मोबाईल जाहिरातींवर खर्च होणार 4200 कोटी!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

ई-कॉमर्सस, बॅंकिंग, आर्थिक सेवा आणि विमा कंपन्या मोबाईल जाहिरातीत अग्रेसर आहेत. आता एफएमसीजी कंपन्यांनदेखील या प्रकारचे जाहिरात धोरण अवलंबिण्याचा विचार करीत आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली - शहरी आणि ग्रामीण भागात स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने उत्पादनांची आणि सेवेची जाहिरात करणारे उद्योजक, व्यावसायिक आता मोबाईलद्वारे करण्यात येणाऱ्या जाहिरातींकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळेच चालू वर्षअखेर मोबाईल माध्यमांत केलेल्या जाहिरातींवरील खर्च 4 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 

दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांनंतर मोबाईल हे तिसऱ्या क्रमांकाचे जाहिरातींचे माध्यम बनत आहे. तेथील जाहिरातींचे प्रमाणही वाढत आहेत. या वर्षअखेर मोबाईल जाहिरातींवर 4 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झालेला असेल, तर 2018 पर्यंत हीच उलाढाल 10 हजार कोटींवर पोचेल असे मोबाईल मार्केटिंग असोसिएशन (एमएमए) आणि ग्रुप-एमने केलेल्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

जरी खर्च वाढत असला तरीही मोबाईल मार्केटिंगची नेमकी पद्धत कंपन्यांमध्ये रुजलेली नाही. ई-कॉमर्स, बॅंकिंग, आर्थिक सेवा आणि विमा कंपन्या मोबाईल जाहिरातीत अग्रेसर आहेत. आता एफएमसीजी कंपन्यांनदेखील या प्रकारचे जाहिरात धोरण अवलंबिण्याचा विचार करीत आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.