गाणं हे पाण्यासारखं प्रवाही पाहिजे... (विनोद डिग्रजकर)

vinod digrajkar
vinod digrajkar

गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल चांगली खुलते.

माझा जन्म कोल्हापूरचा. माझ्या जन्मापूर्वी चार वर्षं म्हणजे सन 1952 मध्ये माझ्या वडिलांनी (पं. सुधाकरबुवा डिग्रजकर ) "वीणा संगीत विद्यालय' सुरू केलं होतं. या विद्यालयाचं उद्‌घाटन विख्यात संवादिनीवादक, संगीतरचनाकार, रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं. आम्ही भावंडं वडिलांना नाना म्हणायचो. नानांचा शिष्यवर्ग मोठा होता. "गानगुरू' म्हणून त्यांचा लौकिक होता. उस्ताद अब्दुल करीम खॉंसाहेबांचे शिष्य पंडित विश्वनाथबुवा जाधव यांच्याकडं नाना सुरवातीला शिकले होते. संगीतविद्यालयामुळं दिवसभर संगीताचे संस्कार माझ्यावर नकळत होत गेले. शास्त्रीय संगीताच्या प्राथमिक शिक्षणानंतर नानांकडून मी प्रथम नाट्यगीतं शिकलो. मी अगदी लहान वयात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवत असे. बालगंधर्वांचं निधन झाल्यावर पु. ल. देशपांडे व त्यांच्या मित्रमंडळींनी सन 1969 मध्ये "बालगंधर्व संगीत स्पर्धा' आयोजित केली होती. या स्पर्धेत 13 वर्षापासून ते 71 वर्षापर्यंतचे सुमारे 80 स्पर्धक सहभागी झाले होते. त्या वेळी मी 13 वर्षांचा होतो. या स्पर्धेत उल्हास कशाळकर हेदेखील होते. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मात्र आमची निवड झाली नव्हती. याचं नेमकं कारण समजलं नाही, असं समीक्षकांनी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात म्हटलं होतं. या स्पर्धेत सुमती टिकेकर प्रथम आल्या होत्या. अशा काही आठवणींनी गतकाळाला उजाळा मिळतो.

जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचे नाना शिष्य होते. बुवांचा जन्म सन 1912 मधला. सन 1941 पासून नाना बुवांकडं शिकत होते. ते बुवांचे मानसपुत्रच होते. बुवांचं मूळ आडनाव जाधव होतं. सरनाईक हे त्यांचं वतन होतं. भजनसम्राट शंकरराव सरनाईक हे बुवांचे काका. त्यांची एक प्रसिद्ध नाटक कंपनी होती. या कंपनीत संगीतसम्राट उस्ताद अल्लादिया खॉंसाहेब संगीतमार्गदर्शक म्हणून नोकरीला होते. सन 1933 मध्ये त्यांना दरमहा तीन हजार रुपये पगार होता! खरं तर शंकररावांना त्यांच्याकडून गाणं शिकायचं होतं. गंडा बांधायच्या वेळी तर शंकररावांनी खॉंसाहेबांना 11 हजार रुपये गुरुदक्षिणा म्हणून दिले होते; परंतु नाटक कंपनीच्या व्यापात शंकररावांना गाणं शिकायला वेळच मिळाला नाही. मग गाणं निवृत्तीबुवाचं शिकायचे. बुवा सवाई गंधर्व आणि उस्ताद रजब अली खॉंसाहेबांकडंही काही काळ शिकले होते. तर पुढील काळात बुवांकडून किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, जितेंद्र अभिषेकी, प्रभुदेव सरदार, नीलाक्षी जुवेकर, प्रसाद सावकार अशा अनेकांनी मार्गदर्शन घेतलं.

