कोरडवाहूमधील बाजरी हमीभावापासून कोरडी

कोरडवाहूमधील बाजरी हमीभावापासून कोरडी

25 टक्‍क्‍यांनी भाव कमी; शेतकऱ्यांचे 3 हजार कोटींचे नुकसान
नाशिक - जागतिक बाजरी उत्पादनात भारताचा 42 टक्के वाटा असून, हे पीक प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. धान्याबरोबर जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे कल असला, तरीही दिवसेंदिवस बाजरीच्या क्षेत्रात घट होत चाललीय; पण त्याचवेळी सरकारच्या हमीभावापासून हे पीक कोरडे राहिले आहे.

गेल्यावर्षी क्विंटलला 1 हजार 425 रुपये या हमीभावापेक्षा 25 टक्‍क्‍यांनी कमी भाव मिळाल्याने देशातील शेतकऱ्यांचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले.

देशातील बाजरी उत्पादनाची स्थिती पाहिली असता, चढ-उताराचे चित्र पाहायला मिळते. 2009-10 मध्ये देशातील नीचांकी 65 लाख टनाचे उत्पादन बाजरीचे झाले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी हे उत्पादन 103 लाख टनांपर्यंत पोचले. 2011-12 मध्ये 102 लाख टन उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. पुढच्या वर्षात पुन्हा उत्पादनात घसरण झाली. 2013-14 मध्ये 92 लाख, 2014-15 मध्ये 91 लाख, 2015-16 मध्ये 80 लाख टन अशी उत्पादनातील घसरण कायम राहिली. 2016-17 मध्ये 97 लाख टन उत्पादन झाले खरे; पण गेल्यावर्षी पुन्हा उत्पादनात 7 लाख टनाने घट झाली. यंदा पुन्हा पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात देशात 27 लाख 30 हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली असून, ती 41 टक्‍क्‍यांनी कमी आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या बाजरीचे क्षेत्र देशात आणि महाराष्ट्रात गेल्यावर्षी इतके तरी राहील की नाही याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह सद्यःस्थितीत कायम आहे.

बाजारपेठांमधील बाजरीचा भाव (क्विंटलला रुपयांमध्ये)
राहता- 1 हजार 100 जालना- 1 हजार 200
औरंगाबाद- 1 हजार 295 बीड- 1 हजार 200
वैजापूर- 1 हजार 300 देवळा- 1 हजार 290
धुळे- 1 हजार 340 लासलगाव- 1 हजार 351
जामनगर- 1 हजार 95 गुलबर्गा- 1 हजार 250
आबूरोड- 1 हजार 350 आग्रा- 1 हजार 150

'देशातील बाजारपेठेत ऑक्‍टोबर ते सप्टेंबर या कालावधीत बाजरीची मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली नाही. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या 90 लाख टन बाजरीच्या विक्रीतून हमीभावाएवढा भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होते.''
- दीपक चव्हाण (शेती अभ्यासक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com