जिल्ह्यातील १७ गावांत टॅंकरद्वारे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

८५ विहिरी, २४ कूपनलिका अधिग्रहित; टंचाईची स्थिती बिकट

धुळे - वाढते तापमान आणि दिवसेंदिवस खोल जाणारी जलपातळी यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याचा प्रश्‍न बिकट होत आहे. सध्या जिल्ह्यातील १७ गावांत १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात सर्वाधिक ११ टॅंकर शिंदखेडा तालुक्‍यात, तर धुळे, साक्री तालुक्‍यांत प्रत्येक दोन टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी खासगी ८५ विहिरी आणि २४ कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याचे तापमान तीन आठवड्यांपासून सरासरी ४३ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठाही संपत आला आहे. काही प्रकल्पांत केवळ मृतसाठा शिल्लक आहे.

उन्हाची तीव्रता वाढतीच असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अशा गावांकडून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची मागणी होत आहे. अनेक गावांकडून पर्यायी योजनांची मागणी केली जात आहे. जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १७ गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी याच काळात टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी १० टॅंकरची मदत घेण्यात आली होती. निरनिराळ्या १७ गावांसाठी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांची मदत घेऊन तहान भागविली जात आहे. उन्हाची तीव्रता अशीच कायम राहिली, तर जिल्ह्यातील आणखी २३ गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यात सर्वाधिक नऊ गावे शिंदखेडा तालुक्‍यातील असतील, तर साक्री आणि धुळे तालुक्‍यातील प्रत्येकी सात गावांचा समावेश असेल. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी खासगी ८५ विहिरी आणि २४ कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक ४७ विहिरी शिंदखेडा तालुक्‍यातील आहेत, तर साक्री २७ व धुळे तालुक्‍यातील आठ तसेच शिरपूर तालुक्‍यातील दोन विहिरींचा समावेश आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एन. डी. पाटील यांनी दिली.

Web Title: 17 village water supply by tanker