आयुष्याची कणीक ओली करणाऱ्या कविता (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

शिक्षणाच्या शाळेत जेमतेम सहावी-सातवी शिकलेली ती...पण जगण्याच्या शाळेत? जगण्याच्या शाळेत तिचं भरपूर शिक्षण झालंय... दुःख, संकटं, वेदना, अडचणी या शिक्षकांनी तिला खूप काही देऊ केलंय... आणि तिनंही ते सगळं जपून ठेवत मोडक्‍या-तोडक्‍या शब्दांत गुंफलंय...आयुष्यातले काबाडकष्ट उपसता उपसताच तिच्या हाती कवितेचे मोती लागले आणि हे मोतीच आपल्याला दुःखमुक्त करतील, याची तिला खात्री पटली... जगण्याच्या शाळेत टक्के-टोणपे खाऊन कवितेलाच आपली सखी बनवणाऱ्या एका कवयित्रीची ही ओळख...

शिक्षणाच्या शाळेत जेमतेम सहावी-सातवी शिकलेली ती...पण जगण्याच्या शाळेत? जगण्याच्या शाळेत तिचं भरपूर शिक्षण झालंय... दुःख, संकटं, वेदना, अडचणी या शिक्षकांनी तिला खूप काही देऊ केलंय... आणि तिनंही ते सगळं जपून ठेवत मोडक्‍या-तोडक्‍या शब्दांत गुंफलंय...आयुष्यातले काबाडकष्ट उपसता उपसताच तिच्या हाती कवितेचे मोती लागले आणि हे मोतीच आपल्याला दुःखमुक्त करतील, याची तिला खात्री पटली... जगण्याच्या शाळेत टक्के-टोणपे खाऊन कवितेलाच आपली सखी बनवणाऱ्या एका कवयित्रीची ही ओळख...

आता कसं सागायचं...? काळजात कविता जागी झाली, की लय अस्वस्थ वाटायला लागतं...झालंच तर घालमेलबी होती...रातरात झोप नाही लागत...मधीच उठून बसते...कागदावर एकापुढं एक शब्द लिहिते...कधी कधी कविता पुरी होते, कधी नाही होत...मग पुन्हा झोपायचं...पण डोळा काही लागत नाही...शब्द वळवळायला लागतात...पुन्हा उठायचं...पुन्हा कागद पुढं धरायचा...पुन्हा लिहायचं...घरातले सगळे ‘झोप की आता’ म्हणतात...पण झोपू देईल ती कविता कसली...? ती पुरी झाली...शब्दाला शब्द जुळला...यमकाला यमक जुळलं की होतेच कविता...आणि यमक जुळलं की...एकदा का कविता बाहेर आली, की इतका आनंद होतो, की तो सांगताच येत नाही...कवितेसाठी शब्द असतात; पण आनंद सांगण्यासाठी शब्द नसतात...लय बरं वाटतं, छान वाटतं, आनंद वाटतो, समाधान वाटतं, मन भरून येतं... सगळं विसरायला होतं... अजून काय सांगावं बरं? लय आनंद होतो, साहेब...
शिक्षणातल्या जेमतेम सहा-सात पायऱ्या चढलेली म्हणजे सातव्या बुकापर्यंतच थांबलेली आणि संसारात गुंतून सगळ्या सगळ्या वेदना, धुकं, दुःख, वादळं यांची मालकीण झालेली मालती सुनील आव्हाड जणू कवितेच्या जन्माची चित्तरकथा सांगत होती...ती भल्याभल्यांना सांगता येत नाही...विद्यापीठाच्या थोरल्या-दांडग्या बुकातूनही ती सटकते... मी मी म्हणणाऱ्या भारी माणसांनाही कवितेची जन्मप्रक्रिया पकडता येत नाही आणि एवढंच नव्हे, तर आपण का लिहितो आणि त्याचं काय होतं, हेही सांगता येत नाही... व्यक्त होता आलं नाही तर थोर माणसं मौनात जातात...व्यक्त होण्यासाठी नवी संहिता, नवी मुळाक्षरं जन्माला घालतात...मग व्यक्त होतात...व्यक्त होण्याचा आनंद काय असतो, हे सांगतानाही मालतीची घालमेल होत होती...शब्द जुळत नव्हते, तर काही फितूर होत होते...मध्येच ती क्षणभर शांत व्हायची आणि मग बघता बघता आनदाचं झाड व्हायची...बघता बघता तिच्या ओठातून कविता बाहेर पडायची...‘माझी ही कविता ऐका...ही राहू दे, ही फार सुंदर आहे...ऐका...’कोणती कविता बाहेर काढावी आणि कोणती रोखून धरावी, याचं एक सुंदर कोडं पडायचं आणि हे कोडं सोडवता सोडवता पुन्हा कविता ओठावर यायच्या...

