व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान हवे - स्वप्नील पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

चोपडा - अनेक व्यक्‍ती बॅंकांमध्ये कर्ज मागणीसाठी येतात. मात्र, कोणत्या योजनेकडून कर्ज पाहिजे, त्या योजनेचे नावही माहीत नसते. कर्ज घेणारा ग्राहक येतो. मात्र, कोणत्या व्यवसायावर कर्ज घेणार आहे, याचे नावही सांगता येत नाही. यासाठी आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे, त्या व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी केले. 

चोपडा - अनेक व्यक्‍ती बॅंकांमध्ये कर्ज मागणीसाठी येतात. मात्र, कोणत्या योजनेकडून कर्ज पाहिजे, त्या योजनेचे नावही माहीत नसते. कर्ज घेणारा ग्राहक येतो. मात्र, कोणत्या व्यवसायावर कर्ज घेणार आहे, याचे नावही सांगता येत नाही. यासाठी आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे, त्या व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी केले. 

व्यापारी महामंडळ व महसूल विभागातर्फे घेण्यात आलेल्या "मुद्रा लोन' मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृत सचदेव, एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापक मनोहर तिवारी, आयडीबीआय बॅंकेचे व्यवस्थापक विजय वंधारे, कॅनरा बॅंकेचे व्यवस्थापक शंतनू भार्गवे, व्यापारी महामंडळाचे सचिव जैन आदी उपस्थित होते. 

व्यवस्थापक पाटील म्हणाले, की "मुद्रा' म्हणजे काय, हे कुणालाच माहीत नाही. एप्रिलमध्ये अर्थसंकल्पात सूक्ष्म उद्योग व व्यवसायांना प्रगती करण्यासाठी "मुद्रा लोन' योजना सुरू करण्यात आली. यात माणसाचे वयोमानानुसार तीन प्रकारचे कर्ज देण्यात येते. "शिशू लोन'साठी पन्नास हजार, "किशोर लोन'साठी पन्नास हजार ते पाच लाख, "तरुण लोन'साठी पाच लाख ते दहा लाख आहे. यासाठी काही मोजक्‍या कागदपत्रांची आवश्‍यकता असते. 

एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापक तिवारी म्हणाले, की कर्ज घेताना सकारात्मक विचार ठेवा. "मुद्रा लोन'ची हमी शासनाने घेतली असल्याने ते घेताना कोणत्याही जामीनदाराची गरज नाही. कर्जाची रक्कम फक्‍त व्यवसायालाच लावल्यास निश्‍चित नफा होतो. आपल्या क्षेत्रात ठरवून दिलेल्या बॅंकेतूनच कर्जाची मागणी करावी. 

यावेळी विनोद पाटील (वेले), राकेश पाटील (लासूर), केबल व्यावसायिक दीपक अजय जैन (चोपडा) यांच्यासह व्यापारी, महिला बचत गट आदींच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकांना "मुद्रा लोन'बाबत अडचणी विचारल्या. यावर कॅनरा बॅंकेचे व्यवस्थापक शंतनू भार्गवे यांनी अडचणी सोडविल्या. नायब तहसीलदार पेंढारकर यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाविषयी नाराजी 
शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृत सचदेव यांनी तर या बॅंकेला कुणाचीही गरज नाही. ग्राहकांना अजिबात सहकार्य केले जात नाही. सर्वांत जास्त उदासीनता असलेली ही बॅंक असल्याचे मेळाव्यात स्पष्ट केले. 

Web Title: basic knowledge of business