दिवाळी अंक ः एक काढणे (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 8 एप्रिल 2018

नोकरीत असताना जोडधंदा म्हणून हापूस आंबे, उदबत्त्या, फटाके विकणारे किंवा सर्क्‍युलेटिंग लायब्ररी चालवणारे सहकारी आणि विमा पॉलिसी किंवा प्रॉव्हिडंट फंडावर कर्ज काढून स्वतःच्या कवितांचं वगैरे पुस्तक काढणारे अनेक साहित्यप्रेमी भेटले. दिवाळी अंक काढणं ही त्यामानानं महागडी हौस. सन 1988 मध्ये मी ती करून पाहिली.

नोकरीत असताना जोडधंदा म्हणून हापूस आंबे, उदबत्त्या, फटाके विकणारे किंवा सर्क्‍युलेटिंग लायब्ररी चालवणारे सहकारी आणि विमा पॉलिसी किंवा प्रॉव्हिडंट फंडावर कर्ज काढून स्वतःच्या कवितांचं वगैरे पुस्तक काढणारे अनेक साहित्यप्रेमी भेटले. दिवाळी अंक काढणं ही त्यामानानं महागडी हौस. सन 1988 मध्ये मी ती करून पाहिली.

अंक (पुणेरी) काढण्यासाठी नावाचं रजिस्ट्रेशन हवं म्हणून दिल्लीला अर्ज केला; पण बरेच दिवस उत्तर आलं नाही, तेव्हा कंटाळून ग. प्र. प्रधानसरांना जाऊन हे सांगितलं. त्यांनी थेट मधू दंडवते यांना फोन लावला आणि माझी तक्रार सांगितली. पुढच्या आठवड्यात नावाची परवानगी आली. जिल्हाधिकारी कार्यालयात रजिस्ट्रेशन केलं. "आणीबाणी आणि पु. ल. देशपांडे' या विषयावर अंक काढायचं ठरवलं. प्रकाश वेरेकर, तरुण खाटडिया आणि रवींद्र जगताप या तरुण मित्रांनी यात खूप मदत केली.
प्रकाश वेरेकरनं एस. एम. जोशी यांच्याकडून शुभेच्छा देणारं पत्र आणलं. नानासाहेब गोरे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. कुसुमाग्रज, जयवंत दळवी, ग. प्र. प्रधान आणि मंगला गोडबोले यांनी त्यांचं जुनं लेखन पुनर्मुद्रित करायची परवानगी दिली. रवींद्र पिंगे, मंगेश तेंडुलकर, भाई वैद्य, रमेशचंद्र शहा, राधा शिरसीकर यांनी नव्यानं लेखन केलं. मंगेश तेंडुलकर आणि ल. म. कडू यांनी चित्रं काढली.

छायाचित्रं पुरवली आणि अक्षरलेखन केलं. पुण्याचे माजी महापौर पांडुरंग तरवडे, तत्कालीन आमदार विठ्ठल तुपे, ताहेर पूनावाला, अन्वर राजन यांनी जाहिराती दिल्या. "कॉसमॉस', "जनता' आणि "सुवर्ण' या सहकारी बॅंकांनीही जाहिराती दिल्या. मग चकाचक व्हाईट प्रिंट कागद विकत आणून त्यावर हजारभर अंक "साधना'च्या छापखान्यात छापला. कारण, तिथं उत्तम फॉंट उपलब्ध होता आणि त्यांचे छपाईचे दर अंमळ जास्त असले तरी काम सुबक आणि वेळेवर होई. महाराष्ट्रभर साहित्यविश्वातल्या मान्यवरांना अंक पोस्टानं सप्रेम भेट पाठवला. व्हाईट प्रिंटवर छापल्यामुळं खर्च वाढून नंतर डोळे पांढरे झाले होते. जाहिरातींमधून तो खर्च भरून निघाला नव्हता; पण लेखकांनी मानधन न घेता लिहिल्याची खंत होती. मग उरलेल्या कागदातून लेटर हेड्‌स छापून ती त्यांना समक्ष नेऊन दिली. किंचित भरपाई!
दिवाळी अंकानंतर आपला अंक जोरात निघेल-खपेल असं स्वप्न पडलं होतं. म्हणून जानेवारीच्या अंकासाठी विठ्ठल तुपे यांची तत्कालीन राजकारणावर प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. लिहून त्यांना ती दाखवलीही होती; पण पुढं अंक निघाला नाही आणि मुलाखत राहूनच गेली.
या अंकासाठी पु. शं. पतके यांनी एक किस्सेवजा लेख पाठवला होता. त्या वेळी तो इतका स्फोटक वाटला होता की भीतीपोटी मी तो छापला नाही. उदाहरणार्थ ः सन 1950 मध्ये शेठ दालमिया हिंदू महासभेच्या अधिवेशनासाठी पुण्यात आले आणि खरे यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर जाऊन थेट खरे यांच्या खुर्चीतच बसले... गायकवाडवाड्यात गेल्यावर ते टिळकांच्या
फोटोला हार घालायला विसरले... हिंगणे इथं गेल्यावर त्यांनी महर्षी कर्वे यांना त्यांचा पगार विचारला... इत्यादी इत्यादी. आता हा मजकूर वाचून मौज वाटते. सोशल मीडियावर यापेक्षा किती तरी "स्फोटक' असलेलं लेखन सध्याच्या काळात वाचायला मिळतं.

