गाढवांनी कचरा टाकू नये! (उत्तम कांबळे)

गाढवांनी कचरा टाकू नये! (उत्तम कांबळे)

स्वच्छता- मग ती घरात असो की सार्वजनिक ठिकाणी असो- ती राखण्याची सवयच असावी लागते. कुणी शिकवून किंवा पढवून, नाना उपक्रम राबवून ही सवय अंगी मुरतेच असं नाही. मग अस्वच्छता हाच स्थायीभाव असणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी काही मंडळी वेगवेगळ्या युक्‍त्या वापरतात. ‘कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल’, ‘दंड ठोठावला जाईल’ ‘हुकमावरून’ अशा युक्‍त्या वापरल्या जातात. मात्र याही युक्‍त्यांना कुणी बधत नाही म्हटल्यावर मग आणखी आक्रमक पवित्रा घेतला जातो... तरीही सवय ती सवयच! आधी मनात जन्मलेली आणि नंतर समाजात फैलावत चाललेली अस्वच्छतेची ही वृत्ती कशी दूर करायची?

कचऱ्याचा ढीग हाच ‘नायक’ असलेली ‘शेवटून आला माणूस’ (‘सकाळ’ प्रकाशन) ही कादंबरी लिहिल्यानंतर तसं माझंही कचऱ्याकडं दुर्लक्षच झालं होतं; पण शेवटी कचरा आणि त्याच्या निर्मूलनासाठी मोदी सरकारनं हाती घेतलेला राष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रम आठवला तो टू व्हीलरच्या एका सर्व्हिस सेंटरमध्ये. ॲक्‍सिलेटरची साडेतीनशे रुपयांची वायर टाकल्यावर खर्च आला तो पाचशेच्या घरात. त्यात लेबर शंभर रुपयांच्या आसपास. ‘एवढा खर्च कसा काय?’ असं कुणी विचारत नाही... उदाहरणार्थ ः ‘ताज हॉटेलमध्ये चहाचा कप पाचशे रुपये का?’ असो. एका अर्थानं हे सर्व्हिस सेंटर वाहन विकत घेतल्यापासून ते मोडीत निघेपर्यंत असं पिळवणूक करत असतं आणि ‘सेवा’ असं एक सुंदर नाव त्याला देत असतं. नवा उच्च ग्राहकवर्ग सेवेचा भुकेला असतो आणि हे सेंटर ती भूक भागवत असतं. असो. ...तर बिल भागवत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे, त्यात अन्य तगड्या करांबरोबरच ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या नावानं सुरू झालेलाही एक कर होता. स्वच्छता ही किंमत चुकवून स्वीकारायची गोष्ट असते, हे करदात्यांच्या मनावर बिंबवलं जात होतं. एवढं करूनही लोकांची मानसिकता तयार होईल, याची खात्री नाही. स्वच्छतेसाठीची किंमत चुकवू शकेल, असा खूप कमी वर्ग आपल्याकडं आहे आणि दिवसाकाठी तीस-चाळीस रुपयेच मिळवून जगणारे ऐंशी कोटी लोक आहेत. अर्थातच, त्यांच्या अर्थसंकल्पात स्वच्छतेऐवजी जगण्याला प्राधान्य असतं. त्याचा परिणाम म्हणजे, शहरात पावलापावलावर उभी राहिलेली मल्टिनॅशनल असलेली स्वच्छताकेंद्रं अजून त्यांना दिसत नाहीत. त्यात प्रवेश करण्यासाठीही खिशात पैसा असावा लागतो. लघुशंकेसाठी दोन रुपये देणं शहरातल्या गरीबवर्गाला परवडत नाही किंवा त्याची मानसिकता त्यासाठी तयार होत नाही. लघुशंकेसाठी रोज पाच-सहा रुपये ही गोष्ट त्या वर्गाला पटत नाही. स्वच्छता हीसुद्धा एक महाकाय इंडस्ट्री आहे, हेही या वर्गाच्या लक्षात येत नाही. शिर्डीत जगातलं सगळ्यात मोठं टॉयलेट कॉम्प्लेक्‍स आहे. रोज पंधरा ते पंचवीस लाखांचा गल्ला तिथं जमत असावा. माणसाला स्वच्छताप्रिय बनवणं, आधुनिक बनवणं यासाठी घोषणा जशा आवश्‍यक असतात, तशी गुंतवणूकही आवश्‍यक असते. अतिरिक्त कर ही त्याची सुरवात असावी.

