Marathi news on science and technology Vaibhav Puranik writers about AI
Marathi news on science and technology Vaibhav Puranik writers about AI

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा नोकऱ्यांवर परिणाम 

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी एक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रचंड प्रमाणात नोकऱ्या जाणार असल्याचा उल्लेख आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कार्ल फ्रे आणि मायकल ऑझबॉर्न या दोन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे, की अमेरिकेत सध्या उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांपैकी तब्बल 47 टक्के नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अथवा ऑटोमेशनमुळे पुढील वीस वर्षात जाण्याची शक्‍यता आहे. त्यांनी हे संशोधन अमेरिकेवर केले असले, तरी ते कुठल्याही पाश्‍चिमात्य प्रगत देशांना लागू पडेल असे असल्याचे त्यांनी ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. स्वयंचलित कारने केलेली प्रगती सर्वज्ञात आहे. अमेरिकेत मिळणाऱ्या अनेक महागड्या गाड्यांमध्ये आजही काही प्रमाणात स्वयंचलन यंत्रणा असते. पुढील दहा ते पंधरा वर्षांत ही स्वयंचलन यंत्रणा वाढून गाड्यांना चालकाची आवश्‍यकताच राहणार नाही. त्यामुळे टॅक्‍सी व उबर चालकांच्या सर्व नोकऱ्या जाण्याची शक्‍यता आहे. जी गोष्ट सर्वसामान्य गाड्यांची, तीच ट्रकचीही! स्वयंचलित ट्रकवरही मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून ट्रकही पुढील दशकात स्वयंचलित होतील. त्यामुळे ट्रकचालकांच्या नोकऱ्या जातील. व्होल्वो कंपनीने या वर्षीच्या मे महिन्यामध्ये कचरा वाहून नेणाऱ्या आपल्या स्वयंचलित ट्रकचा व्हिडिओ लोकांना दाखवला. हा ट्रक स्वतःच जिथे कचऱ्याच्या पेट्या असतील तिथे आपोआप थांबतो. तसे झाले तर कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांत काम करण्यासाठी कमी लोक लागतील. हे फक्त तंत्रज्ञानाच्या एका छोट्याशा भागातील प्रगतीमुळे होईल.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये काही महिन्यांपूर्वी मी एका वेटर नसलेल्या उपाहारगृहात गेलो होतो. तिथे तुमचे क्रेडिट कार्ड वापरून मेनूवरील पदार्थ मशीनकडून विकत घेऊ शकतात. अशी अनेक मशिन्स तिथे बसवलेली होती. आपण आत जायचे, मशीनला काय हवे आहे ते सांगायचे आणि मशिन तो पदार्थ पुढच्या मिनिटभरात बनवते आणि तुमच्यापुढे ठेवते. तो पदार्थ घेऊन हवे तिथे बसायचे आणि खाऊन झाल्यानंतर आपले आपणच सर्व कचऱ्यात टाकून द्यायचे. वेटर किंवा सर्व्हिसची गरजच नाही. आता विचार करा, की अशा प्रकारची हॉटेले सर्रास वाढू लागली तर किती लोकांच्या नोकऱ्या जातील? जे कुणी वेटर अथवा स्वयंपाकी म्हणून हॉटेलात काम करत आहेत अशा सर्व लोकांच्या नोकऱ्या जातील. "अॅमेझॉन', अमेरिकेच्या सिएटल शहरात "ऍमेझॉन गो' नावाच्या सुपरमार्केटची चाचणी घेत आहे. या दुकानात तुम्ही जायचे, हवे ते घ्यायचे आणि कुठल्याही रांगेत उभे न राहता दुकानातून बाहेर पडायचे. संगणकीय व्हीजन तंत्रज्ञान व वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर वापरून "अॅमेझॉन'ने आपोआपच तुम्ही काय खरेदी केले आहे, हे ओळखण्याची व्यवस्था केली आहे. दुकानातून बाहेर पडल्याबरोबर "अॅमेझॉन' तुमच्या क्रेडिट कार्डावर तुम्ही घेतलेल्या वस्तूंचे पैसे चार्ज करते. अशा प्रकारची दुकाने सर्वत्र येऊ लागली तर किती लोकांच्या नोकऱ्या जातील? जे कुणी सुपरमार्केटमध्ये कॅशियरचे काम करतात त्यांची गरजच उरणार नाही. 

