शिक्षक बदलीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कळमसरे येथील सात विद्यार्थिनी रुग्णालयात; आंदोलन चिघळले

कळमसरे (ता. अमळनेर) - येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिप्रिय शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द व्हावी, यासाठी आज विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. या दरम्यान सात विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर एकीस जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ‘पावरा सर परत या’ अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर दणाणून सोडला होता.

कळमसरे येथील सात विद्यार्थिनी रुग्णालयात; आंदोलन चिघळले

कळमसरे (ता. अमळनेर) - येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिप्रिय शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द व्हावी, यासाठी आज विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. या दरम्यान सात विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर एकीस जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ‘पावरा सर परत या’ अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर दणाणून सोडला होता.

शारदा विद्यालयाचे उपशिक्षक सुरेश पावरा व के. जे सोनवणे यांची त्याच संस्थेच्या किनोद (ता. जळगाव) येथील शाळेत बदली झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता, गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकून शालेय कामकाज बंद करत एकही शैक्षणिक तास होऊ दिला नव्हता. त्यावेळी शालेय प्रशासनाने संस्थेची सभा बोलावून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. 

या घटनेला आठ दिवस उलटूनही श्री. पावरा यांची बदली रद्द करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी आज पुन्हा आंदोलन केले. सकाळी साडेसहापासून शाळेतील सुमारे २५० विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास बसले. जो पर्यंत श्री. पावरा परत येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. ‘पावरा सर परत या’, ‘नको हुकूमशाही’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. पाडळसरे, खेडी व वासरे येथील विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढत शाळा व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. सकाळी शाळा सुरू होण्याअगोदरच विद्यार्थी प्रवेशद्वारावर बसल्यामुळे शालेय कामकाज बंद होते. संतप्त विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकत एकही तास होऊ दिला नाही. 

विद्यार्थिनी अस्वस्थ
या आंदोलनादरम्यान सकाळपासून घोषणा देणाऱ्या सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यात हर्षदा रणछोड पाटील (वय ११), नेहा मनोज चौधरी (१३), विद्या युवराज पाटील (१०), धनश्री विजय चौधरी (१३), मनीषा रणजितसिंग पाटील (१३), गायत्री हेमंत पाटील (१३), रुचिका प्रकाश कुंभार (१३) यांना भोवळ येऊन मळमळ होऊ लागली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यात हर्षदा रणछोड पाटील हिची प्रकृती जास्तच खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित सहा जणींना सायंकाळी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
 
सन २०१६-१७ संच मान्यतेत कळमसरे शाळेत २५ शिक्षक मंजूर असताना २७ शिक्षक कार्यरत आहेत, त्यामुळे दोन शिक्षक अतिरिक्त ठरत होते. याउलट संस्थेच्या किनोद शाळेत १८ शिक्षक मंजूर असताना १६ शिक्षक कार्यरत होते. यात एक प्रशिक्षित पदवीधर व दुसरा एचएससी डीएड अशा दोन शिक्षकांची पदे रिक्त होती. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने संस्था पातळीवर समायोजनासाठी १६ डिसेंबर २०१६ ला झालेल्या सभेत उपशिक्षक एस. एफ. पावरा, प्रशिक्षक पदवीधरमधून के. जे. सोनवणे यांची बदली करण्यात आली होती. त्यांचा पगार ते तिकडे घेत होते. मात्र विद्यार्थिप्रिय, शिस्तप्रिय शिक्षकांची बदली अचानक झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक झाला. 

एवढ्यावरही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची संस्था चालकांनीही काहीही दखल घेतलेली नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, तरी संस्थाचालकांनी मात्र साधी विचारपूसही केली नाही. याबद्दल पालकांसह ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. या विद्यार्थ्यांना वरिष्ठ पातळीवरून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

एस. एफ. पावरा यांची बदली संस्थेच्या प्रशासकीय नियमानुसार आहे. त्यांच्या जागी नव्याने कार्यक्षम असे शिक्षक नेमण्यात आलेले आहेत. विद्यार्थी आणि पालकांची मागणी गैर आहे. 
- पी. पी. पाटील, मुख्याध्यापक, शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे. 

विद्यार्थिप्रिय शिक्षक पावरा व सोनवणे यांची बदली हेतुपुरस्सर आणि अन्यायकारक आहे. यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. त्यांच्या बदल्या तत्काळ रद्द कराव्यात. 
- विजय चौधरी, पालक.

शाळेतून काढले दाखले
पालक व विद्यार्थ्यांचे आंदोलन जास्तच जोर धरत असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना पाचारण केले. मात्र, संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांचेही काही ऐकून घेतले नाही. पालकांनी मुख्याध्यापकांकडे मुलांचे दाखले मागण्यास सुरवात केली. दुपारपर्यंत २५ दाखले देण्यात आले. १०० ते १५० विद्यार्थ्यांचे दाखले असून, काही पालकांच्या स्वाक्षऱ्या बाकी राहिल्या आहेत. 

विद्यार्थी व पालकांच्या उपोषणाची चौकशी करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. ते चौकशी करून अहवाल सादर करतील. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी