पीकविमा उठला शेतकऱ्याच्या जिवावर; शेतकऱ्याला अर्धांगवायूचा झटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पीकविमा भरण्यासाठी रांगेत आसलेल्या रामा लक्ष्मण पोतरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : पीकविमा भरण्यासाठी दिवसभर रांगेत असलेले शेतकरी भीमराव नरके यांना अर्धांगवायूचा झटका आला. पैठण तालुक्‍यातील गोपेवाडी-आनंदपूर येथे बुधवारी (ता. दोन) ही घटना घडली. ते दिवसभर रांगेत होते. रात्री साडेआठ दरम्यान सेतू सुविधा केंद्रात विमा भरला त्यानंतर ते घरी येताच ही घटना घडली. त्यांच्यावर औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेडमधील भोकर तालुक्‍यातील दिवशी खुर्द येथे पीकविमा भरण्यासाठी रांगेत आसलेल्या रामा लक्ष्मण पोतरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पीकविम्याची रक्कम भरण्यासाठी मुदत कमी असल्याने शेतकऱ्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण झाली.

भीमराव नरके यांनी 2 ऑगस्टला पीकविमा भरला. त्यांना तासनतास पैठणच्या सेतू कार्यालयात उभे राहावे लागले. रात्री साडेआठला काम झाल्यानंतर त्यांची सुटका झाली. घरी परतल्यानंतर रात्री दहा वाजता त्यांना झटका आला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान त्यांना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: aurangabad news crop insurance pmfby

टॅग्स