'सीईटी' अर्जासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा विभागामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी, बी.टेक., डी.फार्म. या पदवी अभ्यासक्रमांच्या "सीईटी- 2017' साठी अर्ज भरण्यास सोमवारपर्यंत (ता. 10) मुदतवाढ दिली आहे.

नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा विभागामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी, बी.टेक., डी.फार्म. या पदवी अभ्यासक्रमांच्या "सीईटी- 2017' साठी अर्ज भरण्यास सोमवारपर्यंत (ता. 10) मुदतवाढ दिली आहे.

राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा विभागामार्फत "एमएचटी- सीईटी- 2017' परीक्षा होणार आहे. बारावी विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार होता. अर्ज भरण्यासाठी 14 फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. यानंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत दिली होती. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. इच्छुक विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर सोमवार (ता. 10) दुपारी तीनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सोळाशे, तर राखीव प्रवर्गासाठी बाराशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. विविध कोट्यांतून प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, ऑनलाइन अर्जात छायाचित्र व सहीची फोटोकॉपी स्कॅन करून अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी गुणवत्ता तपासणी विभागामार्फत करण्यात आली आहे. यात छायाचित्र, सहीच्या कॉपीच्या गुणवत्ता व्यवस्थित नसलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल, मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला आहे. याद्वारे नव्याने छायाचित्र, सही अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.