सेवाग्राममधील प्रार्थना आणि चरखा (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

भूमिहीन आणि भूमिसम्राट अशा टोकाच्या विषमतेत विभागलेल्या भारतात दानाचं रूपांतर आंदोलनात करत लाखो एकर जमीन दानात मिळवणारे आणि समाजाचे संस्कार व आध्यात्मिक विद्यापीठ बनलेले संत विनोबाजी भावे यांच्या वर्धा इथल्या पवनार आश्रमात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे विचार कोरलेले आहेत. त्यात एका प्रार्थनेसंबंधीचा विचारही आहे. बहुतेक वेळा प्रार्थना का करावी, हे भल्याभल्यांना कळत नाही. विनोबाजींनी मात्र अतिशय साध्या-सोप्या शब्दांत प्रार्थनेचा अर्थ सांगितलाय. स्नान केल्यामुळं शरीर ताजंतवानं होतं, तसं प्रार्थनेमुळं मन ताजंतवानं आणि शुद्ध होत असल्याचा अनुभव येतो.

भूमिहीन आणि भूमिसम्राट अशा टोकाच्या विषमतेत विभागलेल्या भारतात दानाचं रूपांतर आंदोलनात करत लाखो एकर जमीन दानात मिळवणारे आणि समाजाचे संस्कार व आध्यात्मिक विद्यापीठ बनलेले संत विनोबाजी भावे यांच्या वर्धा इथल्या पवनार आश्रमात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे विचार कोरलेले आहेत. त्यात एका प्रार्थनेसंबंधीचा विचारही आहे. बहुतेक वेळा प्रार्थना का करावी, हे भल्याभल्यांना कळत नाही. विनोबाजींनी मात्र अतिशय साध्या-सोप्या शब्दांत प्रार्थनेचा अर्थ सांगितलाय. स्नान केल्यामुळं शरीर ताजंतवानं होतं, तसं प्रार्थनेमुळं मन ताजंतवानं आणि शुद्ध होत असल्याचा अनुभव येतो. अन्नामुळं शरीराचं पोषण होतं, तर प्रार्थनेमुळं मनाचं पोषण होतं. झोपेमुळं माणसाला आराम मिळतो. झोपेनंतर तो उत्साही होतो; तसंच प्रार्थनेमुळं मनाला आराम आणि उत्साह लाभतो. प्रार्थनेसंबंधीची ही पाटी वाचतच मी आणि राजेंद्र मुंढे आश्रमाच्या आवारातल्या मंदिरात गेलो. तिथून शेजारीच असलेल्या धाम नदीच्या मध्यपात्रात विनोबाजींच्या अस्थी ठेवून अतिशय मोहक स्मारक उभं केलेलं आहे. अगोदर आश्रम फिरून मग तिथं जाऊ, असा विचार करत पुस्तकविक्रीच्या दालनासमोर आलो. विनोबाजींनी सर्व धर्मांवर आणि त्यांच्या ग्रंथांवर अतिशय सुलभ भाष्य करत ग्रंथ लिहिले आहेत. वेद-उपनिषदं आणि गीता हा तर त्यांच्या जीवनाचा अभंग भाग होता. ख्रिस्ती धर्मावर त्यांचं एक पुस्तक आहे. ‘ख्रिस्त धर्मसार’ असं त्याचं नाव आहे. ‘धम्म पदं’ (नवसंहिता) या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथानंही मला आकर्षित केलं. दोन्ही ग्रंथ घेऊन आम्ही आश्रमाबाहेर पडलो. विनोबाजींच्या समाधिस्थळावर आलो. ‘सुबोध बायबल’ हा महाग्रंथ सिद्ध करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना दूरध्वनी करून ‘ख्रिस्ती धर्मसार’विषयी विचारलं. ‘खूपच छान पुस्तक आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. धुळ्याच्या तुरुंगात राहून विनोबाजींनी प्रवचनांच्या स्वरूपात सांगितलेलं आणि सानेगुरुजींनी शब्दांकित