...तर ही मालती...दुःखाचे सगळे डोंगर चढून आलेली...अजूनही चढत राहिलेली...दुःखाचे सगळे खेळ आणि डावपेच तिला ठाऊक...दुःखाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडताना प्रत्येक वेळी तिनं कवितेची मदत घेतलेली...तिचं माहेर खूप सुखात आहे...भरपूर शेती....मळा...सगळं काही होतं तिथं...कशाचीही वानवा नव्हती...माळदुमाला हे वणीजवळच दिंडोरी तालुक्‍यातलं छोटं खेडं...शहराच्या वाऱ्यापासून दूर...मालतीचं शिक्षण सातव्या पायरीपर्यंत पोचलं आणि लेकीसाठी शहरातलं स्थळ मिळतंय म्हणून धूमधडाक्‍यात तिचं लग्न झालं...नवरा शहरात स्वतःची रिक्षा चालवणारा, स्वतःचं घर बाळगून असलेला...रिक्षाची चाकं जशी घुमत होती तसा काळही घुमत होता...मध्येच तो कोलांटउडी मारून पुढं व्हायचा...अशाच एका उडीत मालतीचा नवरा अपघातात सापडला. रिक्षा गेली... सटरफटर कामं तो करू लागला...मालती धुणी-भांडी करण्यासाठी सासूबरोबर जाऊ लागली...माहेरात सुखाचा ढीग आणि सासरी अशा दुःखाच्या दऱ्या... आयुष्य फक्त आणि फक्त चढणीवर लागलेलं... धुण्या-भांड्याबरोबर मालती आणखी कामं करू लागली...कुठल्या कुठल्या संस्थेतही काम करू लागली... होस्टेल, हॉटेल, बॅंका, प्रेस कुठंही मिळंल तिथं भांडी धुण्याची आणि स्वच्छतेची कामं करू लागली... त्यातच ती तीन लेकरांची माय बनली. एवढं मोठं शहर, नेम धरून डंख मारणारी महागाई या सगळ्यात तिला जगायचं होतं. पोरं जगवायची होती. त्यांना शिक्षण देऊन शहाणं करायचं होतं. फाटलेलं आभाळ सांधण्यासाठी फक्त कष्ट आणि कष्ट एवढंच शिल्लक होतं. कंबर बांधून ती लढायला लागली. पोरीचं लग्न तिच्या माहेरच्यांनीच लावलं...मोठा पोरगाही आजोळीच राहतोय...छोटा आईची लढाई बघत बघत मोठा होतोय...रोज पहाटे वर्तमानपत्रं वाटायचं काम तो करतोय. पेपर वाटता वाटताच तो बीकॉम झाला. मुक्त विद्यापीठात एमए झाला. आता यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी दिल्लीत जाऊन अभ्यास करण्याचं तो ठरवतोय. जुळवाजुळव करतोय.
या सगळ्या कष्टाच्या लढाया, कष्टाला स्वतःच्या हातात हात घालून चालवण्याचा प्रयत्न यातून मालतीच्या कविता जन्माला येऊ लागल्या. दिवसभर राबराब राबून रात्री एखादी कविता सुचली की कोण आनंद होतो तिला...!

भरल्या डोळ्याचं पाणी
भिजवतेय कणीक

असं सुख-दुःखाचं नातं सांगणारी आणि आयुष्य बनून डोळ्यातून वाहणारी कविता कणकेत बंद करून कणकेला हवा तसा आकार देणारी तिची कविता जीवनाशी एक अतूट नातं सांगतेय आणि एक भाबडा प्रश्‍नही उपस्थित करतेय...
अरे कवयित्रीच्या वाट्याला
असं कसं रे जीवन?

तिला अजून ठाऊक नाहीय, की वेदना आणि प्रतिभेचा संगम म्हणजेच कविता असते. कवितेला सुखाची ऊब नव्हे, तर दुःखाची सावली लागत असते.
स्त्रीविषयी मालतीच्या खूप उदात्त आणि वस्तुनिष्ठ कल्पना आहेत. शेतीचा शोध स्त्रीच लावते. सगळ्या नात्यांना तीच जन्माला घालते. ही धरणी तीच सुंदर बनवते. पृथ्वीवर माणसाचं जगण्या-मरण्याचं रहाटगाडगं तीच टिकवते, हे सांगताना मालती लिहिते...
स्त्रीची फुलली गती
तिने शोधली शेती
पिकवलं मातीत मोती
निर्माण केली नवी नाती
आणि घडवली संस्कृती

स्त्रीची ही विविध रूपं आदीपासून ते महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पकडण्याचा प्रयत्न तिनं केलाय...