...तर कचरा गांभीर्यानं आठवण्याचं कारण म्हणजे नाशिकमधला दिल्ली दरवाजा होय. दहीपुलाच्या एका बाजूला मोठ्या इमारतीवर या दरवाजाच्या नावाचा फलक आहे. दिल्लीकर या बाजूनं आत घुसायचे म्हणून हा झाला दिल्ली दरवाजा. या दरवाजापर्यंत येण्यासाठी आणखी एक चौक ओलांडावा लागत असे. त्याचं नाव भडक चौक. अर्थात, तो तसा दर दीड-दोन किलोमीटरवर आहे. दिल्ली दरवाजाजवळच्या इमारतीवर कोपऱ्यात कचऱ्याच्या ढिगाला लागून असलेल्या भिंतीवर ‘कचरा टाकू नये!’ असा मजकूर नेहमीच लिहिलेला असे. याच इमारतीत ‘लोकमान्य टिळक संचालित प्राथमिक शाळा’ आहे. ही खूप जुनी शाळा आचके-उचके घेत आहे.

महापालिकेच्या दृष्टीनं हा बालाजीकोट आहे; पण सध्या केवळ बोर्ड दिसतो. कोटाचं काय झालं ठाऊक नाहीय. ‘कचरा टाकू नये’, अशी सूचना मी स्वतः पंचवीस वर्षांपासून पाहतोय. अवतारसिंग यांच्या दुकानात बसूनही ती सहज वाचता येते. पुढं सूचना बदलत गेली. अधिक आक्रमक होत गेली. तिच्यात विनंतीवजा मजकूरही खूप येऊ लागला. उदाहरणार्थ ः विनंती, नम्र विनंती आणि कळकळीची विनंती वगैरे. या सूचनेला साक्षी ठेवून इथं स्वच्छ भारत अभियान झालं. अजून काही काहीतरी झालं. कुंभमेळ्याच्या मिरवणुका निघाल्या. पुढाऱ्यांचे दौरे झाले. नगरसेवकांनीही स्वच्छतेचं आश्‍वासन दिलं; पण हा कोपरा सगळ्यांना पुरून उरला. कोणत्याही विनंतीला न जुमानता तो वाढतच राहिला. विशेष म्हणजे, या ढिगाला जन्मास घालणारे कुणी बाहेरून येत नाहीत. बाहेरून म्हणजे ‘मनसे’च्या भाषेत यूपी, बिहारी (आता हे शब्द जातिवाचक बनले आहेत) म्हणजेच अमराठी वगैरे. कोपऱ्याच्या आसपास राहणारेच हा ढीग तयार करतात. कचरा टाकण्यासाठी त्यांच्याकडं वेगवेगळ्या युक्‍त्या आहेत. लपत-छपत कचरा टाक, उघडपणे कचरा टाक, बाइकवरून, स्कूटीवरून शायनिंग मारत कचरा टाक, छोट्या पोरांमार्फत कचरा टाक, मोलकरणीला चहा देऊन कचरा टाक...मोजता येणार नाहीत एवढ्या या युक्‍त्या आहेत. ‘कचरा टाकू नये,’ अशी सूचना अगदी कचऱ्याच्या ढिगाला लागूनच आहे. कचरा टाकणारे ती वाचत नसतील असं नाही. शहर साक्षर आहे. सगळेच जण सूचना वाचत असतील. कदाचित स्वच्छ शहराचा संकल्पही मनात करत असतील; पण संकल्प आणि सिद्धी यांची गळाभेट कधी झालेली दिसत नाही.

