"झिलॅंडिया' नावाचा नवा खंड शक्‍य 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मेलबर्न :  जवळपास भारतीय उपखंडाच्या आकाराइतकाच असलेला; मात्र प्रशांत महासागरात बुडालेला भूभाग हा नवा खंड म्हणून घोषित करण्याच्या योग्यतेचा आहे, असा दावा एका संशोधनानंतर करण्यात आला आहे. तब्बल 49 लाख किलोमीटरचा हा भूप्रदेश प्रशांत महासागराच्या नैर्ऋत्य भागात असून, खंडीय प्रतलापासून तो बनला आहे. 

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. या भागातील विविध बेटे, जमिनीचे तुकडे यांची खंड म्हणून एकत्र ओळख निर्माण करणेच भौगोलिकदृष्ट्या योग्य असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. समुद्रतळाशी असलेला हा भूभाग त्याच्या बाजूच्या प्रतलांपासून अधिक उंचीवर आहे. त्यावर वैविध्यपूर्ण सिलिकायुक्त खडक असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑस्ट्रेलिया खंडापासून वेगळा झाला असल्याने "झिलॅंडिया' हे नाव या प्रस्तावित खंडासाठी योग्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पूर्वी झालेल्या भूस्तर हालचाली आणि खंड एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेच्या काळात झालेल्या घडामोडींमुळे सध्या "झिलॅंडिया'चा 94 टक्के भाग पाण्याखाली आहे. या भागाचा खंड म्हणून अभ्यास केल्यास विविध भू हालचालींचा नव्या दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या खंडाचा पाच टक्के भाग हा प्राचीन गोंडवाना भागाला जोडलेला होता.