अंगाला साखळदंड व दोरखंड बांधून वेधले शासनाचे लक्ष

रोशन खैरनार
शनिवार, 25 मार्च 2017

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेत आवाज उठविणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी पक्षातील 19 आमदारांचे राज्य शासनाने दंडेलशाही, ठोकशाही व हुकुमशाहीच्या जोरावर राजकीय स्वार्थापोटी निलंबन केले.

सटाणा - राज्यातील शेतकऱ्यांची विनाविलंब कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत आवाज उठविणाऱ्या विरोधी पक्षातील आमदारांचे राजकीय स्वार्थापोटी केलेले निलंबन राज्य शासनाने तात्काळ मागे घ्यावे, या निषेधार्थ बागलाण तालुका इंदिरा कॉंग्रेस व बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी अंगाला साखळदंड व दोरखंड बांधून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आज सकाळी दहा वाजता येथील बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्गावरील वाहतुक अडवून केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरु केली. या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणुन गेला होता. शासनाच्या निषेधार्थ अंगाला साखळदंड व दोरखंड बांधून आंदोलनात सहभागी झालेले कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम हे प्रमुख आकर्षण होते. यावेळी बोलताना श्री.कदम म्हणाले, सत्तेवर आल्यापासून केंद्रातील मोदी व राज्यातील फडवणीस सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात भुमिका घेतलेली आहे. शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे राज्यात कधी नव्हे इतक्‍या शेतकरी आत्महत्या या दोन वर्षांच्या कार्यकाळात झाल्या. मात्र राज्य शासन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी वेळकाढुपणाचे धोरण राबवित आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेत आवाज उठविणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी पक्षातील 19 आमदारांचे राज्य शासनाने दंडेलशाही, ठोकशाही व हुकुमशाहीच्या जोरावर राजकीय स्वार्थापोटी निलंबन केले. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज.ल.पाटील म्हणाले, ई.व्ही.एम.मशिनमध्ये गडबड करून भाजपाने युपीसह इतर राज्यातील निवडणुकीत गैरमार्गाने सत्ता बळकावली. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही, बॅंकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. मंत्रालयात न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण केली जाते. राज्यातील डॉक्‍टर सुरक्षित नसून त्यांना न्याय मिळत नाही. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. एकुणच राज्यात सर्वच स्तरावर सरकार अपयशी ठरली असून मुख्यमंत्री फडवणीस फक्त आश्‍वासनांचे गाजर दाखवत खोटे बोलून जनतेची दिशाभुल करीत आहेत. शासनाने कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री.पाटील यांनी दिला.

तब्बल दोन तास सुरु असलेल्या आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वाहतुक दुतर्फा ठप्प झाली होती. नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना आंदोलकांतर्फे निवेदन देण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दिनकर सोनवणे, स्वराज्य प्रतिष्ठाणचे संस्थापक व नगरसेवक राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.गुलाबराव कापडणीस, कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख सिराज मुल्ला, सुनील पवार, मनोज ठोळे, मधुकर खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष देविदास सोनवणे, भगवान सोनवणे, नितीन पाटील, आबा खैरनार, बबलू रौंदळ, गौरव निकम, चंदक्रांत सोनवणे, सचिन साकला, ज्ञानेश्‍वर अहिरे, सुनिल चव्हाण, रामदास शेवाळे, नंदलाल गायकवाड, सुरेश कंकरेज, भास्कर पवार, दिनकर निकम, बबलू शेख आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: agitation for farmer loan waiver in Nashik