सुटीच्या दिवशी जास्त झोपल्याने होतो हृदयविकार

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई : सुटीच्या दिवशी तुम्ही इतर दिवसांपेक्षा जास्त तास झोपता का? जर झोपत असाल तर ही सवय आजच मोडा, कारण सुटीच्या दिवशी जास्त झोपल्याने 'सोशल जेट लॅग' होण्याची शक्‍यता वाढते. आपल्या शरिराचे जैविक घड्याळ आणि अपल्या वास्तविक झोपेचे वेळापत्रक न जुळणे म्हणजे 'सोशल जेट लॅग' होय. 'सोशल जेट लॅग'चा थेट संबंध वाढत्या हृदयविकारांच्या धोक्‍यांशी आहे, असे शास्त्रज्ञांनी अनेकवेळा सांगितले आहे.

'सोशल जेट लॅग' मुळे आरोग्य खराब होणे, स्वभावात सतत वाईट बदल होणे, थकवा जाणवणे तसेच दिवसभर डोळ्यावर झोप येणे असे दुष्परिणाम होतात असा निर्ष्कष शास्त्रज्ञांनी काढला आहे. अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठाचे संशोधन सहाय्यक सीएरा बी फोरबुश यांनी सांगितल्याप्रमाणे झोपेची नियमितता व झोपेची वेळ आपल्या आरोग्याचे अविभाज्य घटक आहेत, त्यामुळे नियमित झोप हा हृदयविकारांवर आणि अजून अनेक रोगांवरचा अत्यंत प्रभावी, सहज व स्वस्त उपाय आहे.

निरोगी आरोग्यासाठी तरुणांनी नियमितपणे सात ते आठ तास झोप घेण्याची गरज आहे. या संशोधनात 'सोशल जेट लॅग' व्यतिरिक्त झोपच्या वेळा, निद्रानाश, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग, थकवा या विषयांचाही अभ्यास करण्यात आला.