भारतीय विद्यार्थ्यांचे फेसबुकला आव्हान!

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

कोण आहेत याचिकाकर्ते? 
सिंह हा 19 वर्षांचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तर श्रेया सेठी या ही 22 वर्षांची विद्यार्थीनी आहे. वापरकर्त्याच्या माहितीची सुरक्षा, गोपनियता अबाधित राहण्यासाठी आम्ही याचिका दाखल केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - फेसबुक आणि व्हॉटसऍप वापरणाऱ्या लाखो युजर्सच्या माहितीच्या सुरक्षेला धोका असल्याचे म्हणत व्हॉटसऍपच्या नव्या सुरक्षाविषयक धोरणाला दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

कर्मण्य सिंह सारीन आणि श्रेया सेठी या दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. व्हॉटसऍपने नवे सुरक्षा धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) मागे घेण्याची मागणी करत या विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने सरकारला मेसेजिंग ऍपसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या संदर्भात भारत सरकार आणि दूरसंचार नियामक मंडळाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी या महिना अखेरीस होणार आहे. 

काय आहे व्हॉटसऍपची नवी प्रायव्हसी पॉलिसी? 
व्हॉटसऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉटसऍपवरील माहिती फेसबुकला वापरता येणार आहे. या माहितीचा उपयोग संबंधित युजर्सला त्याच्या फेसबुक न्यूजफीडमध्ये जाहिराती दाखविण्यासाठी केला जाणार आहे. म्हणजे एखादा युजर व्हॉटसऍपवर त्याच्या मित्राशी एखाद्या मोबाईल कंपनीविषयी किंवा अन्य कोणत्याही उत्पादनाविषयी चॅट करत असेल तर त्या युजर्सच्या फेसबुक न्युजफीडमध्ये संबंधित मोबाईल कंपनी किंवा उत्पादनाची जाहिरात त्याला दिसेल. दरम्यान या पॉलिसीमध्ये व्हॉटसऍपने कोणत्याही युजरचा मोबाईल क्रमांक कोणालाही दाखविला जाणार नाही, तो क्रमांक जाहिरातदारांना दिला जाणार नाही किंवा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी अशा क्रमांकांची विक्री केली जाणार नसल्याचे व्हॉटसऍपने स्पष्ट केले आहे.