‘सालदारकी’ची परंपरा कालबाह्य होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

जळगाव - अक्षयतृतीयेला ‘सालदारकी’ ठरवायची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असली, तरी त्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांवर आले आहे. वाढलेली मजुरी, मजुरांचा रोजंदारीवर भर यांसारख्या कारणांमुळे ही परंपरा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. असे असले, तरी ‘आखाजी’ला ठरणाऱ्या ‘सालदारकी’चा दर यावेळी ७० हजारांपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जळगाव - अक्षयतृतीयेला ‘सालदारकी’ ठरवायची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असली, तरी त्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांवर आले आहे. वाढलेली मजुरी, मजुरांचा रोजंदारीवर भर यांसारख्या कारणांमुळे ही परंपरा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. असे असले, तरी ‘आखाजी’ला ठरणाऱ्या ‘सालदारकी’चा दर यावेळी ७० हजारांपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

खानदेशात ‘आखाजी’ अर्थात अक्षयतृतीयेचे आगळे महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही या सणाची वेगळी ओळख आहे. खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांत या दिवशी ‘सालदारकी’ ठरविण्याची पद्धत आहे. ‘सालदारकी’ म्हणजे शेतात काम करणाऱ्या सालदाराची वर्षभरातील मजुरी ठरविणे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले असले, तरी ‘सालदार’ लावण्याची पद्धत अद्याप कायम आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांत ‘सालदारकी’चे प्रमाण अवघ्या २०-२५ टक्‍क्‍यांवर येऊन ठेपले आहे.

अशी आहेत कारणे
शेतात मजुरी करायला कुणी तयार नाही. त्यामुळे मजुरांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागातही छोटे-मोठे व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. मजूर मिळत नसल्याने स्वाभाविक सालदारांच्या मजुरीत गेल्या काही वर्षांत चांगली वाढ झाली आहे. शंभर-दीडशे रुपये रोजावर कुणी काम करायला तयार नाही. मजुराचा रोज अडीचशे रुपये झाला आहे. त्या प्रमाणात वर्षभरातील मजुरी खूप होते, म्हणून ती शेतकऱ्यांनाही परवडणारी नसते. त्यापेक्षा रोजचे काम करून रोजंदारीनुसार मजुरी घेण्याकडे सालदारांची पसंती असते.

पावरा समाजबांधवांचे प्रमाण अधिक
पारंपरिक सालदारांचे प्रमाणही काही वर्षांत कमालीचे घटले आहे. त्याऐवजी आता आदिवासी पट्ट्यातील पावरा समाजबांधव शेतमजूर म्हणून शेतात राबताना दिसतात. मात्र, तेही ‘साल’ ठरवत नाहीत. काही ठिकाणी सहा महिन्यांची मजुरी ठरवून काम करून घेतले जाते. पावरा समाजबांधवांचा भरही रोजंदारीवरच असतो.

यंदा ७० हजारांपेक्षा अधिक ‘साल’
‘आखाजी’ला ‘सालदारकी’ची ‘बोली’ लावण्याची प्रथा नामशेष होत असली, तरी अजूनही या दिवशी ‘साल’ ठरविले जाते. गतवर्षी ६५ ते ७० हजार रुपये ‘साल’ होते. यंदा हीच रक्कम ७०-७५ हजारांवर जाईल, असा अंदाज आहे. ‘सालदारकी’साठी ‘बोली’ लावण्याची प्रथा तर जवळपास बंदच झाली आहे. सरत्या वर्षात जे सालदार राबायचे, तेच पुढे त्या शेतकऱ्याकडे काम करतात. परस्पर समन्वयातून मजुरी ठरविली जाते.