साप्ताहिक राशिभविष्य (८ ऑगस्ट २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१)

सध्याचं जग हे विज्ञानावरच चालत असतं आणि माणसाचं मन, बुद्धी आणि अहंकार हे त्रिकूट या विज्ञानाला हाताळत पावलं टाकत असतं!
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

असं हे भक्‍तीचं हृदयारोपण

सध्याचं जग हे विज्ञानावरच चालत असतं आणि माणसाचं मन, बुद्धी आणि अहंकार हे त्रिकूट या विज्ञानाला हाताळत पावलं टाकत असतं! या विज्ञानाच्या चालण्याला अर्थ देणारं किंवा भावनेचा स्पर्श देणारं हे त्रिकूट विज्ञानाचा हात पकडत अक्षरशः कोरडं रोबोटिक जीवन जगत आहे! सध्याचं केवळ यंत्र-तंत्रावर चालणारं हे कोरडं ‘कलियुग’ मन, बुद्धीचा अर्थातच माणुसकीचा जिव्हाळा विसरत अक्षरशः रोबोटिक झालंय! शब्दांचं मार्केटिंग करणारा हा सध्याचा रोबोटिक माणूस सतत संगणकावर किंवा मोबाईलवर क्‍लिक करत असतो!

अनादि असलेल्या या विश्‍वमनाच्या मंचावर माणसांची अनेक मनं आपली नाट्यं सादर करत असतात. विश्‍वमन ही संकल्पना अध्यात्मात रूढ आहे. त्यामुळंच मन ही भगवंताची विभूती आहे. असं हे विभूती असलेलं माणसाचं ‘मन’ जगन्माउलीच्या विश्‍वमनाचा ‘गर्भ’ बनत आपल्या स्पंदनातून आपल्या आईचा जिव्हाळा बाळगून असतं किंवा ते तसं बाळगून राहिलं पाहिजे. अर्थातच, माणसाच्या जीवनाचा गाभारा ज्ञानभक्तीचा देव्हारा होणं आवश्‍यक आहे!

मित्र हो, सप्ताहात असा हा जीवीचा जिव्हाळा जपणारा श्रावण सुरू होत आहे. श्रावणात बुध-बृहस्पती पूजन करतात. अशा या यंदाच्या श्रावणातल्या पहिल्या बुधवारी (ता. ११) बुध-गुरू प्रतियुती होत आहे. ज्ञान आणि विज्ञान भक्तीच्या जिव्हाळ्यातच नांदलं पाहिजे, असंच गीता सांगते. बुद्धीला गुरुभक्तीचा जिव्हाळा लाभल्यावरच माणूस या विश्‍वमनाच्या मंचावर आपलं मनच जगन्माउलीला सांगत या विश्‍वमंचावर आपली प्रपंचाची भूमिका निभावून नेत असतं! म्हणूनच आम्ही म्हणतो, की यंदाच्या श्रावणात ज्ञानभक्तीचा जिव्हाळा जपत आपल्यातील रोबोटिक अर्थातच यांत्रिक माणसामध्ये भक्तीचं हृदयारोपण करूया!

आत्मविश्‍वास वाढवणारा कालखंड

मेष : आजच्या अमावास्येचं एक मळभ राहीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी. बाकी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. ११ व १२ हे दिवस नवा सूर्योदय करणारे. महत्त्वाच्या कामात हात घाला. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहात कलागुणांतून प्रसिद्धी. मुलाखतींमधून यश. बुधाच्या विशिष्ट स्थितीतून आत्मविश्‍वास वाढेल.

नवी क्षितिजं दिसतील, धनलाभही होईल

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात बुध आणि शुक्र यांच्या विशिष्ट ग्रहयोगांतून नवी क्षितिजं दिसून भाग्यसंकेत. ता. ११ ते १३ ऑगस्ट हे दिवस परिसस्पर्शाचे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत प्रसन्नता. आजची अमावास्या विचित्र गाठीभेटींची. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.

नोकरीतलं सावट दूर होईल

मिथुन : बुध आणि गुरू यांच्या विशिष्ट स्थितीतून उत्तम लाभ घेणार आहात. तरुणांनो संधींवर दबा धरून बसा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अमावास्या त्रासाची. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीतील सावट घालवणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ चा दिवस मोठा शुभ!

