सुसंवाद

विश्‍वनाथ पाटील
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

दररोजचे कुटुंबातील बोलणे, व्यवहारातील बोलणे, कार्यालयीन बोलणे, मुलाखतीसाठी बोलणे या सर्वच संवादांमध्ये स्वत:ची समज मिसळलेली असणे आवश्‍यक असते. संवाद समजून घेणे आणि समजावून देणे यांमध्ये दोन मुख्य घटकांचा समावेश होतो, ते म्हणजे जे समोरून बोलले जात आहे, ते पूर्ण क्रियाशील अवधानाने ऐकणे आणि मोजके व अचूक बोलणे.

विविध बाबी समजून घेणे हा आपला नित्यक्रम असतो. समजून घेणे म्हणजे आत्मसात करणे असेही म्हणता येते. म्हणजेच जे आपल्याला समजले ते आपलेसे होते. आपण आपल्या वकुबानुसार ते समजून घेत असतो. समजून घेण्याची आपापली स्वत:ची पद्धत असते. म्हणजेच जे जे आपल्याला समजते, ते आपल्या पद्धतीनुसारच आपलेसे झालेले असते. जी गोष्ट आपल्याला समजली ती दुसऱ्यांना समजावून सांगणे सोपे असते. हे सांगणेदेखील आपल्या पद्धतीनुसारच आपण करत असतो. 

समजून घेणे आणि समाजावून देणे या दोन्ही क्रिया दैनंदिन जीवनात नित्याने घडत असतात. संवादाच्या माध्यमातून ही देण्या-घेण्याची प्रक्रिया सदैव सुरू असते. जेव्हा या प्रक्रियेत आपल्या स्वत:ची समज मिसळलेली असते, तेव्हा संवाद प्रभावी होतो. ज्या हेतूने तो केला जातो, तो हेतू सफल होतो. मग संवाद औपचारिक अथवा अनौपचारिक असला तरी फरक पडत नाही. 
दररोजचे कुटुंबातील बोलणे, व्यवहारातील बोलणे, कार्यालयीन बोलणे, मुलाखतीसाठी बोलणे या सर्वच संवादांमध्ये स्वत:ची समज मिसळलेली असणे आवश्‍यक असते. संवाद समजून घेणे आणि समजावून देणे यांमध्ये दोन मुख्य घटकांचा समावेश होतो. ते म्हणजे जे समोरून बोलले जात आहे, ते पूर्ण क्रियाशील अवधानाने ऐकणे आणि मोजके व अचूक बोलणे.

समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असताना संपूर्ण क्रियाशील अवधानता असायला हवी. म्हणजेच समोरच्याचे बोलणे सुरू असताना आपल्या डोक्‍यात कोणतीच विचारप्रक्रिया सुरू नसावी. समोरची व्यक्ती बोलत असताना, कोणताही पूर्वग्रह डोक्‍यात नसावा. म्हणजेच ऐकत असताना आपली पाटी पूर्ण कोरी ठेवून ऐकायला हवे. थोडक्‍यात समोरची व्यक्ती जे बोलत आहे, नेमके तेच ऐकले जायला हवे. न की आपल्याला जे ऐकावे वाटते, ते ऐकले जायला हवे. 

समोरच्याचे बोलणे पूर्ण अवधानाने ऐकल्यानंतर आपली विचारप्रक्रिया गतिमान करायला हवी. नेमके जे बोलले आहे, त्याचा योग्य तो अर्थ लावून ते समजून घ्यायला हवे. जे बोलले आहे, नेमके तेच ऐकून न घेतल्यामुळे वेगळाच अर्थ लावला जाण्याची शक्‍यता वाढते. अशा वेळी आपण बोलताना हा चुकीचा अर्थ डोक्‍यात ठेवूनच बोलले जाते. त्यामुळे संवादाचे रूपांतर विसंवादात होऊ शकते. 

आपण बोलत असताना नेमके व अचूक बोलणे अपेक्षित असते. आपले बोलणे नेमकेपणाने येण्यासाठी त्या विषयाची आपली समज उत्तम असायला हवी. विषयाचे अनेक पैलू समजून घेतले असल्यास आपल्या बोलण्यात नेमकेपणा येणे सोपे जाते. मोजके बोलण्याचाही संबंध विषयाचा आवाका आपल्याला कितपत आला आहे याच्याशी असतो. आपला आवाका जितका मोठा असेल, तितके आपले बोलणे मोजके होत जाते.
आपल्या रोजच्या जगण्यात समजून घेणे आणि समजावून देणे या दोन्ही क्रिया संपूर्ण अवधानाने करण्याची सवय अंगी बाणवायला हवी. एकदा का हे आपल्याला जमायला लागले, की मग आपला प्रत्येक संवाद सुसंवाद होऊ लागतो. आपल्या बोलण्यातून आणि ऐकण्यातून विसंवाद हा शब्दच गायब होतो.

Web Title: Vishwanath Patil article

टॅग्स