कर्तृत्ववान माणसं, महापुरुष मालतीला खूप भावतात...हे सगळे तिच्या कवितेचे विषय होतात. शब्दाशब्दात चमकत एका माळेचं रूप ते धारण करतात...
ैमैदानावर धावण्याचा सराव करणारी धावपटू कविता राऊत हिला भेटायला मालतीही धावत जाते. सोबत कवितावरची कविता असते. या कवितेवर कविताही सही करते. सावरपाडा एक्‍स्प्रेस बनलेल्या एका आदिवासी मुलीची यशोगाथा म्हणजे ही कविता आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाराज हेही मालतीच्या कवितेत लखलखताना दिसतात. तिच्या कवितेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही आहेत आणि मोदीबाबांची नोटाबंदीही आहे. नोटाबंदीनंतर कसला तरी एक आशेचा किरण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून गरिबांच्या अंधारमय जगात येईल, असं मालतीलाही वाटतंय. मालतीच्या या स्वप्नाला नरेंद्र मोदी यांचं यश म्हणावं लागेल. या स्वप्नाचं गारुड भल्याभल्यांना कळणार नाही. लाल किल्ल्यावरच्या भाषणांवर अजून कुणी पीएच. डी. केलेली नाही, हेही बरंच म्हणावं. गरिबांना रात्रंदिवस अशी उजेडाची स्वप्नं पडत असतात, हे काही खोटं नाही.

मालतीच्या कवितांमध्ये निसर्गही भरून उरलाय. पावसाचं स्वागत तिची कविता करते आणि म्हणते...
पाऊस आला पाऊस आला
ओली झाली ओसाड माळमाती
धरतीमाता हिरवा शालू ल्याली

सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचाही मालतीच्या कवितांवर खूप परिणाम आहे. सावित्रीबाईंच्या शाळेत जाऊन मुली डॉक्‍टर, वकील होतील आणि होत राहतील, असा एक आशावाद तिनं कवितेत जागवला आहे.

मालती कविता दाखवत होती आणि उत्स्फूर्तपणे वाचतही होती. नाशिकच्या ‘मविप्र’मध्ये आदर्श शिशुविहारात ती बऱ्याच वर्षांपासून नोकरी करतेय. या संस्थेचे एक नेते डॉ. वसंतराव पवार यांच्या निधनानंतर मालतीनं डॉ. वसंतराव पवार यांच्यावर एक कविता, पोवाडा लिहिलाय. ‘चैतन्य’ या स्मृतिग्रंथात तो प्रसिद्धही झालाय. प्रसिद्ध झालेली ही तिची एकमेव कविता. शाळेत कोणतेही राष्ट्रीय दिन किंवा महत्त्वाचे सणवार साजरे होवोत...महापुरुषांच्या जयंत्यामयंत्या येवोत... मालती कविता रचणार आणि तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला विनंती करणार ः ‘वाचू का बाई कविता...?’ अर्थात तिला कुणी रोखत नाही... आपली कविता घेऊन ती संस्थेच्या प्रमुख नीलिमा पवार यांच्यापर्यंत थडकली. शाबासकी घेऊन आली.

बराच वेळ माझ्याच घरात मालतीचं एकटीचंच काव्यवाचन सुरू होतं. तिचा मुलगा, तसंच शिक्षक-कार्यकर्ता चंद्रकांत गायकवाडही होता. खरंतर चंद्रकांतनंच बहिणाबाईंच्या या जणू काही छोट्या लेकीला माझ्याकडं आणलं होतं. मालतीचं (मो. ९९२११७४४७१) आता एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे, स्वतःचा काव्यसंग्रह प्रकाशित होण्याचं. मालतीच्या कविता आकृतिबंधात बसत नाहीत. कारण, आयुष्य आणि त्यातलं दुःख कधी आकृतीत बसत नसतं. तरीही मालतीच्या कवितांवर काम हे करावं लागणारच आहे. प्रकाशन मात्र अवघड गोष्ट आहे. तरीही चंद्रकांत आणि त्याच्या मित्रांनी पुढाकार घ्यायचं ठरवलंय. ‘दुःखमुक्‍त होण्यासाठी कविता’ असं एक समीकरण मांडणाऱ्या मालतीच्या कवितांवर शहाण्यांनी सुंदर संस्कार केले, तर तिचीही कविता उजेडात रांगू शकते.