गणेशोत्सवासाठी पुणेरी पगड्यांची ‘क्रेझ’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नाशिक - गणेशाच्या आरतीत ‘हिरेजडित मुकुट शोभतो बरा...’ अशी ओवाळणी होते; पण आता हिरे भरजरी मुकुटाऐवजी पगड्यांना पसंती मिळत आहे. गणरायाच्या सजावटीत शिंदे घराण्यातील अन्‌ पेशवाई पगडीची ‘क्रेझ’ आहे. इकोफ्रेंडली उत्सवात  थर्माकोलच्या डेकोरेशनची जागा पर्यावरणपूरक कापडी आराशीने घेतली आहे.

नाशिकमध्ये कापडाच्या ओढण्या आणि झुंबराच्या आराशीची ‘धूम’ पाहायला मिळते. कापडी आराशीत गणपरायाचे रूप अधिक खुलून दिसत असल्याने यंदा बाजारात कॉटन आणि पॉलिस्टर कपडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. कापडी झुंबर-पडदे, छताची झालर, सुंदर ओढण्यांनी बाजारपेठ फुलली आहे. सोसायटी, कॉलनीतील मंडळांच्या कार्यक्रमांसाठी विविध आकाराचे फेटे आणि पगड्यांची मागणी वाढली आहे. 

मराठमोळा फेटा, पगड्या, जरीपटका अनेक रंगात उपलब्ध आहेत. कागदाचा लगदा आणि कापडाचा वापर केलेल्या पगड्या दोन ते तीन वर्षे टिकतात. भगवा, गुलाबी, लाल रंगाच्या पगड्यांना पसंती मिळत आहे. नाशिकमध्ये यंदा पुणेरी पगड्यांचे आकर्षण वाढले आहे. 

दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा फेटे, पगडीला मोठी मागणी आहे. मराठमोळे फेटे, जरीचे फेटे गणेशभक्त खरेदी करीत आहेत. पुणेरी फेटे, ढोलपथकाचे फेटे, शिंदेशाही आणि पेशवाई पगड्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये यंदा महाराष्ट्रीयन टच असलेली सजावट वैशिष्ट्यपूर्ण असेल.
- संजय जरीवाले, वेशभूषांचे विक्रेते