केलेलं ‘गीताप्रवचने’ हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं. भुकेल्या हरणामागं लागलेल्या भुकेल्या वाघाची बोधकथा आयुष्यभर लक्षात राहिली होती. समाधी पाहिल्यानंतर गीताईमंदिराला भेट दिली. विनोबाजींची संपूर्ण गीता दगडी शिळेत इथं कोरलेली आहे. तिथं वॉचमन असणाऱ्यालाही गीतेविषयी समग्र माहिती आहे. ‘गीताई’त प्रकरणं किती, ती कोरण्यासाठी नक्षीदार दगड किती लागले, दक्षिणेकडच्या अमराठी माणसानं मराठीतली ही सुंदर अक्षरं कशी कोरली आहेत, याविषयी तो बरीच माहिती देत होता. सोबतीला राजेंद्र होताच. तोही गाईड बनला होता. त्याच्याविषयी एक वाक्‍य लिहायला पाहिजे. वन खात्यात चार रुपये रोजंदारीवर काम करत, आयुष्याला भिडत भिडत तो एमए, नेट आणि आता पीएच.डी. झालाय. त्यालाही गीताईच्या निर्मितीपासून सगळी माहिती तोंडपाठ आहे. जपानी गुरूंनी बांधलेलं स्तूप अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही सारी स्थळं आणि तिथला विचार माणसाला प्रार्थनेकडं घेऊन जातो. महात्मा गांधीजी यांचं १३ वर्षं वास्तव्य असलेल्या आणि ‘छोडो भारत’बरोबर ‘स्वयंपूर्ण खेडं आणि खेड्यांचा भारत’, असं स्वप्न बाळगणाऱ्या सेवाग्राम आश्रमात सायंकाळी होणाऱ्या प्रार्थनेला हजर राहावं, असा विचार बळावू लागला. प्रार्थना वेगळी, धर्म वेगळा, श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी असते. या सगळ्यांची स्पेशल कोल्हापुरी मिसळ कुणी करू नये, अशी अपेक्षा आहे.
सेवाग्राम म्हणजे महात्मा गांधीजींच्या अर्थात्‌ बापूजींच्या स्वप्नातला भारत आहे. तिथलं शिक्षण, समूहजीवन, न्याय पंचायत सगलं काही इंडियापेक्षा वेगळं असावं, अशी कल्पना सेवाग्रामच्या मागं असावी. या ग्रामातल्या लोकांनी जगावं कसं, जगणं आनंदी कसं करावं इथंपासून ते दात कसे घासावेत, आंघोळ कशी करावी इथपर्यंत बापूजींनी सगळं काही नोंदवून ठेवलंय. लोकांना शिकवलंय. ‘जे जे साधं असतं, ते ते सामर्थ्यशाली असतं,’ हे बिंबवण्याचा प्रयत्न इथं पावलोपावली झाला आहे. मी यापूर्वीही एक-दोन वेळा तरी इथं आलो असेन; पण प्रार्थनेला कधी हजर राहता आलं नव्हतं. आज म्हणजे कमी दिवसांच्या फेब्रुवारीत पहिल्याच तारखेला तशी संधी मिळणार होती. वेळेची अडचण होती. वर्ध्याचं साहित्यविश्‍व सुंदर घडवणाऱ्या ‘यशवंत दाते स्मृती संस्थे’तर्फे महाराष्ट्रभरातल्या कवी-लेखकांना पुरस्कार मिळणार होता. तोही आजच्याच दिवशी. पदरमोड करून प्रदीप दाते पुरस्काराची परंपरा चालवत आहेत. दुसरा एक विचार आला, की बापूजींच्या कुटीत आपण कधीही प्रार्थना करू शकतो. या कल्पनेला डॉ. श्रीराम जाधव, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर आदींनी होकार दिला. पंढरपुरात ‘साने गुरुजी स्मारका’च्या पायाभरणीच्या वेळी त्यांची ओळख झाली होती. ती मदतीला आली. विशेष म्हणजे, आश्रमातली प्रार्थना गणितात बांधलेली नाही, ही एक चांगली गोष्ट.