गणित हा माझा आवडीचा विषय होता. 100 पैकी 100 गुण मला असायचे. याचा उपयोग मला तालाच्या गणितात फार चांगला झाला. ज्याचं गणित चांगलं असतं ती व्यक्ती मुद्द्याचं बोलते, पाल्हाळ लावत नाही, असं म्हटल्यास फारसं चुकीचं ठरू नये. म्हणजेच त्या व्यक्तीला जीवनातलं गणितसुद्धा चांगलं समजतं, असं माझं मत आहे. सन 1972 मध्ये मी अकरावी मॅट्रिक झालो. पुढं मला दोन वर्षांनी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश मिळाला. तिथं सन 1977 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं व्याख्यान होतं. व्याख्यानापूर्वी प्रारंभी कॉलेजमधल्या सरांच्या सूचनेनुसार मी "बलसागर भारत होवो... ' हे गाणं म्हटलं. गाणं म्हणताना शेजारी वाजपेयी बसले होते. ही हृद्य आठवण मी फोटोच्या रूपात जपून ठेवली आहे. कॉलेजला असताना शनिवारी आणि रविवारी मी जेव्हा कोल्हापूरला येत असे, त्या वेळी माझी केवळ गाण्याची साधना सुरू असायची. गाणं शिकवण्याची नानांची पद्धत खूप छान होती. सुरवातीला नानांनी मला रागसंगीतावर आधारित असलेली नाट्यपदं शिकवली. स्वतः तबला वाजवून नानांनी मला सर्वप्रथम "पूरिया धनाश्री' हा राग शिकवला. या रागातली "पार कर अर्ज सुनो' ही परंपरागत झपतालातली लोकप्रिय बंदिश नानांनी माझ्याकडून घोटून घेतली होती. यानंतर नानांनी "दुर्गा', "भूप' असे अनेक राग मला शिकवले. सन 1977 मध्ये अखिल भारतीय स्तरावर झालेल्या आकाशवाणी संगीतस्पर्धेत, सुगम संगीत विभागात मला प्रथम क्रमांक मिळाला. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या हस्ते ते पारितोषिक मला मिळालं. केशवराव भोळे त्या वेळी आकाशवाणीवर स्टेशन डायरेक्‍टर होते आणि मधुकर गोळवलकर हे प्रोड्यूसर होते. या दोघांनी केलेल्या कौतुकामुळं मला मोठी प्रेरणा मिळाली. सन 1979 मध्ये मी बीई सिव्हिल होण्यापूर्वीच मला चार ठिकाणांहून नोकरीसाठी बोलावणं आलं होतं. त्या वेळी इंजिनिअर मंडळींची कमतरता असे. मी आयटीसीचा (कोलकता) स्कॉलर बनावं, अशी पंडित निवृत्तीबुवांची इच्छा होती; परंतु एकाच वेळी दोन गोष्टी करणं मला शक्‍य नव्हतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही काळ नोकरी करून नंतर बांधकामक्षेत्रात बिल्डर बनलो. पहिल्या स्कीमला मी "श्री' हे एका रागाचं नाव देऊन माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. याचबरोबर वडिलांच्या नावानं कोल्हापुरात "सुधाकरनगर' वसवलं. या नगरात मी बांधलेल्या गृहप्रकल्पांना रागसंगीताच्या आवडीपोटी "केदार', "कामोद', "कल्याण', "दुर्गा', "बागेश्री', "भूप', "सारंग', "मधुकंस', "हिंडोल' अशी रागांची नावं मी दिली. सध्या आईच्या नावानं मी "सिंधुनगरी'ची निर्मिती करत आहे. त्या गृहप्रकल्पाला मी जयपूर घराण्याच्या "विहंग' या रागाचं नाव दिलं आहे. ही बांधकामक्षेत्रात एक वेगळी ओळख मानायला हरकत नसावी.

दरम्यानच्या काळात मी संगीतविशारद आणि संगीत-अलंकार परीक्षा उत्तीर्ण झालो. पंडित निवृत्तीबुवा सरनाईक नुसतेच गायक म्हणून मोठे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट बंदिशकारदेखील होते. जयपूर घराण्यात पूर्वी अनेक रागांच्या फक्त विलंबित किंवा मध्य लयीतल्या बंदिशी होत्या. द्रुत बंदिशींचं प्रमाण फार कमी होतं. बुवांनी अनेक रागातल्या द्रुत बंदिशी बांधण्याचं मोठं काम केलं आहे. बुवांनी मला मनापासून गाणं शिकवलं. त्यांनी बांधलेल्या स्वतःच्या बंदिशींसह त्यांनी मला "विहंग', "डागुरी', "सांजगिरी', पूर्वी थाटातील "मालवी', "भावसाक' असे अनेक राग शिकवले. "विराटभैरव' या रागाची निर्मिती बुवांनी स्वतः केली होती. प्रचलित रागांव्यतिरिक्त हा मोठा ठेवा बुवांनी मला दिला. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवा म्हणायचे ः ""उस्ताद अल्लादिया खॉंसाहेबांनंतर तानेवर फार मोठा विचार करणारा गायक म्हणजे पंडित निवृत्तीबुवा होत.'' लयीच्या अंगानं जाणाऱ्या त्यांच्या ताना स्तिमित करणाऱ्या होत्या.

