जिल्हा बॅंकेला 24 कोटी नफा अन्‌ ठेवींतही मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

जळगाव - नोटाबंदी असतानाही गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा बॅंकेला सुमारे 24 कोटींचा नफा झाला आहे, तर ठेवींमध्ये 246 कोटींची वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे यांनी दिली.

जळगाव - नोटाबंदी असतानाही गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा बॅंकेला सुमारे 24 कोटींचा नफा झाला आहे, तर ठेवींमध्ये 246 कोटींची वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे यांनी दिली.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची सभा आज झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सभेतील कामकाजाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की संचालक मंडळाला आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. यात जिल्हा बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात 23 कोटी 86 लाख 32 हजारांचा नफा झाला. ठेवींमध्येही 246 कोटी सहा लाख 46 हजारांची वाढ झाली. भागभांडवलात सात कोटींची वाढ झाली. शेती पीककर्ज वसुली कमी झाल्याने "एनपीए' कर्जात वाढ झाली आहे. बॅंकेने 2016- 17 या हंगामात अल्पमुदतीचे 935 कोटींचे पीककर्ज वितरित केले आहे. 31 मार्च 17 अखेर बॅंकेचे एकूण कर्ज येणे 1803 कोटी 79 लाख आहे. 2017- 18 या हंगामासाठी बॅंकेने एक एप्रिल 2017 पासून अल्पमुदत पीककर्ज वितरण सुरू केले आहे. व्याजदरात मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेत वर्षअखेर पीककर्जाची 25.79 टक्के वसुली झाली आहे. बॅंकेचे नेटवर्थ 122 कोटी 37 लाख आहे.

योजनांवरील सरचार्ज माफ
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार तसेच इतर योजनांसाठी सरचार्ज शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे बॅंकेला सुमारे एक कोटी रुपये प्राप्त होत होते. मात्र, गरिबांच्या हिताच्या दृष्टीने आता या योजनांवरील सरचार्ज माफ करण्यात आला असून, आता तो बॅंक आकारणार नाही.

"मधुकर'ला कर्ज मंजूर
मधुकर सहकारी साखर कारखान्यातर्फे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीन कोटींची कर्ज मागणी करण्यात आली होती. त्या कर्जाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

शाखा बंदच्या पाहणीसाठी समिती
जिल्हा बॅंकेच्या 27 शाखा बंद करण्याचे आदेश आले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीने या शाखा बंद करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आता त्यांची पाहणी करण्यासाठी संचालकांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळ शाखांवर जाऊन त्याची पाहणी करतील. तेथे ठेवी कमी असतील, तर त्या भागातील नागरिकांना शाखा सुरू राहण्यासाठी ठेवी ठेवण्याचे आवाहन करण्यात येईल. ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करेल. त्यानंतर शाखांबाबत निर्णय घेण्यात येईल.

जिल्हा बॅंकेचे कार्य
* सर्व शाखा कोअर बॅंकिंग
* खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना किसान रुपे कार्ड वितरण
* बॅंकेतर्फे एनईएफटी, आरटीजीएस सुविधा
* कर्मचारी पगार खर्चात सहा कोटी 12 लाखांची घट
* छपाई खर्च 24 लाख 19 हजारांनी घटला
* बाहेरील कर्जावरील व्याजदरात 16 कोटी 97 लाखांनी घट
* व्यवस्थापन खर्चात 0.16 टक्के घट

Web Title: 24 crore profit district bank