शिवसेनेमुळे खुर्ची टिकूनही मुख्यमंत्री काढताहेत औकात - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नाशिक - मूळ प्रश्‍नांकडून लक्ष विचलित करण्याचा भाजप-शिवसेनेचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेमुळे खुर्ची टिकून असतानाही मुख्यमंत्री काढत असलेली औकात जनता पाहत आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीवर टीकास्त्र सोडले.

नाशिक - मूळ प्रश्‍नांकडून लक्ष विचलित करण्याचा भाजप-शिवसेनेचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेमुळे खुर्ची टिकून असतानाही मुख्यमंत्री काढत असलेली औकात जनता पाहत आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीवर टीकास्त्र सोडले.

महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पवार नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या आधारे सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला हवे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. ठाणे महापालिकेसह हिंगोली जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीची कॉंग्रेससमवेत आघाडी झाली असून, नाशिकसह राज्यात इतरत्र आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माझी नांदेडमध्ये चर्चा झाली. पुणे महापालिकेबद्दल त्यांच्याशी बोललो आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधरसह नागपूर, अमरावतीमध्ये कॉंग्रेसला, तर औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी कॉंग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. कोकणमध्ये शेतकरी कामगार पक्षाला कॉंग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.''

'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे बोलायला हवे; पण अजूनही ते विरोधी पक्षात असल्यासारखे बोलतात. तरुणांना जात-धर्म अशा गोष्टी पटत नाहीत. त्यांना विकास हवा आहे. म्हणूनच आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गंभीर आरोप असलेल्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले, अशी टीका त्यांनी केली.