चेन्नईत आजपासून रंगणार विज्ञानमेळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे : इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल शुक्रवारपासून (ता. 13) चार दिवस चेन्नईत रंगणार आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी उद्युक्त करणे या हेतूने या विज्ञानमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे : इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल शुक्रवारपासून (ता. 13) चार दिवस चेन्नईत रंगणार आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी उद्युक्त करणे या हेतूने या विज्ञानमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

अण्णा विद्यापीठ, सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, स्ट्रक्चरल इंजिनियरिंग रीसर्च सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी आणि आयआयटी मद्रास या संस्थांमध्ये विज्ञानमेळ्यांतरर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान भारती यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. यापूर्वीचे असे दोन विज्ञानमेळावे दिल्लीत आयोजित केले गेले होते. 

पाणी, ऊर्जा, अन्न, पर्यावरण, हवामान, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात भारतापुढे आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचे रुपांतर स्टार्ट अप आणि उद्योगांसाठीच्या नव्या कल्पनांमध्ये झाले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून हे साध्य करता येऊ शकेल. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा एक भाग म्हणून इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताने 2010 ते 2020 हे दशक नवोन्मेषाचे दशक म्हणून यादृष्टीने आधीच जाहीर केले आहे. 

खोल सागरातील संशोधन, केंद्र सरकारच्या कार्यक्रमांची माहिती युवकांपर्यंत पोचवून त्यांच्यात चेतना निर्माण करणे, विज्ञानग्राम - संसदेपासून पंचायतीपर्यंत, विज्ञान प्रसार करण्यासाठी सामाजिक संघटनांची बैठक, महिला शास्त्रज्ञांची परिषद, विज्ञानशिक्षकांची कार्यशाळा, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात सुसंवाद, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग प्रदर्शन, राष्ट्रीय स्ट्रार्ट अप  परिषद असे विविध कार्यक्रम या विज्ञानमेळ्याअंतर्गत होणार आहेत. संशोधन आणि विकास क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने सुमारे 44 देशांबरोबर करार केले आहेत. 

उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती
इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांना बहुतेक सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूही या विज्ञानमेळाव्यासाठी चेन्नईला येणार आहेत.