आमच्या खानदानात कमी ऐकायला येण्याची परंपरा आहे आणि ती मलाही लागू आहे, असं जोरात सांगणारा कवी प्रशांत पनवेलकर, मराठीचा प्राध्यापक उल्हास लोहकरे, प्रदीप दाते, राजेंद्र आदी सगळे सेवाग्राम आश्रमात दाखल झालो. आश्रमाचं एक वैशिष्ट्य किंवा रचना म्हणा, तिथं प्रवेश करताच आपल्यात कुठंतरी लपून वास्तव्य करणारा अहंकार गळून पडल्यासारखं वाटतं. दक्षिणेकडून आलेलं एक कुटुंब झाडाखाली बसून प्रार्थना करत होतं. १९३६ मध्ये बापूजींनी स्वतः लावलेल्या आणि मीराबहन यांनी संगोपन केलेला पिंपळवृक्ष आता डौलदार झालाय. सगळ्यांना तो आकर्षित करतोय, तसंच तुळशीच्या रोपट्याचं आहे. एक भारावून टाकणारं, म्हटलं तर मन शुद्ध करणारं वातावरण इथं आहे. बापूजींच्या कुटीत आम्ही पाच-सहा जण प्रार्थनेसाठी बसलो. शेजारी बापूजींची वस्तू ठेवण्याची एक लाकडी पेटी जुन्या वस्तूंसह जतन करून ठेवण्यात आलेली आहे. तीमधला चष्मा चोरीला गेला असून, अजून मिळालेला नाही. ‘रईस’ चित्रपटात असाच चष्मा चोरणारा पोरगा आहे, त्याची आठवण झाली. मातीनं सारवलेल्या जागेवर दोन बोरे अंथरले आणि आमची प्रार्थना सुरू झाली. आश्रमातली एक सेविका शोभा कवाडकर मधुर आवाजात प्रार्थना गात होती. प्रभा शहाणे, अश्‍विनी बघेल साथ देत होत्या. बाबाराव खैरकार, जयवंत मठकर तर होतेच.
‘ओम तत्‌ श्री’ आणि दुसरी एक प्रार्थना झाली; पण मी वाट पाहत होतो, ‘वैष्णव जन तो तेणे कहिए, जो पीड परायी जाणे रे’ या भजनाची. आयुष्यभर बापूजींनी हे भजन म्हटलं होतं. ऐकलं होतं. त्यांच्या कार्यक्रमापूर्वी हे भजन हमखास व्हायचं. नरसी मेहता यांनी हे भजन लिहिलंय.
हे भजन म्हणणारे लाखो लोक तयार झाले होते. नाशिकचे एक कवी किशोर पाठक यांचे वडील गौतमबुवा आणि आई सुशीला यांनीही बापूजींच्या कार्यक्रमात भजनं गायली आहेत. सुशीलाआई जिवंत असताना आणि डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांच्या तोंडून काही ओळी ऐकण्याची संधी मला मिळाली. त्या मोठ्या मनाच्या होत्या. त्यांनी मलाही मुलगा मानलं होतं. ...तर प्रार्थना संपल्यानंतर शांतपणे डोळे उघडले आणि ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ हे भजन म्हणण्याची विनंती केली. दुसऱ्याच्या वेदना जाणणारा किती महान असतो, ही ओळ पुनःपुन्हा आळवली जात होती. प्रार्थना ऐकताना मनात आत खोलवर काही तरी घडत होतं; पण ते नेमकेपणानं शब्दात मला काही मांडता येत नाहीय. क्षमस्व.
प्रार्थना संपवून बापूजींच्या ठिकठिकाणच्या पाऊलखुणा पाहत खादीविक्रीच्या दुकानात पोचलो. वर्ध्यात एक जुनं खादीचं दुकान आहे. तिथं शुभ्र खादीचा दर मीटरला दोन हजार रुपये होता. या खादीचं नाव मोठं मजेशीर आहे. मिनिस्टर खादी! खादीच्या कपड्यातही नेता आपल्या मागं लागतोय, हे काही खोटं नाही. दर आणि मिनिस्टर ऐकताच कापड बाजूला ठेवलं. कुणी आपल्याला म्हणायला नको, की हा मिनिस्टर खादी वापरतोय! सेवाग्राममध्ये दर तुलनेनं कमी होते; पण चरखा महाग होता. चरख्यावरून विषय निघाला. ...तर मठकर सांगत होते, की बापूजींच्या वेळी देशात २२ लाख चरखे होते. त्यातले आता सात लाख शिल्लक आहेत.
