...’’
‘‘कवाशिक?’’ काळजीनं त्यानं विचारलं.
‘‘घंटाभर झालं... साडेपाचला...’’
‘‘काय म्हनीत व्हती?’’ त्यानं विचारलं. पारबतीचा पाचवा महिना सरला होता आणि बाळंतपणाला तिला माहेरी आणायचं होतं; पण राजारामला या धावपळीत तिचा विसरच पडल्यासारखं झालं होतं...
‘‘दादा मला न्यायाला कवा येनार हाईतं, म्हनीत व्हती...’’ राधानं सांगितलं. यावर स्वतःशीच बोलल्यासारखं राजाराम म्हणाला ः ‘‘जावं तर लागंनच एकादिशी टाइम काढून...’’
राधा काहीच न बोलता कालवणाला फोडणी टाकण्यासाठी छपरात गेली व तो बाजेवर एकटाच झाला. तिथंच चितागती बसून राहिला. जराशानं तो उठला. पायात बूट घालून राधाला म्हणाला ः ‘‘येतोच मी लगीच भाईरून जरा आं...’’
आणि तो लगबगीनं वाड्याबाहेर पडला. दारासमोरच पिंट्यानं ‘कुटं निघालाव?’ म्हणून हटकलं; पण ‘आलो लगीच’ म्हणून त्यानं पिंट्याला टाळलं. अंधारात तो उगीचंच मारुतीच्या पारापाशी आला. पारावर लहान पोरं-पोरी शिवणापाणी खेळत होते. दहा-पाच नेहमीची म्हातारी मंडळी गप्पा मारत होती. तरुण मंडळी सुलेमानच्या हॉटेलमध्ये टीव्ही बघत होती. तिथून तो तडक प्राथमिक शाळेच्या मागं आला. कुणी नाही असं पाहून मग तो शाळेच्या भिंतीमागच्या कटावर एकटाच बसला. विचार करून करून त्याच्या टकुऱ्याचा पार भुगा झाला होता. जराशानं यंकट- त्याचा जिवाभावाचा दोस्त- रोजच्या नेमानं आला. त्याच्या बाजूला बसला. त्यानं काळजीनं विचारलं ः
‘‘काय लागला का न्हाई मेळ?’’
‘‘नाय ना....’’ सुस्कारा टाकून राजाराम म्हणाला. पुन्हा दोघं बराच वेळ बोलले. अर्थात, यंकटच बोलत होता आणि राजाराम ‘हूं हूं’ करत होता. डोकं फटफटत असल्याची जाणीव राजारामला झाली आणि तो यंकटला एकाएकीच म्हणाला ः
‘‘चल बरं, लई टेन्शन आलंय आता... घिऊत उल्शीक...!’’
‘‘काय म्हन्लास? प्यायची व्हय...?’’ यंकट.
‘‘हूं... चल.. त्याच्याबगर जमनार नाय आज...’’ त्यावर यंकटचा नाइलाज झाला. दोघंही उठले अन्‌ अंधारात चाचपडतच गावाबाहेरच्या झोपडपट्टीशी आले. एका कुडाच्या छपरात घुसले. तिथं हलक्‍याशा उजेडात पाच- सात जण पीत बसले होते. हे दोघं त्यांच्या बाजूला बसले आणि...
घडीभरानं दोघं तिथून बाहेर पडले ते अगदी ‘आउट’ होऊनच! शिवाय बडबडतसुद्धा! नशेनं धुंद झालेल्या स्थितीत भेलकांडत मारुतीच्या पारापाशी ते आले. बाजूलाच सुभानरावाचा चिरेबंदी वाडा होता आणि वाड्यातल्या ट्यूबलाइटचा उजेड बाहेर पडला होता. तिथून जाताना राजारामला एकदम जोर आला व तो ओरडला ः ‘‘कुनाच्यात दमंय त्ये बघतो मी... ये म्हनावं आन्‌ धर म्हनावं म्हशीचं दावं... मंग मी हाय अन्‌ त्यो हाय...’’