सन 1970 मध्ये कोल्हापूरला "देवल क्‍लब'मध्ये अभिषेकीबुवांची एक मैफल मी ऐकली. त्यांनी "जोगकंस' गायला होता. मी या मैफलीनं खूपच प्रभावित झालो. बुवांकडं आपण गाणं शिकायचं, हे मी मनात निश्‍चित केलं; परंतु माझ्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळं मला ते त्या वेळी जमलं नाही. सन 1960 पासून बुवा त्यांचे गुरू पंडित जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडं कोल्हापूरला येत असत. नानांचा आणि बुवांचा दृढ ऋणानुबंध होता. बुवांकडं मी गाणं शिकण्याचा योग सन 1985 मध्ये जुळून आला. अभिषेकीबुवा कोल्हापुरात उस्ताद अजीजुद्दीन खॉंसाहेब ऊर्फ बाबांकडं जयपूर घराण्याच्या दुर्मिळ बंदिशी घेण्यासाठी यायचे (बाबा म्हणजे उस्ताद अल्लादिया खॉंसाहेबांचे नातू आणि उस्ताद भुर्जी खॉंसाहेबांचे चिरंजीव). या वेळी अभिषेकीबुवा गंगावेस इथल्या आमच्या घरात राहायचे. बुवा सायंकाळी मोकळे झाल्यावर मी त्यांच्याकडं गाणं शिकायचो. बुवांनी मला अनेक बंदिशींबरोबरच "जोग' तसंच आग्रा घराण्याचा "खंबावती' राग शिकवला. बुवांच्या गाण्यात भावनाप्रधानता होती. सन 2004 नंतर मी बाबांकडूनदेखील मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मला "संखुरन', "विक्रमभैरव', "शंकर अरन', "बरारी' यांसारखे अनेक राग शिकवले.

सन 1987 मध्ये मी आकाशवाणीचा बी+ दर्जाचा कलाकार असल्यापासून मला आकाशवाणी केंद्रावर शास्त्रीय व सुगम संगीत गाण्याची संधी मिळाली. त्या वेळी एकाच वेळी चार कलाकारांना "चेन बुकिंग' मिळायचं. मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली अशा चार-पाच ठिकाणी एकाच वेळी गाण्याची संधी मिळायची. असं मी नागपूर, पणजी, चंद्रपूर अशा विविध ठिकाणी जाऊन गायचो. दहा वर्षांपूर्वी मी आकाशवाणीचा "ए' दर्जाचा गायक झालो. नुकताच मी आकाशवाणीच्या ऑडिशन टेस्ट घेण्यासाठी रत्नागिरीला गेलो तेव्हा हा माझा आधीचा जीवनप्रवास डोळ्यांसमोरून चित्रफितीसारखा सरकत गेला. गाणं हे पाण्यासारखं प्रवाही राहिलं पाहिजे. या भावनेनं बुजुर्गांनी आपल्याला जे दिलं, ते मी विद्यादानाच्या रूपानं पुढं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. विद्यादानाचा मी एक पैसाही घेत नाही.

परदेशातला एक किस्सा सांगण्याचा मोह मला इथं होतो. सन 2003 मध्ये एका पर्यटन कंपनीतर्फे मी पत्नी मुक्तासह ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. ऑस्ट्रेलिया पाहून झाल्यावर मी माझ्या अगदी जवळच्या मित्राला भेटायला गेलो. मी त्याच्याकडं चक्क एक महिना राहिलो. टूर दिली सोडून. तिथं शनिवार-रविवारसह इतर दिवशीही माझ्या गाण्याच्या मैफली रंगल्या. ऑस्ट्रेलियातले रसिक फक्त सुरांचा आनंद घ्यायचे. अनेकांनी मला घरी जेवायला बोलावून भरपूर प्रेम दिलं. अर्थात ही संगीताची जादू होती. सिडनी आकाशवाणी केंद्रावर माझी मुलाखतदेखील झाली. माझा मित्र मला गमतीनं म्हणाला ः ""विनोद, तुझ्यामुळं माझी इथली प्रतिष्ठा खूप वाढली आहे बरं!' अन्य देशांतही मला गाण्याची संधी मिळाली. सवाई गंधर्व महोत्सव (पुणे, कुंदगोळ), पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव (पणजी), राजर्षी शाहू महोत्सव, कोल्हापूर महोत्सव अशा अनेक मानाच्या संगीतमहोत्सवांमध्ये माझं गाणं झालं, याचं मला समाधान आहे.

माझ्या गाण्यावर निवृत्तीबुवा सरनाईक आणि जितेंद्र अभिषेकी यांचा प्रभाव आहे आणि माझी स्वतःची गाण्याची शैली किराणा आणि जयपूर या घराण्यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. ही नवीन वाट मला नकळत साध्य झाली. गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल चांगली खुलते. यश-अपयश यापलीकडं जाऊन विचार करताना असं जाणवतं, की सध्याच्या काही नवोदित नावाजलेल्या कलाकारांची ज्ञानलालसा, व्यासंग कमी होत आहे. हे मी जरा व्यापक अर्थानं म्हणतो आहे. शनिवारी अथवा रविवारी कलाकारांना कार्यक्रमाच्या दृष्टीनं चांगली मागणी असते; परंतु अभिषेकीबुवा कित्येकदा असे कार्यक्रम नाकारून शनिवारी आणि रविवारी काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या दृष्टीनं कोल्हापूरला येत असत. सध्या कलाकारांचा एकमेकांमधला संवाद कमी होत असून कलाकार आणि आयोजक यांच्यामधला संवाद वाढतो आहे, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे!

(शब्दांकन ः रवींद्र मिराशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com