मोदी-कुर्त्याची गल्ली-बोळात जाहिरात होत असताना आणि आपल्या धिप्पाड छातीवर पंतप्रधान खादीच खेळवत असताना चरखे कसे बंद पडले, असा प्रश्‍न माझ्यासमोर पडला. कुणी काही म्हणो, गेल्या १० वर्षांपासून (म्हणजे भाजपच्या भाषेत काँग्रेसच्या राजवटीपासून) खादी-ग्रामोद्योगाचं काही खरं नाही. बजेटमध्ये खादीटोपीवरचा टॅक्‍स 
कमी करण्यापलीकडं बाकी ठोस काही होत नाही. एक छोटासा चरखा विकत घेतला. घरात तो शो-पीस म्हणून ठेवण्यासाठी अनेक जण विकत घेतात. चरख्यावरून बापूजींचा फोटो गायब कसा काय झाला, हे भल्याभल्यांना कळलं नाही. प्रत्येक सत्ताधारी पक्ष आपापल्या तत्त्वज्ञानाचा, संस्कृतीचा इतिहास लिहू लागतो आणि मागचा पुसू लागतो. बापूजींचं वेगळं आहे. ते चरख्यावर असले-नसले तरी काही फरक पडत नाही.
‘पागल दौड’ असं शीर्षक असलेला एक फलक आश्रमात आहे. तृष्णेच्या मागं, स्वार्थाच्या मागं लागणाऱ्या लोकांना बापूजींनी कसं सटकवलंय, हे या फलकावरून लक्षात येतं. आपल्या गरजा अनावश्‍यक वाढवत आयुष्यभर त्यामागं धावणाऱ्या लोकांमध्ये एक दिवस असा प्रश्‍न निर्माण होईल, की आपण काय करत आहोत? एकापाठोपाठ अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या. प्रगतीचे मोठमोठे दावे ऐकूनही एक प्रश्‍न निर्माण होतो आणि तो म्हणजे, हे सगळं कशासाठी...? त्याचं प्रयोजन काय? डार्विनचा समकालीन असलेल्या वॉलेसनंही म्हटलं आहे, की गेल्या ५० वर्षांत वेगवेगळ्या शोधांनंतरही मानवजातीची नैतिक उंची एक इंचही वाढलेली नाही. टॉलस्टायही असंच म्हणाला. ख्रिस्त, पैगंबर आणि गौतम बुद्धानंही हीच गोष्ट सांगितली आहे. विकास आणि यंत्राला विरोध नाही, तर कुणी यंत्रमानवाचं अवमूल्यन, त्याची पिळवणूक करणार नाही, अशी व्यवस्था यात अपेक्षित आहे. 
पुन्हा चरखा. ...तर बापूजींचा हा चरखा म्हणजे काही काळाला मागं नेण्याचं चिन्ह नव्हता, तर तो स्वदेशी, स्वयंपूर्णता, स्वाभिमान याचं प्रतीक होता. आता त्याच्यावर बापूजींचा फोटो असो अथवा नसो, मूळ विचारावर काही परिणाम होत नाही. माणूस चित्रातून बाजूला करता येतो; पण मूळ विचारातून आणि चित्र सुंदर करणाऱ्या रंगातून कसा दूर करणार...? व्यवस्था कॅशलेस किंवा नोटलेस (नोटेवर बापूंचा फोटो आहे) केली तरी बापूजींचा फलक बोलायचं काही बंद करणार नाही. ते ऐकण्यासाठी आजही रोज फाटके-तुटके शेकडो लोक आश्रमात येतात. तिथल्या भिंतींना कान लावून बापूजींचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात. मीही तसाच; पण अयशस्वी प्रयत्न केला.