खरंतर राजारामला धड नीट बोलताही येत नव्हतं; पण त्याला जोर मात्र अधिकच आला होता. त्याचं सुभानरावाच्या घरासमोरच त्याला शिव्या देणं पारावरच्या कुणाच्या तरी लक्षात आलं व एक- दोघांनी राजाराम- यंकटला धरून पारापुढं आणलं. कुणीतरी सखूला ही बातमी देताच ती धडपडत आली. संतापानं तिनं राजारामचा हात धरला अन्‌ त्याला कसंबसं घरी आणलं. तो मात्र बडबडतच होता. शिव्या देत होता. त्याचा कालवा बघून शेजारीपाजारीही त्याच्या वाड्यात गोळा झाले होते. कुणीतरी थंडगार पाण्याची कळशी त्याच्या अंगावर उपडी केली व तो गप्प झाला. त्याचा आरडाओरडा बंद होताच शेजारी पांगले. सखूनं जेवणाचं ताट त्याच्यापुढं आणून ठेवलं; पण बडबडतच त्यानं चार-दोन घास चिवडले अन्‌ तो तिथं भुईवरच आडवा झाला. सखूनं अन्‌ राधानं जेवायची इच्छा नसतानाही बळंच अर्धी कोर खाल्ली. झाकपाक करून माय-लेकी अंथरुणावर पडल्या, तेव्हा पारावरचं कीर्तन संपून गेलं होतं...
***

राजारामला रोजच्या नेमानं पहाटंच जाग आली, तेव्हा सखूचं सडा-सारवण झाल्याचं त्याच्या ध्यानात आलं. तो अंथरुणावर उठून बसताच टकुरं ठणकत असल्याचं त्याला जाणवलं. पोटातही तोडल्यासारखंच होत होतं. पडून राहावंसं वाटत होतं; पण त्यानं विचार बदलला आणि सखूचं ध्यान जावं म्हणून तो मुद्दाम खाकरला. तिनं मात्र त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. त्याला कसंसंच झालं... ‘राती आपुन इनाकारनच दारू ढोसली आन्‌ कालवा केला...’ त्याच्या मनात आलं.
पारापर्यंत आल्याचं त्याला आठवलं; पण पुढं काय झालं ते काही त्याला आठवूनही आठवेना. शेवटी उदास मनानं व पश्‍चात्तापाच्या भावनेनं तो उठला. उगंच घरात आला. राधा अन्‌ पिंट्याकडं नजर टाकली. पुन्हा बाहेर आला. त्यानं न्हाणीतून टमरेल घेतलं व वाड्याबाहेर पडला.
घंटाभरानं जड पावलानं तो आला. हात- पाय धुऊन बाजेवर दात घासत बसला; पण तरीही सखू काही बोलली नाही. मग त्यानं तोंड धुतलं व पुन्हा बाजेवर बसून चहाची वाट पाहत राहिला. सखूनं चहा होताच राधाला बाहेर बोलावलं अन्‌ चहा घेऊन पाठवलं. राधाला घरी बघून त्यानं विचारलं ः ‘‘आज शाळा नाय का दीदी?’’
‘‘सुट्टीया आज....’’ एवढंच ती बोलली अन्‌ घरात गेली. पोरगीसुद्धा आपल्यावर नाराज असल्याचं त्यानं ओळखलं. कसनुशा मनानं त्यानं चहा घेतला. तोंड कसंतरी पडलं होतं म्हणून तो बोलला ः ‘‘अगं, सुपारी तरी दे बरं. असली तर....’’
यावर तणक्‍यातच सखू त्याच्यापाशी आली. तिनं सुपारीचं खांड कमरंच्या पिशवीतून काढून त्याच्याकडं टाकलं अन्‌ म्हणाली ः
‘‘राती कामून मुताड ढोसून धिंगाना केला वं?’’
तिचं बोलणं ऐकून त्याला झपका हाणल्यागत झालं; पण तो वाचा गेल्यागत गप्प राहिला अन्‌ त्यानं खाली मान घातली. जराशानं ती वैतागून म्हणाली ः ‘‘मुताडा ढोसून त्या हैवानाच्या घरापुढी श्‍या द्यायाची काय गरज व्हती...? त्योव बाबा घरी नव्हता म्हून बरं झालं....’’
