डिजिटल स्वच्छतेची गरज

Digital Cleanliness
Digital Cleanliness

ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे, मला जे आवश्‍यक नाही, ते दुसऱ्याच्या परसात टाकणे. मग या येणाऱ्या पोस्ट किंवा बातम्या जर तुमच्यासाठी आवश्‍यक नसतील किंवा तुम्हाला सत्यता पटणारी नसेल तर ती दुसऱ्याच्या परसात, फेसबुक, व्हॉट्‌सॲपद्वारे का टाकावी? जी गोष्ट तुम्हाला पटत नाही किंवा तुमच्या कामाची नाही, ती दुसऱ्याला किंवा दुसऱ्या इतर ग्रुपना पाठवण्याने काय आम्ही कचरानिर्मिती करत नाही काय?

पंतप्रधानांनी अलीकडीच असे विधान केले होते आहे की, डिजिटल माध्यम/सोशल मीडिया इथे फार घाण जमा झाली असून, स्वच्छतेची आवश्‍यकता आहे. सर्व प्रकारचे वाईट व विषारी संदेश कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. 

डिजिटल स्वच्छता म्हणजे काय? आमचे मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप नीट झाडूनपुसून साफ करायचे की काय? ते तर आम्ही नेहमीच स्वच्छ ठेवत असतो. मग डिजिटल स्वच्छता म्हणजे नेमके काय? 

राजा छत्रसालची फार जुनी गोष्ट आहे की, झाड तोडायचे असेल तर फांद्या छाटण्याऐवजी सरळ मुळावरच घाव घाला. झाड मुळापासूनच उपटून टाका. आता ही गोष्ट आम्ही दोन अर्थांनी डिजिटल स्वच्छतेसाठी निगडित करू शकतो. एक म्हणजे, डिजिटल कचराच निर्माण करू नका; जेणेकरून तो स्वच्छ करण्याची गरजच पडणार नाही. दुसरे म्हणजे, कचरानिर्मिती झालीच तर ती वेळीच साफ करा.

डिजिटल कचरा म्हणजे दर दोन मिनिटांनी एक पोस्ट किंवा स्टेटस अपडेट, दर पाच मिनिटांनी व्हॉट्‌सॲप चेकिंग व पोस्टिंग आणि फॉरवर्डिंग, दर अर्ध्या तासाने वेगवेगळ्या वेबसाइट्‌सचे सर्फिंग व डाउनलोडिंग, तासागणिक ई-मेल, फेसबुक, लिंकिंग इत्यादी खात्यांची झाडाझडती म्हणजे थोडक्‍यात काय, यासारख्या अनावश्‍यक कृतींनी चिखल निर्माण करणे. ही संगणकीय वाट पूर्णत: दलदलमय आहे. जितके आम्ही त्यावर चालायचा प्रयत्न करू, तितके आत रुतत जाऊ व शेवटी या दलदलीमधून, संगणकीय कचऱ्यामधून बाहेर येण्यासाठी प्रचंड किंमत मोजावी लागेल.

या कल्पनेचा विस्तृतपणे विस्तार करायचा तर जेवढा वेळ या सोशल मीडियासदृश माध्यमांवर घालवता, तुमच्या भाषेत सत्कारणी लावता, तितकी तुम्ही या सोशल मीडियाला स्वत:बद्दलची माहिती देत असता.
आजपर्यंत आमच्यापैकी किती जणांनी गुगल, याहू, व्हॉट्‌सॲप, फेसबुक हे पैसा कसा कमवतात, याबद्दल माहिती करून घेतलीय? एक तर दुसऱ्याच्या पैशाकडे बघू नये किंवा तो कसा कमावतो याचे मला काय, अशा विचारसरणीमुळे आम्ही मूळ प्रश्‍नालाच बगल देतो.

या मीडियाची रोजीरोटी कशी चालते? आमच्यापैकी बरेच जण उत्तरे देतात- १. ॲडव्हर्टायजिंग, २. डाटा प्लॅनमधून पैसे मिळतात.

आता यातील पहिले उत्तर बरोबर आहे. पण, याप्रमाणे सोशल मीडियाला त्याच्या एकूण उत्पन्नाच्या २०/२५ टक्के कमाई होते. दुसरे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. कारण, डाटा प्लॅन विकून टेलिकॉम कंपन्यांना पैसा मिळतो. त्यातला कोणताही हिस्सा या सोशल मीडियाच्या कंपन्यांना दिला जात नाही.

मग ७५ टक्के उत्पन्न सोशल मीडिया कसे कमावतो?
इथेच खरा वर उल्लेख केलेल्या चिखलाचा संबंध येतो. हा तुमच्या पायधुळीने पावन झालेला चिखल विकून सोशल मीडियाच्या कंपन्या खरा पैसा निर्माण करतात.

पडले ना बुचकळ्यात! ‘कचऱ्यातून कला’ हा विषय कितीही अप्रिय असला तरी सोशल मीडियावाले या धंद्यातूनच कोट्यवधींची (बहुदा हे प्रमाणही कमीच असेल) कमाई करत आहेत.

आता जसे चिखलाची माती बगीच्यासाठी, औषधासाठी, अंगावर लेपण्यासाठी म्हणजेच ब्युटी ट्रीटमेंटसाठी, कुठे भर घालण्यासाठी इत्यादी प्रकारांनी वापरता येऊ शकते, तसेच सोशल मीडिया ही तुमची चिखलमय पाऊलखुणायुक्त डिजिटल कचरानिर्मिती त्यांच्या फायद्यासाठी यथायोग्य ग्राहकांना विकत असते. म्हणजे काय, तुम्ही सोशल मीडियावर ठेवलेले एक छोटेसे पाऊल हे सोशल मीडियासाठी फायद्याचे व तुमच्यासाठी धोक्‍याचे ठरू शकते.

