स्टॉप सेट (उत्तम कांबळे)

स्टॉप सेट (उत्तम कांबळे)

सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करू पाहणाऱ्या घोषणांचा नुसता सुकाळ सदासर्वकाळ सुरू असतो. या घोषणांबाबत शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. इथं बुकांत सामान्य माणूस... धोरणात सामान्य माणूस... निवडणुकांत सामान्य माणूस... पण जगण्याच्या वास्तवात तो कुठंच दिसत नाहीय. बाहेरच्या धावण्याच्या स्पर्धेत ‘ऑन युअर मार्क सेट गो’ असं सांगितलं जातं. इथं सेट, नेट करूनही ‘ऑन युअर मार्क स्टॉप सेट’ असं सांगितलं जातं. शिक्षणक्षेत्र हे सध्या बिनपगारी, बिनचेहऱ्याचं, सतत कोसळणारे गुलाम तयार करणारं झालं आहे. घेतलेल्या शिक्षणाचा आणि वाट्याला आलेल्या नोकरीचा-पगाराचा ताळमेळ इथं कुठंच बसत नाही...

पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून एक मे ते दहा मे १९४७ ला बेमुदत उपोषण करून सानेगुरुजींनी अध्यात्माच्या दारात सामाजिक परिवर्तनाचं चाक फिरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेला मे २०१७ मध्ये ६९ वर्षं पूर्ण होतील. समाज परिवर्तनातली एक क्रांतिकारी घटना म्हणजे हा सत्याग्रह होता. तत्पूर्वी १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर पाच वर्षं चाललेला - गीनिज बुकात नोंद व्हावी असा- सत्याग्रह केला होता; पण एवढं करूनही देवाचा दरवाजा काही उघडला गेला नाही. नंतर मग त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा येवल्यात केली. १९५६ मध्ये बौद्ध धम्मात त्यांनी प्रवेश केला. नवयान सुरू झालं. सानेगुरुजींच्या सत्याग्रहाबाबत तत्कालीन नेते मावळंकर यांच्या मध्यस्थीमुळं महात्मा गांधींनी हस्तक्षेप केला आणि मंदिर खुलं झालं; पण दरम्यान, विठ्ठल बाटायला नको म्हणून धारूरकरशास्त्री नावाच्या एकानं मंदिरातल्या मूर्तीचा पंचप्राण काढून तो पवित्र जलानं भरलेल्या एका बाटलीत ठेवला. ही बाटली आपल्या घरातल्या पडवीत ठेवली. अभय जोशीबरोबर जाऊन मी ही गोष्ट पाहिली होती. धारूरकरशास्त्री आज हयात नाहीत. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, आठ डिसेंबर रोजी पंढरपुरातल्या तनपुरेमहाराज मठात सत्याग्रहाचं स्मारक उभारण्याचा समारंभ झाला. आता हे स्मारक मठातच का, असा प्रश्‍न तयार होईल. त्याचं उत्तर असं, की तनपुरेमहाराजांनी गुरुजींना सत्याग्रहासाठी आपल्या मठात जागा दिली होती. त्याबद्दल त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांचे चिरंजीव बद्रिनाथमहाराज यांनी याच मठात स्मारकाला जागा दिली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक ट्रस्ट स्थापन झालाय. राजाभाऊ अवसर कार्याध्यक्ष आहेत. येत्या १० मे रोजी १० लाखांचा हा स्मारकप्रकल्प आकाराला येणार आहे.

कार्यक्रमानंतर अविनाश शिंदे या धडपड्या कार्यकर्त्याबरोबर मंदिरात गेलो. फारशी गर्दी नव्हती. रांगेतले लोक विठ्ठलनामाचा घोष करत करत एकेक पाऊल टाकत पुढं जात होते. रांगेलाही जणू काही निरलस भक्तीचं रूप प्राप्त झालं होतं. सायंकाळनंतर चहाला जात असताना विनाअनुदानित म्हणजे लाखोंचं डोनेशन देऊन वर्षानुवर्षं फुकटात नोकरी करणाऱ्या शिक्षकांवर चर्चा झाली. शिंदे हा शिक्षकांच्या पतसंस्थेत नोकरी करतोय. त्याला या प्रश्‍नाची खोलवर माहिती आहे. वेठबिगार बनलेल्या या शिक्षकांची संख्या आता लाखाच्या घरात गेलीय. अन्य विभागातले शिक्षक त्यात जमा केल्यास संख्या दोन लाखांच्या घरात जाईल. याचा अर्थ समाज घडवणारे, ज्ञानदान करणारे दोन लाख गुलाम आपल्याकडं आहेत. राज्यघटनेची पंचाहत्तरी साजरी करणाऱ्या देशात हे गुलाम कसे तयार झाले? स्वातंत्र्य-समता-बंधुतेचं नेमकं काय चाललंय हे अजून कुणाच्या लक्षात येत नाही. शासनाला कधीही न येणारी लाज कधीतरी येणार आहे आणि कधीतरी भविष्यात या गुलामांना २० टक्के वेतन मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं त्यांचा विकास होणार आहे. नोटाबंदीचा निर्णय रात्रीत आणि विकास टप्प्याटप्प्यानं...

