कडकलक्ष्मी झाली व्हायरल (उत्तम कांबळे)

uttam kamble's article in saptarang
uttam kamble's article in saptarang

भिकेकंगाल कडकलक्ष्मीचा फॅशनेबल ड्रेसच आपण पाहणार, की आयुष्यच शोषून घेणारी त्यामागची वेदनांची काटेरी जाळीही पाहण्याचा प्रयत्न करणार? ‘सब का विकास’ हे सूत्र कृतीच्या रूपातून या वर्गापर्यंत का पोचत नसावं, असा विचार कधी आपल्या मनात येणार का? एवढा विचार करण्याइतपत का होईना, आपली मानसिकता कधी ‘विकसित’ होईल का?

ता. १९ मार्च २०१७ ला रोहित कसबे यानं एक छायाचित्र पाठवलं. त्याला कुणी पाठवलं होतं ठाऊक नाही. एरवी एखाद्या छायाचित्रावर मी फार काळ रेंगाळत नाही; पण हे छायाचित्र त्यांपैकी नव्हतं. वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण होतं. सर्वप्रथम मी विचार केला, की हे छायाचित्र त्यानं मला का पाठवलं असावं? बऱ्याच वर्षांपासून मी भटक्‍या आणि गुन्हेगार जमातींवर लिहितोय म्हणून कदाचित पाठवलं असावं, अशी मी माझी समजूत करून घेतली. हे छायाचित्र अनेकांना मी स्वतः फॉरवर्ड केलं. बऱ्याच जणांनी उत्तर दिलं, की यापूर्वीच ते त्यांच्याकडं आलं होतं. व्हॉट्‌सॲप वापरणाऱ्यांना तर ते मिळालंच होतं. नव्या भाषेत सांगायचं तर हे ‘व्हायरल’ झालेलं छायाचित्र मलाच उशिरा मिळालं होतं. व्हॉट्‌सॲप वापरत नसल्याचा तो एक तोटा, असं समजून मी ते नीट पाहू लागलो. छायाचित्राच्या अगदी वर ‘सोनी चाळ, कोकणी पाडा, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई’ अशी एक ओळ होती. ती नंतर टाकली की मूळ दृश्‍यातच होती, हे काही कळायला मार्ग नव्हता. प्रथमदर्शनी छायाचित्रात नवं काही वाटलं नाही. एका घरासमोर अगदी चौकटीला खेटून एक तरुणी भीक मागण्यासाठी उभी आहे. गुर्रगुर्र असा आवाज काढणारा ढोलक तिच्या गळ्यात आहे. डोक्‍यावर ठेवलेल्या पाटीत मरीआईची मूर्ती आहे. ‘असं दृश्‍य तर अनेक ठिकाणी दिसतं,’ असं पुटपुटत मी छायाचित्र आणखी नीट न्याहाळू लागलो. छायाचित्राचं वैशिष्ट्य भीक मागणाऱ्या तरुणीच्या वेशभूषेत दिसू लागलं. तिच्या अंगात जीन्सची पॅंट होती. वर लाल रंगाचा अगदी तिच्या देवीच्या रंगाचा शर्ट होता. पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट. मी असा विचार करू लागलो, की भीक मागणाऱ्या बाईनं, देव डोक्‍यावर घेतलेल्या बाईनं इतके फॅशनेबल कपडे कसे काय घातले? अशा कपड्यांमुळं नायिकेसारखी दिसणारी बाई भीक मागण्यासाठी कशी काय उभी? अनेक प्रश्‍नांनी छायाचित्रकाराला छळलं असावं आणि त्यानं हे दृश्‍य टिपलं असावं. पुढं ते व्हायरल झालेलं असावं. व्हायरल झालेल्या गोष्टीचा जनक सहसा दिसत नाही. छायाचित्राचं लोकछायाचित्र होतं. जसं ‘डोंगरी शेत माझं’ या सुर्व्यांच्या कवितेचं आणि ‘पाणी आणायला जाऊ की नको’ या अनुवादित गाण्याचं लोकगीत झालं, तसंच या छायाचित्राचंही झालं असावं.