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नक्की एकूण नोकऱ्या जातात का हे पाहणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया शेकडो वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये इकॉनॉमिक्‍स मासिकात याची चांगली उदाहरणे आहेत. जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर युरोपात औद्योगिक क्रांती झाली. टेक्‍स्टाईल मिलमध्ये मशिन आल्यामुळे अगणित हातमाग कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. तंत्रज्ञानातील विविध प्रगतीमुळे नोकऱ्या जाणे सुरूच राहिले. 1928 च्या एका न्यूयॉर्क टाईम्सची हेडलाइन - March of Machines makes idle hands - यंत्रांच्या चढाईमुळे हात रिकामे! अशी आहे. संगणक बाजारात यायला सुरवात झाल्यानंतर साठच्या दशकात अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्यापुढील मोठे आव्हान हे नोकऱ्यांचे होते. 1964 मध्ये तीन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी अमेरिकन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना लिहिलेल्या पत्रात यंत्रामुळे समाजाची दोन भागात विभागणी होईल असे लिहिले आहे - शिक्षित खास लोक व अशिक्षित कामगार. 1980 च्या दशकात पर्सनल कॉम्प्युटर आल्याने तोच प्रकार पुढे सुरू राहिला. परंतु असे असले तरीही "एमआयटी'चे अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड ऑटर यांच्या मते भूतकाळातील यांत्रिकीकरणामुळे एकूण नोकऱ्यांची संख्या कमी झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे यंत्र एखादी गोष्ट जलद व स्वस्त करू लागले की त्याच्या आजूबाजूची कामे करण्यासाठी अधिक लोक लागत. तसेच उत्पादन स्वस्त झाले, की त्याची मागणी वाढून त्यामुळेही अनेक नवीन नोकऱ्या तयार होत. उदाहरणार्थ 19 व्या शतकात हातमाग जाऊन यंत्रमाग आले तेव्हा एक विणकर एका तासात जितके कापड विणत होता त्यापेक्षा पन्नास पटीने जास्त कापड विणता येऊ लागले. एक यार्ड कापड विणायला लागणाऱ्या श्रमांमध्ये 98 टक्के बचत होऊ लागली. परंतु मशिन चालवता येईल, ते रिपेअर करता येईल हे जाणणाऱ्या लोकांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. एकंदरीत कापड स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने लोक कपडे जास्त वापरू लागले. अधिकाधिक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बाजारात येऊ लागले. विणकरांच्या नोकऱ्या कमी झाल्या तरी कपड्यांविषयीच्या इतर क्षेत्रात - उदाहरणार्थ फॅशन डिझायनिंग, टेलर या नोकऱ्यांची वाढ झाली. अजून एक उदाहरण म्हणजे कोळशावर चालणारे विद्युत निर्मिती प्रकल्प, इतर प्रदूषण न करणारे पर्यायी तंत्रज्ञान आल्याने बंद पडत चालले आहेत. परंतु जसजसे हे प्रकल्प बंद होत आहेत तसतसे सोलार पॅनेल लावू शकणारे, ते डिझाईन करू शकणारे व ते बनवू शकणारे कौशल्य आवश्‍यक असणाऱ्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. म्हणजेच तंत्रज्ञानामुळे एकूण नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप मात्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. 

मग महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे स्वयंचलित कार आल्याने ड्रायव्हर लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कुठल्या इतर क्षेत्रात त्यामुळे नवीन नोकऱ्या तयार होतील? या ड्रायव्हर लोकांनाच त्या नवीन नोकऱ्या करणे जमेल काय? या प्रश्‍नाचे नक्की उत्तर देणे कठीण आहे. संगणकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम लिहू शकणाऱ्या नोकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वयंचलित कारचे सॉफ्टवेअर बनवायला काही हजार प्रोग्रॅमरची आवश्‍यकता असली, तरी त्यामुळे ज्या ड्रायव्हरचा रोजगार जाईल त्यांची संख्या मात्र लाखांच्या किंवा कोटींच्या घरात असू शकेल. मग स्वयंचलित कारमुळे इतर कुठल्या क्षेत्रात नक्की नोकऱ्या तयार होतील हे आज सांगणे कठीण आहे. कदाचित कारमध्ये करायला काहीच नसल्याने लोक कारमध्ये पुस्तके वाचतील व पुस्तक प्रकाशनच्या क्षेत्रात नोकऱ्या तयार होऊ शकतील. लोक कारमध्ये बसून आपल्या ऑफिसचे काम करतील किंवा कारमध्ये न्याहारीही करतील! त्यानुसार वेगवेगळ्या सेवा तयार होऊ शकतील. परंतु त्याची नक्की दिशा काय असेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच ज्या ड्रायव्हरचा रोजगार जाणार आहे त्यांना नक्की कुठल्या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले तर त्यांचा निभाव लागेल हे ही सांगता येत नाही. समजा तुम्हाला नक्की समजले की स्वयंचलित कारमुळे पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या तयार होणार आहेत तरी किती ड्रायव्हरना पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात नोकरी करणे शक्‍य होईल? पुस्तक प्रकाशनाचा आणि ड्रायव्हिंगचा फारसा संबंध नाही. त्यामुळे ड्रायव्हर लोकांना नवीन निर्माण झालेल्या रोजगाराचा फायदा घेता येणार नसेल तर त्या लोकांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्‍यता आहे. 