...तर बोलता बोलता बरंच काही बाहेर पडू लागलं. फुकट नोकऱ्या करणाऱ्यांनी जगण्याच्या काही वाटा काढल्या आहेत. वाट एक ः बरेच शिक्षक शेतमजुरी करतात. ज्यांची शाळा सकाळी असते ते दुपारी आणि ज्यांची दुपारी असते ते सकाळी लवकर तीन तास आणि शाळा सुटल्यावर दोन तास मजुरी करतात. दीड-दोनशे रुपये जमवून चुलीची भूक भागवतात. बरेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या ओळखीनं त्यांच्याच शेतावर मजुरी मिळवतात. वाट नंबर दोन ः काही शिक्षक भाड्यानं रिक्षा-टेम्पो चालवतात. वाट नंबर तीन ः कोकणात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात वेटरचं काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हॉटेलात जेवणाचा आणि निवासाचा प्रश्‍न मिटतो. वाट नंबर चार ः अनेक शिक्षक दुकानात सेल्समन होतात. काही जण सायकलीवरून माल सप्लाय करतात. वाट नंबर पाच ः काही शिक्षक संस्थापकाच्या घरात, बागेत, शेतात काम करतात. वाट नंबर सहा ः काही शिक्षक हे पुढाऱ्यांची संपर्ककार्यालयं चालवतात. घरं भाड्यानं देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या बायका साडीला पिको लावतात. ब्यूटीपार्लर चालवतात. अजूनही काही वाटा आहेत. वाचकांच्या भावना दुखावतील म्हणून त्या इथं नोंदवता येत नाहीत.

काही शिक्षक आपली शैक्षणिक पात्रता वाढवत सेट, नेट, पीएच.डी., एम फिलपर्यंत पोचले; पण बाहेर सहसा नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तर त्या फुकट असतीलच असं नाही. याबाबतच्या कथाही मोठ्या विलक्षण आहेत. पंढरपूरजवळच एका छोट्या खेड्यात एका अपंगाला बारावीनंतर विनाअनुदानित हायस्कूलमध्ये शिपायाची नोकरी मिळाली. सहा वर्षं बिनपगारी नोकरी केल्यानंतर वेतन सुरू झालं. नोकरीनंतर या अपंगानं म्हणजे मोहननं शिक्षण घेण्याचा सपाटा लावला. प्रथम तो बीए झाला. मग बीएड, मग एमए, मग त्यानं सोलापूर विद्यापीठात पीएच.डीसाठी प्रवेश घेतला. संशोधन सुरू होतं. त्यात वडिलाचं निधन झालं. मग संशोधनाकडं दुर्लक्ष झालं. त्यानं दुसरा मार्ग काढला. सेटची परीक्षा पास झाल्यावर प्राध्यापकाची नोकरी लागेल, अशी आशा निर्माण झाली होती. खरंतर डीएड, बीएड झाल्यानंतरच अशी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाची नोकरी त्याला मिळायला हवी होती; पण हायस्कूलमध्ये जागा तयार झाल्या नाहीत. कॉलेजमध्ये प्रयत्न करता येईल, या आशेतून सेटसाठी प्रयत्न सुरू केले; पण यश काही हाताला लागेना. सहा वेळा तो नापास झाला आणि अखेर सातव्या प्रयत्नात तो पास झाला. आता त्याच्या नावापुढं पदव्यांची भली मोठी रांग आहे. नोटांसाठी तयार होणाऱ्या रांगेपेक्षा मोठी. मोहन वाघ ः डीएड, बीए, बीएड, एमए सेट आणि पीएच.डी ॲपिअर... आणि त्याचा हुद्दा आहे शिपाई. ही नोकरी सोडली तर फुकट नोकरी करावी लागेल, याची त्याला जाणीव आहे. डोक्‍यात अनुदानित प्राध्यापकाचं स्वप्न बाळगून तो साफसफाईचं काम करत असतो.