जीन्सचे कपडे गरिबांना खूप उपयोगी पडतात. ते लवकर फाटत नाहीत. मळत नाहीत आणि मळले तरी मळकट वाटत नाहीत. अशा कपड्यांची उपयुक्तता या लोकांसाठी खूप आहे. आपण ‘फॅशन-डिझाइन’ म्हणून त्याकडं पाहतो आणि हे सगळे लोक टिकाऊ, मळखाऊ आणि देखणं या नजरेतून पाहतात. जे जे आधुनिक तंत्रज्ञान येतं, ते वापरण्यात हा वर्गही पुढं असतो. मोबाईलमुळं भिकाऱ्यांचा, त्यातही भटकणाऱ्या जमातीचा, खूप फायदा झाला. मोबाईल येण्यापूर्वी आपला नातेवाईक भीक मागण्यासाठी कुठं पोचला आणि त्याचं काय झालं, हे तो परत येईपर्यंत कधी कळायचं नाही. मोबाईल सधन वर्गानं जसा वापरायला सुरवात केली तसा बहुरूपी, गोसावी, पारधी, नंदीवाले आदी भटक्‍या जमातींनीही तो वापरून सगळ्यात अधिक फायदा करून घेतला. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशी अंबानींनी दिलेली हाळी या लोकांनी सगळ्यात अगोदर ऐकली असणार. खरं की खोटं मला माहीत नाही. वाचकांनी या विषयात जरूर भर टाकावी. सर्व्हिस सेक्‍टरमधल्या भटक्‍यांना, फिरस्त्यांना, श्रमिकांना लोकेट करण्यासाठीच मोबाईलचा जन्म झाला असं म्हणतात. कदाचित ही अतिशयोक्तीही असू शकते. सगळ्याच अर्थांनी मोठा, महाबलवान असणारा अतिमोठा माणूस कधी हातात मोबाईलचा सेट घेऊन शायनिंग मारताना दिसत नाही. दिसतो ते आपणच. आपली गरज बनलाय हा मोबाईल...तर भीक मागणाऱ्या महिलेनं केलेली अत्याधुनिक वेशभूषा ही तिच्या आत्यंतिक गरजेतून आली आहे. तिच्याकडं मोबाईलही नक्कीच असणार. वस्त्रसंस्कृती, पंजाबी ड्रेसचं असंच आहे. ‘फॅशन ते गरज’ असा प्रवास या ड्रेसनं केलाय.

मरीआई ही अतिशय उग्र देवता असते. पोतराज या नावानं तिचा भक्त ओळखला जातो. या देवीला कडकलक्ष्मी म्हणतात. डोक्‍यावर कडकलक्ष्मी आणि सोबत पोतराज घेऊन येणारी ही बाई मरीआईचं दर्शन घडवते. मोबदल्यात भीक मागते. कधी देवीचा छोटा पेटारा तिच्या डोक्‍यावर असतो, तर कधी पाटीत देवी ठेवलेली असते. मरीआई पटकीची साथ आणते. माणसं मरतात. ग्रामस्थ पोतराजाच्या मदतीनं मरीआईचा गाडा गावाबाहेर करतात. गाव बांधण्याचा कार्यक्रम होतो. आता पटकी राहिली नाही. विज्ञानानं ती पटकन घालवली; पण मरीआईचे उपासक म्हणजे पोतराज शरीरभर कोरडे ओढून, रक्त काढून आपली भक्ती आजही सिद्ध करतात. गावात येऊ पाहणारी व्याधी घेऊन जातात.

