वैद्यकीय महाविद्यालयासाठी नंदुरबारला सहाशे कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नंदुरबार - नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यामुळे नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय व जळगाव मेडिकल हबच्या कामाला ऑक्‍टोबरमध्ये प्रत्यक्षात सुरू होईल. येत्या 2018 मध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या पहिली बॅचसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी आज येथे दिली.

डॉ. शिनगारे म्हणाले, की 2012-13 मध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडला होता, त्याला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, महाविद्यालयाचे काम उत्कृष्ट व्हावे, त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून त्यांनी पीएमसी (स्वतंत्र कन्सल्टंट ) तज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, नंदुरबारसारख्या जिल्ह्यात 2 टक्के शुल्क घेऊन येण्यास तज्ज्ञ कन्सल्टंट येण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे तांत्रिक बाबींमुळे काम रखडले होते. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचीही या भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, येथील गोरगरीब जनतेला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरवात झाली आहे आणि मंजुरीचे अध्यादेश निघाले आहेत. या कामासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार आहे. त्यासाठी 25 एकर जागा उपलब्ध झाली आहे.

नंदुरबार व जळगाव मेडिकल हबमध्ये 2018 मध्ये पहिल्या मेडिकलच्या बॅचला प्रवेश दिला जाणार आहे. पहिली बॅच 100 विद्यार्थ्यांची राहील. त्यासाठी प्रथम वर्षाला एका महाविद्यालयात 40 तज्ज्ञ डॉक्‍टर्स लागतात. त्यात सध्या काही वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्‍टर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यांना किमान 10 वर्षे ती मिळणार नाही. त्या डॉक्‍टरांना नंदुरबार व जळगाव येथे पदोन्नतीने आणता येईल.

Web Title: 600 crore sanction for medical college in nandurbar