कर्जमाफीसाठी भुसावळला शेतकऱ्यांचे मुंडन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

भुसावळ येथे पेरणीपूर्व सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोग "जैसे थे' स्विकारावा यासह अन्य मागण्यांसाठी आज (बुधवार) भुसावळ तालुका शेतकरी संघर्ष चळवळीतर्फे प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

जळगाव - भुसावळ येथे पेरणीपूर्व सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोग "जैसे थे' स्विकारावा यासह अन्य मागण्यांसाठी आज (बुधवार) भुसावळ तालुका शेतकरी संघर्ष चळवळीतर्फे प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. आंदोलनात शेतकऱ्यांनी सुरवातीला मुंडन करुन रस्त्यावर कांदे फेकून दुध ओतले. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना शंभर शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले. शहर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भुसावळ तालुका शेतकरी संघर्ष चळवळीच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी कुऱ्हा, तळवेल, आचेगाव, वेल्हाळा आदी गावातील शेतकरी सहभागी झाले होते. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या तीन वर्षातील पर्यावरणाचा ढासळता समतोल, नैसर्गिक आपत्ती, वेळोवेळी बदलते शासकीय धोरणे, वाढती महागाई आणि तुलनेने शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेती आणि शेतकरी दोघे नुकसानात गेले आहेत. सोसायट्यांच्या पीक कर्जामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. आंदोलनात सोपान भारंबे, ज्ञानेश्‍वर आमले, अनिल महाजन, माजी सभापती राजेंद्र चौधरी, नारायण पाचपांडे, दिलीप फालक, दीपक भोळे, अनिल महाजन, जितेंद्र चोपडे, राजेंद्र भारंबे, सोपान नेहेते, शांताराम सरोदे, सुरेश महाजन, संग्रामसिंग पाटील, गजानन सरोदे, भागवत भारंबे, विलास फालक, मुरलीधर धांडे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.