मग ड्रायव्हर मंडळींनी नक्की काय करायचे? कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांनी नक्की काय करायचे? त्यातल्या काही लोकांमध्ये वेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण घ्यायची क्षमता असेल; पण ज्यांची नसेल ते लोक काय करतील? त्यांनी बंड केले तर? त्यांनी आपल्या प्रश्‍नाचा दोष तंत्रज्ञान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर टाकला तर? कदाचित त्यातून दंगली, जाळपोळ, खून असे प्रकारही होऊ शकतील. एका नव्या प्रकारच्या नक्षलवादाचा जन्म होऊ शकेल. सामाजिक शांतता धोक्‍यात येऊ शकेल. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी अनेक तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा पुरस्कार करू लागले आहेत. सीएनबीसीला गेल्या नोव्हेंबरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत टेस्ला व स्पेस एक्‍स कंपनीचा सीईओ एलान मस्क याने युनिव्हर्सल बेसिक इन्कमला पाठिंबा दिला होता. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे सरकारने अथवा (इतर कुठल्याही संस्थेने) एखाद्या देशाच्या सर्व नागरिकांना दरमाही त्यांच्या प्राथमिक गरजा भागतील एवढे पैसे देणे. बेसिक इन्कमच्या पुरस्कर्त्यांच्या मते, अशा प्रकारच्या दरमाही उत्पन्नामुळे गरिबी संपूर्णपणे नष्ट होऊ शकते. जर हे उत्पन्न दारिद्य्र रेषेच्यावर असेल तर देशात कुणीच दरिद्री उरणार नाही. जेमतेम पोट भरता येईल इतकेच उत्पन्न असल्याने ज्या लोकांना अधिक सोयीसुविधा हव्या असतील ते लोक त्यासाठी कष्ट करतील - इतर काम करून पैसे मिळवतील. अर्थातच या संकल्पनेत त्रुटीही भरपूर प्रमाणात आहेत. काही लोकांच्या मते, यामुळे काही लोक आळशी बनतील. दोन वेळा पोट भरले तर कोण कशासाठी जास्त काम करेल? तसेच भारतासारख्या देशात सव्वाशे कोटी लोकांना बेसिक इन्कम द्यायचे म्हटले, तर किती पैसे लागतील? हे पैसे देणार कोण? भारतामध्ये आधीच लोक टॅक्‍स भरत नाहीत, त्यातून यासाठी नवीन टॅक्‍स भरायला लागला तर तो कोण भरणार? तसेच हे इन्कम सर्वत्र सारखे असून चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात जिथे महागाई आहे, तिथे ते जास्त असावे लागेल आणि एखाद्या गावात ते कमी असावे लागेल. अनेक लोकांनी आपले कष्ट करायला लागणाऱ्या नोकऱ्या सोडून घरी बसायचे ठरवले तर? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. ग्लासगो विद्यापीठातील सयांतन घोशाल यांनी बेसिक इन्कमविषयी या पूर्वी संशोधन केले आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या बेसिक इन्कममुळे ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांनी प्रशिक्षण घ्यायला मदत होईल व प्रशिक्षण घेता आले नाही तरी ते जगू शकतील. परंतु घोशाल यांच्या मतेही अशा प्रकारच्या इन्कमसाठी पुरेसे पैसे जमा करणे खूपच कठीण आहे. अमेरिकेत आजही लोकांना बेकारी भत्ता मिळतो. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची नोकरी गेली तर पुढची नोकरी मिळेपर्यंत तुम्हाला सरकार काही पैसे दरमहा देते. अर्थातच हा भत्ता तुम्हाला काही महिनेच मिळतो - तो कायम मिळू शकत नाही. तसेच हा भत्ता मिळत असताना तुम्ही नोकरी शोधत आहात ते तुम्हाला सिद्ध करावे लागते. दर काही दिवसांनी सरकारी कचेरीत जाऊन तुम्ही नवीन नोकरी शोधण्यासाठी काय प्रयत्न करत आहात ते सांगावे लागते. अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना बनवणे हाही एक उपाय आहे. पण त्यासाठीही सरकारांना अधिक पैसे लागतीलच. मायक्रोसॉफ्टचा कर्ता बिल गेट्‌स याने अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी "रोबो टॅक्‍स' लावायची संकल्पना मांडली आहे. जर एखादी व्यक्ती एक लाख रुपयांचे काम वर्षाला करत असेल आणि त्याच्याकडून सरकारला वीस हजार टॅक्‍स मिळत असेल तर एखाद्या रोबोने अथवा मशिनने एक लाख रुपयांचे काम केल्यावर त्याच्याकडूनही (म्हणजेच त्या रोबोच्या मालकाकडून) वीस हजार टॅक्‍स घेतला तर? त्यातून मिळणाऱ्या करउत्पन्नातून ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा लोकांना प्रशिक्षण अथवा भत्ता देता येईल. 

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नोकऱ्यांची वानवा हा पुढील काही दशकातील ज्वलंत प्रश्‍न असेल असे तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग पाहता मलाही वाटते. माझ्या मते, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय या समस्येतूनच झाला आहे. अमेरिकेतील नोकऱ्या चीनला गेल्या नसून त्यापेक्षाही जास्त अमेरिकेतील नोकऱ्या तंत्रज्ञानामुळे गेल्या आहेत. म्हणून या समस्येचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com