७/१२ संगणकीकरण करताना तलाठी घामाघूम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जळगाव तहसीलमधील प्रकार; ना पंखा ना लाइट

जळगाव - तालुक्‍यात ७/१२ संगणकीकरणाचे काम सत्तर टक्‍क्‍यांवर पोचले आहे. असे असले तरी महिनाभरापासून शहरातील ३२ तलाठी दिवसरात्र ७/१२ उताऱ्यांचे संगणकीकरण लवकर कसे होईल यासाठी चोवीस तास राबताहेत. भर उन्हाळ्यात हे कर्मचारी पंखा, कुलर शिवाय काम करत आहेत. 

जळगाव तहसीलमधील प्रकार; ना पंखा ना लाइट

जळगाव - तालुक्‍यात ७/१२ संगणकीकरणाचे काम सत्तर टक्‍क्‍यांवर पोचले आहे. असे असले तरी महिनाभरापासून शहरातील ३२ तलाठी दिवसरात्र ७/१२ उताऱ्यांचे संगणकीकरण लवकर कसे होईल यासाठी चोवीस तास राबताहेत. भर उन्हाळ्यात हे कर्मचारी पंखा, कुलर शिवाय काम करत आहेत. 

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी १५ एप्रिल ही ७/१२ संगणकीकरणाची अंतिम मुदत तलाठ्यांना दिली आहे. यामुळे सर्व कामे बाजूला टाकून सर्व तलाठी सकाळी आठपासून तहसील कार्यालयात येतात. आपापले संगणक सुरू करून ७/१२ संगणकीकरणाचे काम सुरू करतात. त्यांना पंखे, दिवे, पिण्याची पाण्याची सुविधा देणे तालुका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र सकाळी एकदा पाणी दिले की दिवसभर पाणी दिले जात नाही. एकाच हॉलमध्ये पंचवीस ते तीस तलाठी काम करतात. हॉलमध्ये कूलरची किंवा पंख्यांची व्यवस्था केलेली नाही. दुपारच्या वेळी तलाठी घामाघूम झालेले दिसत आहेत. 

महिलांच्या कक्षात दिवे नाही
दोन महिला तलाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत काम करतात. त्या कार्यालयात पंखा तर नाही, शिवाय ट्यूब लाइटही नाही. दिवसभर घामाघूम झाल्यानंतर संगणकावर काम करावेसे वाटत नाही. मात्र काय करणार दिलेल्या मुदतीत काम करून द्यावयाचे असल्याने काम करावेच लागते. रात्री अपूर्ण प्रकाश व्यवस्था असल्याने डोळ्यांवर ताण पडतो तो वेगळाच. 

किमान सुविधा तरी द्या...
जळगाव जिल्ह्याचे ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्वी अत्यल्प होते. आता चांगले मोडेम दिल्याने काम वेगाने होत आहे. पूर्वीपासूनच चांगले मोडेम दिले असते, तर मार्चअखेरपर्यंत सर्व काम पूर्ण झाले असते. हे काम करताना अनेकांना पाठी आणि त्वचेचे विकार जडले आहेत. संगणकावर काम करताना किमान पंखा, कूलरची व्यवस्था करावी, अशी मागणी सर्वच तलाठ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: 7/12 work by talathi