तुमची नोकरी धोक्यात का येऊ शकते?

Robot
Robot

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्राची झपाट्याने होणारी प्रगती आणि परिणामी दैनंदिन व्यवसायात रोबोटिक्सचा वाढता वापर पाहता, नजिकच्या भविष्यात नोकऱयांमध्ये माणूस नावाच्या कामगारासाठी विशिष्ट कोटा राखून ठेवण्याची वेळ येणार आहे. इंटरनॅशनल बार असोसिएशनने (आयबीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. 

'आयबीए'ने केलेल्या सर्वेक्षण करून यासंदर्भात अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, पदवीधारक व्यक्तींना मिळणाऱया सर्वसाधारण नोकऱया झपाट्याने मशिन किंवा सॉफ्टवेअर्सकडे वळतील. सध्याच्या नोकऱयांमधील कायदेशीर बाबी आणि सुरक्षितता वेगाने निरुपयोगी ठरत आहे, असा इशाराही अहवालात दिला आहे. गरीब, विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत असल्यामुळे विकसित देशातील उद्योग तिकडे स्थलांतरीत झाले. तथापि, वाढते रोबोट उत्पादन आणि विकसित संगणक प्रणालींमुळे येत्या काळात गरीब, विकसनशील अर्थव्यवस्थांना धक्का बसू शकतो. उद्योग-व्यवसाय मानवी हस्तक्षेप कमी करून रोबोट आणि संगणक प्रणालींचा वापर वाढवू शकतात, असे अहवालामध्ये म्हटले आहे. 

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत याविषयावर झालेली चर्चा:

विनाचालक कार बनविण्याच्या प्रयत्नांना जगभरात मिळत असलेल्या यशाचे उदाहरण 'आयबीए'च्या अहवालात दिले आहे. जर्मनीमध्ये चालकाला ताशी 40 फ्रँक (सुमारे 2,600 रुपये) मिळतात. चालक रोबोट असेल, तर हा खर्च तासाला 5 (सुमारे सव्वा तीनशे रुपये) ते 8 फ्रँक (सुमारे 520 रुपये) इतकाच येऊ शकतो. 'चीनपेक्षा स्वस्तात रोबोट उत्पादन करू शकतात. रोबोट आजारी पडत नाही. त्यांना मुले होत नाहीत. ते रजेवर जाणार नाहीत. संप करणार नाहीत आणि हक्काच्या रजांचीही त्यांना आवश्यकता नाही,' असे अहवालात म्हटले आहे. 

रोबोट वापराच्या कायदेशीर परिणामांवर 'आयबीए'च्या 120 पानी अहवालात विस्तृत चर्चा केली आहे. नोकरी-व्यवसायातील कायदे तज्ज्ञांनी हा अहवाल बनविला आहे. जगभरातील कायदे तज्ज्ञांची 'आयबीए' ही शिखर संस्था असल्याने अहवालात संभाव्य जागतिक परिस्थितीबद्दल भाष्य केले आहे. 

'आयबीए'ने आगामी बदलांना 'औद्योगिक क्रांती 4.0' असे नाव दिले आहे. या आधीच्या क्रांत्यांमध्ये औद्योगिकीकरण, विद्युतीकरण आणि डिजिटायझेशनचा समावेश होतो. 'औद्योगिक क्रांती 4.0 मध्ये प्रामुख्याने शारीरिक आणि सॉफ्टवेअरच्या कामांचे एकात्मिकरण (इंटिग्रेशन) होत जाईल. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात हा बदल घडून येईल. अॅमेझॉन, उबर, फेसबुक, 'स्मार्ट फॅक्टरीज्' आणि थ्री-डी प्रिंटिंग ही त्याची सुरूवात आहे,' असे 'आयबीए'ने म्हटले आहे. 

'आयबीए'च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि नोकरी-व्यवसायातील कायदे तज्ज्ञ गर्लिंड विस्करशन हे या अहवालाचे प्रमुख संपादक-संकलक आहेत. 'माणसांच्या सध्याच्या नोकऱया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटमुळे धोक्यात यायची शक्यता आहे. माणसांच्या कामाच्या अधिकाराचे कायदे कुचकामी ठरू लागण्याचे दिवस फार दूर नाहीत. त्यामुळे नवे कामगार कायदे निर्माण करण्याची कधी नव्हे एवढी तातडीची आवश्यकता आज आहे,' असे विस्करशन यांचे मत आहे. 

ते सांगतात, 'कोणत्या नोकऱया माणसांनीच कराव्यात, याचे निर्णय जगभरातील सरकारांनी घ्यायला हवेत. उदाहरणार्थ: लहान मुलांची काळजी घेण्याची नोकरी केवळ माणसांसाठीच राखीव ठेवता येईल. प्रत्येक क्षेत्रात माणसांना नोकऱयांसाठी विशिष्ट कोटा ठेवावा लागणार आहे. अधिक सुरक्षितता म्हणून उत्पादनांवर 'मेड बाय ह्युमन्स' असे लेबल छापले पाहिजे. मशिनद्वारे बनविलेल्या उत्पादनांवर अधिक कर आकारण्याचा विचारही करावा लागेल.' 

रोबोट वापरणारे 'टॉप थ्री' देश

  1. दक्षिण कोरिया : दर 10 हजार कामगारांमागे तब्बल 437 रोबोट दक्षिण कोरियात वापरले जात आहेत. 
  2. जपान : रोबोटिक्समधील अग्रगण्य संशोधन करणाऱया जपानमध्ये दर 10 हजार कामगारांमागे 323 रोबोट सध्या आहेत. 
  3. जर्मनी : दर्जेदार इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या जर्मनीमध्ये सध्या दहा 10 हजार कामगारांमागे 282 रोबोट काम करत आहेत. 

कोणते व्यवसाय लवकर धोक्यात येतील?

  • अकाऊंटस् 
  • न्यायालयातील लिपिक
  • डेस्क ऑफिसर
  • आर्थिक अधिकारी
  • प्रत्यक्ष उत्पादन
  • हॉटेल्समधील सेवा (स्वच्छता, सामान उचलणे इत्यादी)

रोबोट आपल्या सेवेला
जपानमधील सासेबो येथील हेन-ना हॉटेलमध्ये 2016 पासून अनेक सेवा रोबोटद्वारे केल्या जात आहेत. पाहुण्यांचे स्वागत करणे, त्यांच्या बॅगा उचलणे, खोल्यांची स्वच्छता करणे आदी कामे रोबोट करतात. विशेष म्हणजे, रोबोट थेट अन्नपदार्थ बनविण्यातही सहभागी झालेले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार येत्या काळात तब्बल 90 टक्के कर्मचाऱयांची जागा रोबोट घेतील. सर्व रोबोट तीन भाषांमध्ये बोलू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com