थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ मोहीम  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सटाणा - येथील पालिकेचे विविध कर थकविणाऱ्या शहरातील मालमत्ताधारकांच्या विरोधात पालिका प्रशासनाने कठोर भूमिका अवलंबवली असून, थकीत मालमत्ताधारकांच्या नावांच्या यादीचे डिजिटल फलक चौकाचौकांत लावण्यात आल्यानंतर थकबाकीदारांच्या घरांसमोर आजपासून ढोल-ताशे वाजविण्याची मोहीम सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सुटीच्या दिवशीही पालिका कार्यालयात रांगा लावून थकबाकी भरली जात आहे. 

सटाणा शहरात नागरिकांकडे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच व्यापारी संकुल व प्लॉटधारकांकडे विविध प्रकारच्या करांची थकबाकी आहे. कर भरण्यासाठी वारंवार तगादा लावूनही काही थकबाकीदार वर्षानुवर्षे कर भरत नसल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे. शासनाच्या आदेशानुसार करवसुलीसाठी पालिका प्रशासनाने यंदा करवसुलीसाठी अधिक सक्तीने कार्यवाही सुरू केली असून, पोलिस बंदोबस्तात मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी व सर्व विभागप्रमुख विशेष वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना नोटिसा बजावून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. काही थकबाकीदार तर दादच देत नसल्याने करवसुलीसाठी प्रशासनाने थकबाकीदारांच्या नावांचे मोठे डिजिटल फलक चौकाचौकांत लावले आहे. आजपासून थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल-ताशे वाजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत थकबाकीदारांनी आपल्या थकीत करांचा भरणा न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिला. 

ठराविक करवसुली झाली नाही, तर संबंधित पालिकेला निधी बंद करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने राज्यातील पालिकांकडून अशा स्वरूपाची कारवाई सुरू आहे. लोकप्रतिनिधींना यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नसल्याने शहरातील थकबाकीदारांनी प्रशासनास सहकार्य करून शहरविकासात हातभार लावावा. - सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा

शासनाने राज्यातील पालिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व शहरात मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट्य दिले आहे. करवसुलीसाठी सक्तीने कारवाई करण्याचे आदेश देतानाच यामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 
- हेमलता डगळे, मुख्याधिकारी, सटाणा

Web Title: Campaign play drums defaulters in front of the house