मग मजकुरातली भाषा थोडी आक्रमक झाली. ‘कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होईल’, मग ‘हुकमावरून’, मग ‘दंड होईल’, मग ‘कचरा टाकणारे नालायक’, मग ‘कचरा टाकणारे मूर्ख’... असा प्रवास करत गेल्या वर्षभरापासून एक वाक्‍य अधूनमधून वळणदार अक्षरांत लिहिलं जातं ः ‘कृपया, गाढवांनी कचरा टाकू नये!’ ...तर असा हा प्रवास आहे. थोडक्‍यात, एक सुप्त संघर्ष सुरू आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात कचरा टाकणारे विजयी होतात आणि विनंत्या करणारे जणू काही पराभूत होतात. माणसापासून गाढवापर्यंत एक भली मोठी उडी घेऊनही कचरा हटत नाहीय. काय कारण असावं? कचरा कुठं जन्माला येत असेल आणि इथंपर्यंत का पोचत असेल? खरंच लोकांना मुद्दामहून कचऱ्याचा ढीग वाढवायचा आहे, की आपल्या घराच्या जवळपास त्याची विल्हेवाट लावण्याची सोयच नसेल? घंटागाड्या गैरवेळेत येत असतील, की वेळेत येणाऱ्या गाड्या लोक चुकवत असतील? आपण आता कर भरतच आहोत, तर कचरा फेकण्याचा अधिकारही आपल्याला लाभला आहे, या गैरसमजातही ते असतील. अनेक प्रश्‍नांच्या ढिगाऱ्यांवर हा कचरा झळकतोय. तो टाकणारे आणि त्याला विरोध करणारे दोहोंपैकी कुणीच अद्याप हरलेलं दिसत नाहीय.
असाच एक दिवस अवतारसिंग यांच्या दुकानातून हा कचरा पाहत होतो. चांगल्या वेशभूषेतला एक प्रौढ माणूस कचऱ्यानं भरलेली प्लास्टिकची पिशवी घेऊन आला. त्यानंही ते वाक्‍य वाचलं. इथं ‘कृपया, गाढवांनी कचरा टाकू नये!’ या वाक्‍यात शिवी, उपरोध, विनंती सगळं काही आहे. मग त्या माणसानं हातातली कचऱ्याची पिशवी फेकली. स्मित करत तो माघारी वळला. ते वाक्‍य वाचल्यानंतर त्याला वाटलं असावं, की हे वाक्‍य आपल्यासाठी नाहीय, गाढवांसाठी आहे आणि आपण तर गाढव नाही आहोत...अजूनही काहीतरी वाटलं असावं. आम्ही कचरा टाकायचा कुठं, हाही प्रश्‍न त्यानं मनातल्या मनात निर्माण केला असावा, असं त्याच्या बॉडी लॅंग्वेजवरून वाटत होतं. खूप दिवसांपूर्वी कचऱ्याला आळा घालण्यासाठी तो फेकला जाणाऱ्या संभाव्य ठिकाणी देव-देवतांची वचनं लिहिली जात. देव-देवतांची चित्रं लावली जात. मात्र, कचरा या सगळ्यांना दाद देत नव्हता. आता गाढवांची मदत घेण्यात आली आहे. कचरा टाकणाऱ्यांना गाढव म्हटल्यावर तरी कचरा टाकायला त्यांना संकोच वाटेल, असं सूचना लिहिणाऱ्यांना वाटत असावं; पण खरंतर गाढवं कधीच कचरा तयार करत नाहीत. ते तो फेकतही नाहीत. कचरा खाऊन, उकिरडे साफ करून ती जगत असतात. कचरा फेकणाऱ्यांना थोडी तरी लाज वाटेल या हेतूनं नवं लेखन केलं गेलं असावं. प्रत्यक्षात कचरा म्हणजे अस्वच्छता. अस्वच्छता ही कधी कधी एक वृत्ती बनते. ती स्वतःच स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधत राहते. बेजबाबदार वागते. आपण साठवत असलेल्या, आपण फेकत असलेल्या कचऱ्याचा उपसर्ग आपल्याप्रमाणेच सगळ्यांनाच होतो, हे ही वृत्ती समजून घेत नाही. ही वृत्ती नदीला म्हणजे आमच्या गोदावरीला देवीही मानते आणि पुलावरून तिच्यात कचराही फेकते. हात जोडून निघून जाते. आता या वृत्तीचं काय करायचं? कर लादून, फलक लावून, गांधीबाबांचं आणि मोदीबाबांचं भाषण ऐकून ती सुधारेल की आणखी काय करावं लागेल? असं म्हणतात की कोणताही कचरा पहिल्यांदा मनात तयार होतो. हे खरं असेल, तर तिथं पोचण्यासाठी काय करायचं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com