यावर राजाराम काहीच बोलला नाही. मग सखू पुन्हा कामाला लागली. मात्र, तो चितागतीच बसून राहिला. आपण सुभानरावच्या दारासमोर शिव्या दिल्याचा त्याला आता पश्‍चात्ताप वाटू लागला.... ‘त्योव तसला हैवान आन्‌ आपून त्याला डिवचिलं... आता त्योव काय करतोय आन्‌ काय न्हाई...’ या विचारामुळं भीतीनंच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला... तेवढ्यात दार वाजलं, त्यानं दाराकडं पाहिलं तर सुभानरावचा घरगडी- श्‍यामराव- आलेला दिसला. त्याला पाहून राजारामच्या जिवाचा थरकाप झाला अन्‌ त्यानं आवंढा गिळला...
‘‘राजाराम, मालकांनी आत्ता लगीच वाड्यावर बोलविलंया तुला...’’ श्‍यामराव टेचात म्हणला. क्षणभर काय बोलावं तेच राजारामच्या ध्यानात आलं नाही. बळ एकवटून तो म्हणाला ः ‘‘आंघुळ करून येतो..’’
‘‘आधी चल... उगंच येळ लावू नकू..’’ श्‍यामराव. राजारामनं एकबार सखूकडं पाहिलं अन्‌ पायात बूट घालून तो श्‍यामरावच्या सोबत बाहेर पडला. तेवढ्यात लगबगीनं सखू आली व म्हणाली ः ‘‘ ‘माफी करा’, म्हना... काल माज्याकडून गलती झाली म्हनावं... काय? आन्‌ पाच- चार रोजामदी दामाची यवस्था करतो म्हना...’’
राजारामनं तिच्याकडं रडक्‍या चेहऱ्यानं पाहिलं अन्‌ कसायाच्या मागं ढोर चालत राहावं तसा धडधडत्या मनानं तो श्‍यामरावबरोबर सुभानरावच्या वाड्याकडं निघाला... अवघ्या पाचेक मिनिटात ते दोघं वाड्यासमोर आले. वाड्यातल्या ढाळजंतच पांढरेधोट कपडे घातलेला सुभानराव राजारामला दिसला अन्‌ त्याची धडधड वाढली. त्याला बघून सुभानराव गरजला ः
‘‘राजाराम्या, मधी यंऽऽ’’
त्याच्या जिवाचा थरकाप झाला. तो थरथरत पायऱ्या चढून आत आला व उभा राहिला. सुभानराव जागचा उठला अन्‌ त्यानं राजारामच्या कानफटात एक हाणली. राजारामचा जीव एकदम कळवळला. डोळ्यांसमोर काजवे चमकले. सुभानराव बोट रोखून म्हणाला ः
‘‘दारू ढोसून माझ्या दारासमोर मला शिव्या देतो काय? एवढी हिंमत आली तुला...? हं, चल बोल... आणलेस का पैशेऽऽ ’’
‘‘नाय मालक, एकबार माफ करा... माझ्याकून गलती झाली... मी लई कोशिस केली, परीक पैशाची यवस्था नाय झाली. पुढच्या म्हैन्यात मातर देवाशप्पत देतो...’’ थप्पड बसलेल्या गालावर हात धरत कसनुशा चेहऱ्यानं तो म्हणाला.  - मग तर सुभानराव अधिकच खवळला. दात-ओठ खात तावातावानं तो पुढं येणार, तेवढ्यात श्‍यामरावनं त्याला धरलं व तो म्हणाला ः
‘‘मालक, उगी जिवाचा सनिताप करून घिऊ नगा. दम धरा उल्साक. आन्‌ पुढी काय करायचं त्ये ठरवा आता...’’