काही शिक्षकांनी भाड्यानं टपऱ्या आणि हॉटेलं चालवायला घेतली आहेत. दोघं-तिघं, चौघं एकत्र येऊन हॉटेल चालवतात. राबराब राबूनही अनेकदा अंदाजपत्रक तुटीचं होतं. टपऱ्या चालवणाऱ्यांचं असंच असतं. काही जण एलआयसीसाठी ग्राहक पकडण्याचा प्रयत्न करतात. काहींनी जमिनींची दलाली सुरू केलीय. काही जण वधू-वर मंडळात काम करतात. काही जण सासऱ्याची शेती करतात. काही जण रसवंतीवर मॅनेजर होतात. हे सगळे उद्याचा नागरिक, उद्याचा समाज आणि उद्याचा भारत घडवणार आहेत; पण भाकरीनं यांचा भुगा करून टाकलाय. शाळेत ईशस्तवन म्हणवून घ्यायचं. प्रीॲम्बल वाचून पोरांना राज्यघटनेचं महत्त्व सांगायचं आणि या व्यवस्थेत आपल्यासाठी स्पेस आहे का हे हुडकत फिरायचं असा हा मामला आहे. ‘इंडिया दौड रहा है’ पण कुठं याचा पत्ता लागत नाही. तो भाकरीतला चंद्र बघण्यासाठी दौडत असेल तर काही खरं नाही.

संगमनेरमध्ये एक तरुण पीएच.डी झालाय. विशेष म्हणजे सेट आणि नेटही झालाय. तो दीड-दोन हजारांच्या नोकरीत अडकलाय. बेरोजगारांना भत्ता देण्याची पद्धत अनेक देशांमध्ये आहे. आपल्याकडं ती नाही. मध्यंतरी प्रयत्न झाला; पण हा भत्ता निघाला शेळीच्या शेपटीसारखा. त्या शेपटीनं लाजही झाकता येत नाही आणि माशीही मारता येत नाही. आपल्या लक्षात येत नाहीय की चौफेर विकासाच्या घोषणांत एक भकास, हतबल आणि आत्मविश्‍वास गमावलेली पिढीही तयार होते आहे. शिक्षण ही विक्रीची वस्तू बनल्यानं शासनाला त्यात काही गुंतवावं असं वाटत नाही. बजेटचा ९६, ९७ वा भाग त्यांच्या वाट्याला येतो. बाकी कॅश अँड कॅरीप्रमाणे शिक्षणाची अवस्था झालीय. सगळ्या बुकांत सामान्य माणूस, घोषणांत, धोरणात, निवडणुकांत सामान्य माणूस; पण जगण्याच्या वास्तवात तो कुठंच दिसत नाहीय. इनव्हिजिबल असा हा ब्रोकन शिक्षक कोणता समाज निर्माण करेल? बाहेरच्या धावण्याच्या स्पर्धेत ‘ऑन युअर मार्क सेट गो’ असं सांगितलं जातं. इथं सेट, नेट करूनही ‘ऑन युअर मार्क स्टॉप सेट’ असं सांगितलं जातं. बघता बघता सगळ्यांनीच खासगीकरण स्वीकारलं; पण हे कसलं खासगीकरण! जे बिनपगारी, बिनचेहऱ्याचं, सतत कोसळणारे गुलाम तयार करणारं... कधीतरी यांच्यासाठीही ‘सेट गो’ म्हणायला हवं. हे सगळं लक्षात घेऊन नाशिकला परतलो. १०-२० फुटांच्या बागेत बळिराजा कामडेकडून लाल माती मागवली होती. ती अंथरण्यासाठी दोन मजूर बोलावले होते. नेहमीचा सहकारी असलेल्या मानवतच्या नारायणाबरोबर हा नवा मजूर आला होता. काम सुरू करण्यापूर्वीच नव्याची ओळख झाली. तो मराठवाड्यातून आला होता. चांगल्या मार्कानं बीए झाला होता. स्पर्धेत डिग्रीच फेल झाली आणि हा बनला बिगारी...त्याचं ऐकून मी डोक्‍याला हात लावला... डिग्रीतली बॅटरी खलास झालीय... ती रिचार्ज करता येत नाहीय... कुणी काढलंय असं उपकरण...?
मी त्याला म्हणालो ः ‘‘थोडं अजून शिकतो का बघ. मीही मदत करतो.’’
तो म्हणाला ः ‘‘जाऊ द्या, शिक्षणावरचा विश्‍वास उडू लागलाय...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com