आता आपण तासागणिक कितीतरी कृती या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. फक्त कचऱ्याचाच विचार करायचा झाला तर आम्ही कितीतरी अनावश्‍यक, अपुऱ्या माहिती असणाऱ्या, ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे, मला जे आवश्‍यक नाही, ते दुसऱ्याच्या परसात टाकणे. मग या येणाऱ्या पोस्ट किंवा बातम्या जर तुमच्यासाठी आवश्‍यक नसतील किंवा तुम्हाला सत्यता पटणारी नसेल तर ती दुसऱ्याच्या परसात, फेसबुक, व्हॉट्‌सॲपद्वारे का टाकावी? जी गोष्ट तुम्हाला पटत नाही किंवा तुमच्या कामाची नाही, ती दुसऱ्याला किंवा दुसऱ्या इतर ग्रुपना पाठवण्याने काय आम्ही कचरानिर्मिती करत नाही काय?

थोड्या वेळेपुरते सोशल मीडियाच्या आर्थिक कमाईबद्दल बाजूला सारले तरी अशा पोस्टमुळे किंवा फॉरवर्डमुळे आम्ही काही नुकसान किंवा धोकादायक कृत्य करीत आहोत का, याचा तरी विचार करा. अगदी अलीकडचेच उदाहरण घ्या. ‘रविवार, २ सप्टेंबर २०१८ पासून बॅंका सलग आठवडाभर बंद राहणार आहेत’ हा संदेश ५-२५ ग्रुपवरून तसेच २०-२५ हितचिंतकांनी पर्सनल मेसेजद्वारे पाठविला होता. आता या मजकुराची सत्यता पडताळून पाहण्यापेक्षा तो पुढे पाठवण्यातच धन्यता मानणारे समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात हातभार लावत होते.

उदाहरणे अनेक देता येतील; पण आम्ही बोध घ्यायला तयार आहोत का? कचरानिर्मिती ही दुसऱ्यांच्या मजकुरांमधून होते, माझ्या संदेशांमधून नाही, अशा विचारसरणीची सरशी असल्यामुळे सोशल मीडियावर सध्या अतिशय गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणजे कचरानिर्मिती न होऊ देणे. थोडक्‍यात काय, आम्ही सायबर योद्‌ध्यांनी कोणतीही अनावश्‍यक, अप्रमाणित, असत्य, सदोष माहिती पुढे जाण्यापासून रोखणे व ती नष्ट करणे. यात दोन्ही उद्देश म्हणजे कचरानिर्मिती न होणे व झालीच तर वेळीच तिचा निपटारा करणे. 

याही पुढे जाऊन डिजिटल स्वच्छता म्हणजे बदनामीकारक, जातीय तणाव निर्माण करणारा, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारा कोणताही संदेश आम्ही स्वत: प्रसारित न करणे व आमच्यापर्यंत झालाच तर त्याला तेथूनच नष्ट करणे.

सोशल मीडिया हे माध्यम आता अप्राप्य राहिले नाही. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या ध्येयाने प्रेरित झालेल्या कंपन्या भारतातील नागरिकांची डाटाची भूक भागवत आहेत. पूर्वी डाटा प्लॅन घेताना विचार (खिशाचा) करावा लागायचा. आता डाटा प्लॅन घेताना याच पैशात याहून अधिक डाटा प्लॅन कोणता आहे, हा विचार करावा लागतो. म्हणजे, व्यक्तींसाठी एक शौचालय नसेल, पण ती व्यक्ती प्रतिदिन डिजिटल कचरानिर्मिती करू शकते, एवढी प्रगती आमच्या देशाने निश्‍चितच केली आहे. बरं, आता संपूर्ण डिजिटल इंडिया प्रतिदिन १ जीबी कचरानिर्मिती करत असते तर काय त्यातले सर्वच सुजाण नागरिक आहेत? या वापरकर्त्यांपैकी किती लोक या कचऱ्याला कसे टाळता येईल, याचा विचार करू शकतात?

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, जिथे जिथे फ्री वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तिथे त्या सुविधेचा वापर ८० टक्‍क्‍यांहून अधिक अश्‍लीलता प्रसारित करण्यासाठी होत असतो. हा सरकारी अहवाल आहे. मग अशा प्रकारच्या वापरातून लोकांची मानसिकता बदलणार, लोकांच्या वासना चळवणार व परत अशा प्रकाराने सोशल मीडियावर कचरानिर्मिती सुरू होणार.

विषय गंभीर आहे. यावर विचारमंथन होणे अतिशय गरजेचे आहे. या सोशल मीडियांच्या अतिवापरामुळे निरनिराळे आजार होत आहेत. मानसिक तणाव निर्माण होत आहे. संगणकीय गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. 

आम्ही सर्वांनी या अतिडाटाच्या नादापायी जी कचरानिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे, ती कुठेतरी थांबविणे गरजेचे आहे. आम्ही वापरकर्तेच यावर वेळीच विचारमंथन करून उपाययोजना करू शकतो. समुद्रमंथनातून अमृत निर्माण होते; पण हलाहल आमच्या वाट्याला उरत आहे. पण, हे ‘स्लो पॉयझनिंग’ असल्यामुळे याचा परिणाम दिसायला बराचसा काळ जाऊ द्यावा लागेल. पण, तोपर्यंत विनाश झाला असेल.

निर्धार करा की, डिजिटल कचरा निर्माण करणार नाही आणि कोणी केलाच तर त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावू.

(लेखक संगणकीय कायदातज्ज्ञ आहेत.)
mahendralimaye@yahoo.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com