'क्रोम 55' करेल ब्राऊझिंग वेगवान

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

'क्रोम 55' हे या ब्राऊझरचे नवे व्हर्जन 6 डिसेंबरला बाजारात येणार आहे. बिटा व्हर्जन सध्या उपलब्ध करून दिले आहे. डिसेंबरमध्ये हे व्हर्जन प्रत्यक्ष वापरात आल्यानंतर कमी क्षमतेच्या स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांना त्याचा अधिक फायदा होईल.

न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या ब्राऊझरचे नवे व्हर्जन 6 डिसेंबरला बाजारात येणार आहे.

'क्रोम 55'चे बिटा व्हर्जन सध्या उपलब्ध करून दिले आहे. डिसेंबरमध्ये हे व्हर्जन प्रत्यक्ष वापरात आल्यानंतर कमी क्षमतेच्या स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांना त्याचा अधिक फायदा होईल. तसेच, 'क्रोम'वर एकाच वेळी अनेक टॅब उघडणाऱ्यांनाही 'स्पीड'मध्ये फरक जाणवेल, असा 'गुगल'चा दावा आहे. अर्थात, 4 जीबीपेक्षा अधिक 'रॅम' असलेल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या वापरकर्त्यांना यात लक्षणीय फरक जाणवण्याची शक्‍यता कमी आहे.

'क्रोम 55'मधून 'गुगल'ने या ब्राऊझरचे मेमरीविषयक मुद्दे सोडविण्यावर अधिक भर दिला आहे. याच्या चाचणीसाठी 'गुगल'ने 'फेसबुक', 'ट्‌विटर', 'रेडिट', 'फ्लिपबोर्ड' आणि 'द न्यूयॉर्क टाईम्स' या संकेतस्थळांचा वापर केला. कमी मेमरी असलेल्या स्मार्टफोनमध्ये 'क्रोम 55'मुळे वेगवान ब्राऊझिंग शक्‍य झाल्याचे या चाचण्यांमधून दिसून आले.