विठ्ठल तुपे यांनी ज्या संस्थेची जाहिरात दिलेली होती, त्या संस्थेकडून बरेच दिवस बिलाची रक्कम आली नाही. दोन वेळा त्यांच्या शनिवार पेठेतल्या घरी जाऊन हे सांगितलं. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा त्यांनी जाहिरातीचे पैसे खिशातून काढून दिले आणि म्हणाले ः "" इथून पुढं यासंदर्भात संस्थेकडं पाठपुरावा करू नका.''
मात्र, काही दिवसांनी संस्थेकडून रकमेचा चेक आला. तो बॅंकेत भरून पैसे काढले. अंक बंद झाल्यामुळं बॅंकेतलं खातेही बंद करून टाकलं
जाहिरातीचे पैसे तुपे यांना परत द्यायला गेलो. ते म्हणाले ः ""पैसे राहू द्या.''
- मात्र, मी पैसे आग्रहानं परत केले आणि त्यांना विनंती केली ः ""पुढच्या आठवड्यात आमच्या घरी गणपती बसणार आहेत. पहिल्या दिवशी तुम्ही पूजेला अवश्‍य या.'' त्यानुसार, गणपतीच्या दर्शनाला विठ्ठल तुपे, डॉ. रमेशचंद्र शहा आणि सदानंद शेट्टी एकदम आले. गमतीचा योगायोग म्हणजे, हे तिघंही त्या वेळी कॉंग्रेसविरोधी पक्षात होते आणि कालांतरानं तिघंही कॉंग्रेसमध्ये गेले. हा अंक पाहून शिरीष पै यांनी मला एक विनंती केली. ती अशी ः "नव्या-जुन्या पिढीतल्या लेखकांकडून लेखन मिळवून आचार्य अत्रे यांच्यावर छोटी पुस्तिका प्रकाशित करावी.' पुस्तिकेसाठी लागणारे पैसेदेखील त्यांनी दिले. दर्जेदार मजकूर मी जमवला; पण पुस्तिकेचं मुखपृष्ठ फसलं. छपाईही मनाजोगी झाली नाही. पुस्तिकेच्या काही प्रती लोकांना पाठवायला सुरवात केली होती; पण छपाई पाहून शिरीष पै खट्टू झाल्या. त्यांच्या सांगण्यावरून उरलेला गठ्ठा बादच केला. मात्र, या घटनेनंतरही आमची मैत्री आणि पत्रव्यवहार शेवटपर्यंत पूर्ववत्‌ राहिला. ओशो यांच्या एका पुस्तकाच्या अनुवादासाठी त्यांनी एका प्रकाशकांना माझं नाव सुचवलं होतं. माझ्या मुलीच्या लग्नाला त्या येऊ शकल्या नाहीत; पण आशीर्वादपर पत्र त्यांनी आवर्जून पाठवलं, हा त्यांचा मोठेपणा.

Web Title: vijay tarawade write article in saptarang