व्यावसायिकदृष्ट्या मोठे लाभ होतील

कर्क : आजच्या अमावास्येचं एक धोक्‍याचं वळण पार पाडा. बाकी आश्‍लेषा नक्षत्रास ता. ११ व १२ हे दिवस पुन्हा जीवनाच्या खेळात आणतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ. तरुणांना शैक्षणिक यश. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट आर्थिक संकटात गॉडफादर भेटेल. शनिवारी शिवपूजन कराच.

विशिष्ट योगामुळं भव्य यश मिळेल

सिंह : सप्ताहात उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती मोठा बहारीचा काळ अनुभवतील. तरुणांना जीवनसहचरी भेटेल. ता. १० चा मंगळवार मोठे चमत्कार घडवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध आणि गुरू यांच्या विशिष्ट स्थितीतून एखादं भव्य यश मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ चा बुधवारचा सूर्योदय मोठी सुवार्ता घेऊन येणारा. नोकरी मिळेल.

खरेदी -विक्रीचे व्यवहार होतील

कन्या : आजच्या अमावास्येचं व्यावसायिकांच्या बाबतीत एक मळभ राहील. अपरिचित व्यक्तींशी सांभाळा. भुरट्या चोरीपासून सावध. बाकी ता. ११ ते १३ हे दिवस शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून लाभदायी. रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. उत्तरा आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ.

यशाचे चौकार -षटकार मारा

तूळ : आजच्या अमावास्येचं एक धोक्‍याचं वळण पार पाडाल. बाकी बुध आणि गुरू यांच्या विशिष्ट स्थितीतून उत्तम लाभ घ्याल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बॅटिंग फिल्ड राहील. मारा चौकार - षटकार ! ता. १० व ११ च्या वन डे मोठ्या रंगतदार राहतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीत कौतुक होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ च्या वन डेला मोठी शैलीदार फलंदाजी करण्याची संधी!

शुक्रभ्रमणातून मोठे लाभ होतील

वृश्‍चिक : सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्रास शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट भ्रमणस्थितीतून मोठे लाभ होणार आहेत. एकूणच ता. ११ ते १२ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ राहतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह एक एक करिअर पाथ पकडून देईल. झेप घ्याच. आजची अमावास्या तिन्हीसांजेसमयी जपण्याची.

मुलाबाळांसंबंधी चिंता दूर जातील

धनू : सप्ताहात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट यशातून फ्लॅशन्यूजमध्ये येतील. ता. १० व ११ हे दिवस मोठे शुभसंबंधित. मुलाखती द्याच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वरील दिवस व्यावसायिक मोठी प्राप्ती घडवतील. मुलाबाळांच्या चिंता जातील. आजची अमावास्या पूर्वाषाढास चोरीची. वाहनपीडा.

भांडणं टाळा, चोरीपासून जपा

मकर : आजची अमावास्या एक मोठं ग्रहसमीकरण राहील. घरी वा दारी संशयास्पद वागू नका. महत्त्वाचे दस्तऐवज जपाच. पैशांचं पाकीट सांभाळा. बाकी उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ११ चा दिवस मोठा सुंदर. विवाहविषयक गाठीभेटी करा. ता. १३ चा शुक्रवार श्रवण नक्षत्रास अनेक प्रकारांतून यश देणारा. शनिवारी भांडण टाळा.

परदेशी लाभ व परिसस्पर्श होईल

कुंभ : शुक्राच्या योगातून राशीचा नेपच्यून मोठा संवेदनशील राहील. पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या तरुणांना देशी वा परदेशी मोठे लाभ होतील. ता. १० व ११ हे दिवस तरुणांवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रावणसरी बरसवतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजची अमावास्या फसवणुकीची. बाकी नागपंचमीचा शुक्रवार चक्क परिसस्पर्शाचा.

विवाहयोग व शुभ कालखंड

मीन : आजची अमावास्या ओढग्रस्ततेतून नेणारी. अकारण चिंता टाळा. घरातील कामगारांची मनं जपा. ता. १२ व १३ हे दिवस अतिशय शुभसंबंधित. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना चांगलीच इम्युनिटी मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार विवाहयोगाचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com