शनी ग्रहाचे अंतरंग टिपण्यात 'कॅसिनी'ला यश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

शनी आणि त्यातील सर्वांत अंतर्गत कड्यांमधील अरुंद जागेतून बुधवारी कॅसिनी गेले. आतापर्यंत कोणतेही यान एवढ्या जवळ गेलेले नव्हते. कॅसिनीने बुधवारी ही कामगिरी केली.

केप कॅनव्हेरल (फ्लोरिडा) : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने पाठविलेल्या कॅसिनी या अंतराळयानाने शनी ग्रहाच्या पहिल्या विवरात यशस्वीपणे प्रवेश केला असून, गुरुवारी तेथून शनीची सर्वांत जवळून टिपलेली छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. 

शनीवर फिरणारे ढग, अतिशय मोठी वादळं आणि हवामानाची असाधारण अशी षटकोनी रचना यांची साक्ष देणारी छायाचित्रे 'कॅसिनी' या अंतराळयानातून पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत. 'कॅसिनी'च्या माध्यमातून गेल्या 13 वर्षांपासून शनी ग्रहाबाबत संशोधन करण्यात येत आहे. 

'कॅसिनी'चा हा शनीभोवतीचा अंतिम टप्पा आहे. शनी ग्रहाभोवती वर्तुळाकार कड्या आहेत. अवकाशात त्या अंगठीप्रमाणे दिसतात. शनी आणि त्यातील सर्वांत अंतर्गत कड्यांमधील अरुंद जागेतून बुधवारी कॅसिनी गेले. आतापर्यंत कोणतेही यान एवढ्या जवळ गेलेले नव्हते. कॅसिनीने बुधवारी ही कामगिरी केली. अशा प्रकारची कामगिरी 22 वेळा करण्याची योजना आहे. त्याद्वारे शनीवरील ढग आणि तेथील विवरे यांच्यातील अज्ञात भागावर रोबोटिक संशोधन करण्यात येणार आहे, 'नासा'ने सांगितले. 

'आपण धाडस केले तर आपली जिज्ञासा आपल्याला कोठे घेऊन जाऊ शकते हे दाखवून देत कॅसिनी यानाने एक नवी सुरवात केली आहे,' असे नासाच्या ग्रह विज्ञान विभागाचे प्रमुख जिम ग्रीन यांनी सांगितले.