सुभानराव ढाळजंत लोडाला टेकून बसत म्हणाला ः ‘‘करतो ना काय करायचं ती... ह्येच्यापाशी माझे द्यायाला पैशे न्हाईत आन्‌ दारू प्येयाला हाईत ह्येच्याकडं पैशे. वा रे.. भाद्दरा... शाम्या, ह्ये बग, आत्ताच्या आत्ता ह्येची म्हैस सोडून आनायची. बास. माझ्या घरापुढं मला शिव्या देतो काय...? सुभानरावचं बोलणं ऐकून राजाराम गळूनच गेला. हात जोडून गयावया करत तो म्हणाला ः
‘‘मालक, गरिबावर असा अन्नेव करू नगाऽऽ माझं चुकलं, मालक...’’
यावर सुभानराव चढ्या आवाजात म्हणाला ः ‘‘गप बस. शब्द बोलायचा न्हाई बग. चल सरक बाजूला. मुताडा ढोसायला पैशे हाईतं तुझ्याकडं... न्हाई रं?’’ आणि सुभानरावानं त्याला दूर लोटलं. श्‍यामरावनं राजारामचा हात धरला व त्याला वाड्याबाहेर आणलं. वाड्याबाहेर दहा-पाचजण गोळा झाले होते आन्‌ फक्त बघत होते. राजारामनं मेल्या नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं आन्‌ जड मनानं तो श्‍यामरावच्या मागं निघाला. एवढ्यात दारात येऊन सुभानराव पुन्हा गरजला ः ‘‘श्‍याम्या, लगीच ये बग... आन्‌ ह्येच्या बायकूनं कालवाफिलवा केला, तरीबी थांबायचं न्हाई.... काय?’’
‘‘जी मालक,’’ श्‍यामराव म्हणाला अन्‌ मस्तीत निघाला. राजाराम त्याच्या मागं फरफटल्यागत चालू लागला.

अवघ्या पाचेक मिनिटांत दोघं राजारामच्या छोट्याशा वाड्यासमोर आले. राजारामनं दार उघडलं. सखू खाली मान घालून भाकरी थापत होती. काहीएक न बोलता राजाराम म्हशीजवळ आला. त्यानं म्हशीचं दावं सोडलं अन्‌ श्‍यामरावच्या हातात दिलं. दावं हातात पडताच श्‍यामरावनं म्हैस ओढायला सुरवात केली. परका माणूस बघून म्हैस ओरडायला लागली. खाली बसलेलं म्हशीचं पिल्लू, वगारही तिचं ओरडणं ऐकून धडपडत, ओरडतंच उठली. श्‍यामराव ओढत होता, तरीही म्हैस जागची हलायला तयार नव्हती. मग श्‍यामरावनं वगार धरली आणि तिलाच ओढायला सुरवात केली. वगार भांबावून वाड्याबाहेर पडताच म्हैसही वाड्याबाहेर आली.
हा सगळा प्रकार पाहणारी सखू लगबगीनं पुढं आली व म्हणाली ः ‘‘श्‍यामदाजी, वगार सोडा म्हन्ते मी...’’

‘‘राजाराम, आवर तुज्या बायकूला. का अजून तमाशा करायचा हाय? आँ?’’ श्‍यामराव गुरकावला.
त्यावर राजाराम पुढं झाला अन्‌ त्यानं सखूला धरलं. वगार मोकळी होताच श्‍यामरावनं पुन्हा धरली. तिच्या पाठीत रट्टा हाणला. वगार ओरडली आणि ओढ बसताच श्‍यामरावबरोबर निघाली. भांबावलेली म्हैस तिच्यामागं ओरडतच पळू लागली... नजरेआड होईपर्यंत राजाराम- सखू म्हशीकडं पाहत राहिले. मग अचानक अवसान गेल्यागत सखू मटकन खालीच बसली अन्‌ तिनं गळा काढला. तिचं रडणं ऐकून शेजारपाजारची बायका-माणसं गोळा झाली. त्यातल्या काहीजणी सखूची समजूत घालू लागल्या.
इकडं राजाराम मात्र दगड-धोंड्यासारखा निश्‍चल होऊन दारापुढच्या ओट्यावर गुडघ्यात मान घालून बसला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com