छायाचित्र व्हायरल झालं खरं; पण त्याचं पुढं काय होणार? रंजन म्हणून लोक हे सोडून देतील की ‘जगण्यासाठी रक्ताचे शिंतोडे उडवणारे अजून मागासच कसे? धावणाऱ्या भारतात, पारदर्शकतेत, ‘सब का विकास’मध्ये तेही कुठं आहेत’ असा प्रश्‍न विचारतील? ‘सब का साथ; पण सब का विकास कुठंय,’ असंही विचारतील? मला तर काही सांगता येत नाही. भारताच्या भौगोलिक नकाशात ज्यांना गावच नाही (घराचा संबंध कुठं?) असे कोट्यवधी आहेत. त्यांपैकी कडकलक्ष्मी वाहून नेणारी ही एक. खरंतर व्यवस्थेनं आपल्या डोळ्यांवर वाढलेली सत्तेची चरबी थोडी बाजूला केली की हा फोटो दिसतो.

एखादी कलाकृती, एखादं छायाचित्र, एखादी बातमी व्यवस्थेनं नीट समजून घेतली, तर काय चमत्कार घडतो, हे समजण्यासाठी डोरोथी लाँग या जगप्रसिद्ध महिला-छायाचित्रकाराची आणि त्यातही दिव्यांग अशा या महिला-छायाचित्रकाराची आठवण काढायला हवी. ‘कॅमेरा हे असं एक साधन आहे, जे कॅमेऱ्याशिवाय कसं बघायचं ते शिकवतं’ असं न्यू जर्सीची ही छायाचित्रकार सांगायची. लोकवाङ्‌मय प्रकाशनाच्या ‘आपले वाङ्‌मयवृत्त’ या नियतकालिकात जून २०१६ मध्ये तिच्या विषयी एक भन्नाट स्टोरी प्रसिद्ध झाली होती. भाकरीसाठी लेकरं पाठीला घेऊन स्थलांतर करू पाहणाऱ्या फ्लॉरेन्स थॉम्प्सन या मातेचं छायाचित्र लाँगनं जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. त्यामुळं स्थलांतरित होणाऱ्यांसाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवण्याचा दबाव अमेरिकी सरकारवर आला. तसे कार्यक्रमही झाले. अमेरिका खडबडून जागी तर झालीच; शिवाय हे छायाचित्र एका लिलावात दोन लाखांहून अधिक डॉलरला विकलं गेलं. अमेरिकेतल्या पोस्टानं या छायाचित्राचं तिकीट केलं. पुढं फ्लॉरेन्सच्या निधनानंतर तिची मोठी मुलगी कॅथिना हिनं काही आक्षेप घेत ‘माझ्या आईच्या वेदना विकून भलतेच लोक श्रीमंत झाले,’ असं विधान केलं. यावरही खळबळ माजली आणि स्थलांतर करणाऱ्यांच्या कल्याणासाठी लाखो डॉलरची लोकमदतही जमा झाली. एका छायाचित्राचा हा जगभर गाजलेला पराक्रम होता.

भीक मागणाऱ्या महिलेचा फॅशनेबल ड्रेसच न पाहता त्यामागं जमलेली आणि आयुष्य शोषून घेणारी वेदनांची काटेरी जाळीही पाहायला हवी. शरीर फोडून घेणाऱ्या पोतराजाला विकास कळतच नाही की तो त्याच्यापर्यंत पोचतच नाही की तो विकास गतिरोधकांकडून अडवला जातो? आता कपड्यांचं बघा...‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ असो किंवा ‘प्रत्येक कपड्यामागं एक उघडं शरीर’ असं विधान असो; फॅशनेबल कपडा सुरूपताच व्यक्त करतो असं नाही, तर वेदनेनं कुरूप बनलेलं आयुष्यही तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो. छायाचित्र तर व्हायरल झालं, पुढं काय होणार कुणालाच सांगता येऊ नये, अशी आपली व्यवस्था आहे. कदाचित छायाचित्राचा लाभही कुणीतरी करून घेईल किंवा कदाचित ते डिलिटच्या फोल्डरमध्ये पडून विस्मरणातही जाईल. भीक मागणाऱ्याचा फोटोच व्हायरल होणार की वेदनाही...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com