ड्रोनच्या 'टोळधाडीं'कडून मदतीचा हात! 

drone
drone

ड्रोनच्या मदतीने रुग्णांना मदतीपासून पिझ्झाच्या डिलिव्हरीपर्यंतची कामे केली जातात, हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधत हजारोंच्या संख्येने उडणाऱ्या ड्रोनच्या झुंडींचे (स्वॉर्म) तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याद्वारे शेतीपासून संरक्षणापर्यंतची कामे करता येणार आहेत. ड्रोनच्या या 'टोळधाडी'विषयी... 
 
ड्रोनला रिमोटद्वारे नियंत्रित करून अनेक कामे करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. हेच ड्रोन आता आकाराने अधिक लहान, स्वस्त, स्वतःभोवती फिरू शकणारे व विशेष म्हणजे एकाच वेळी शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने उडत लक्ष्यावर "टोळ धाड' टाकणारे होत आहेत! हे ड्रोन अनेक ठिकाणी मनुष्याला पर्याय ठरणार आहेत. मनुष्याचे प्राण वाचण्यापासून शत्रूवर हल्ला करण्यापर्यंतचे त्यांचे उपयोग समोर आले असून, या तंत्राचा उपयोग अनेक ठिकाणी सुरूही झाला आहे. शहरांमधील गल्ली-बोळांत फिरून गुप्त माहिती गोळा करणे, शत्रूच्या रणगाड्यावर एकाच वेळी हल्ला करीत त्याला नामोहरम करणे किंवा एखाद्या लढाऊ जहाजाला चौफेर हल्ला करीत उद्‌ध्वस्त करण्याचे काम हे झुंडीमध्ये येणारे ड्रोन करू शकतात. हे सर्व ड्रोन एकमेकांना माहिती पुरवू शकतात, न धडकता पुढे जाऊ शकतात आणि केवळ एकच ऑपरेटर त्यांच्याकडून सर्व कामे विनासायास करून घेऊ शकतो.

एका लढाऊ विमानाला क्षेपणास्त्राने खाली पाडू शकते. मात्र, अशा हल्ल्यात या हजारो ड्रोनपैकी काही नष्ट झाले, तरी हल्ला सुरूच राहू शकतो. 
या वर्षाच्या सुरवातीलाच लेडी गागाच्या "लाइव्ह शो'दरम्यान 300 ड्रोनच्या मदतीने आकाश दिपवून टाकण्यात आले होते, तर इंटेलच्या कार्यक्रमात ड्रोनच्या मदतीने आतषबाजी करण्यात आली होती. चीनमध्येही एक हजार ड्रोननी आकाशात देशाचा नकाशा तयार केला व "ब्लेसिंग' हे पात्रही साकारले. ड्रोनच्या या झुंडी पाइपलाइनमधील दोष शोधणे, कारखान्यांच्या महाकाय चिमण्यांची दुरुस्ती करणे, हव्या त्याच झाडांना पाणी देणे व रोगी झाडांवर औषधांची फवारणी करणे अशी किचकट कामेही करू शकतील. सौरऊर्जेवर चालणारे ड्रोन विकसित करण्यातही संशोधकांना यश आले आहे. 
डेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी हातात मावणारे "पॉकेट ड्रोन' विकसित केले असून, ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उपयोगात आणले जाईल. हे ड्रोन भूकंपामध्ये कोसळलेल्या इमारतीमध्ये प्रवेश करून हीट सेन्सर्सच्या मदतीने अडकलेल्या लोकांची माहिती मदत पथकाला देतील. अशाच प्रकारचे ड्रोन रस्ता चुकलेल्या गिर्यारोहकांच्या मदतीसाठीही वापरले जातील. त्यापुढे जाऊन भविष्यात हे ड्रोन कीटकांचे कामही करतील! हार्वर्ड विद्यापीठातील "रोबो-बी' या प्रकल्पातून तयार होणारे कागदापेक्षा हलके ड्रोन हवामानाचा अंदाज घेण्याबरोबरच मधमाश्‍यांप्रमाणे परागीभवनाचे कामही करतील. 
युद्धाचे निकष बदलणार? 

अमेरिकेने नुकतेच "पर्डिक्‍स' नावाचे अगदी हलक्‍या वजनाचे 103 ड्रोन जेट विमानांच्या मदतीने आकाशात सोडले. शत्रूच्या रडार संरक्षण यंत्रणेला जॅमर लावण्याचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर शत्रूची रडार यंत्रणा शोधून तिला नष्ट करण्यासाठीही या "झुंडी'चा वापर केला गेला. एखाद्या मिशनवर गेल्यावर गरजेनुसार वेगळे होणाऱ्या आणि नव्या टीमने येऊन हल्ला करणाऱ्या ड्रोनचे सॉफ्टवेअरही अमेरिकेचे संरक्षण दल विकसित करीत आहे. जमीन, आकाश व पाण्यात एकाच वेळी हल्ला करणारे ड्रोनही अमेरिका विकसित करीत आहे. सैनिकांच्या आधी हल्ला करून शत्रूची ठिकाणे शोधणे, त्यांचे नुकसान करणे व जमल्यास हल्ला करण्याचे कामही हे ड्रोन करतील. यातून युद्धाचे भविष्यातील निकषच बदलणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com