भाजपला सत्ता राखण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता आहे. त्यातच भाजपकडेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. या वेळी केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने भाजपला आपल्याकडे जिल्हा परिषदेचे वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता आहे. त्यातच भाजपकडेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. या वेळी केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने भाजपला आपल्याकडे जिल्हा परिषदेचे वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

जळगाव जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचे वर्चस्व होते; परंतु गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजप व शिवसेना स्वतंत्र लढतात; परंतु निवडून आल्यानंतर सत्तेसाठी दोन्ही पक्षांची युती होते. भाजपचे सदस्य जास्त असल्याने त्यांच्याकडेच हे अध्यक्षपद गेले आहे. आता केंद्रात व राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे भाजपलाच आपल्या ताब्यात जिल्हा परिषद ठेवण्याचे आव्हान आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. खडसे नाराज असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्रिपद महाजन यांना न देता आता ऐन निवडणुकीच्या काळात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळविले आहे. सात नगरपालिकांवर अध्यक्षपद मिळवून क्रमांक एकचा पक्ष म्हणून जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. खडसे व महाजनांच्या वादाचा मध्यस्थ म्हणून कार्य करून चंद्रकांत पाटील भाजपकडे सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मित्रपक्ष शिवसेनेशी युती होण्याची शक्‍यता कमीच आहे.

शिवसेनेनेही जोरात तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील उपनेते गुलाबराव पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद मिळाल्यामुळे या वेळी जिल्हा परिषदेत यश मिळविण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली, त्यामुळे ते तयारीला लागले आहेत. नोटाबंदीमुळे झालेल्या परिस्थितीचा, तसेच गेल्या पंधरा वर्षांत युतीच्या सत्तेच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात न झालेल्या विकासावर आसूड ओढून सत्ता मिळविण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करीत आहेत. दोन्ही पक्षांची आघाडी होणेही कठीणच दिसत आहे. एकंदरीत, जिल्हा परिषदेत 68 जागांपैकी भाजपकडे 25, शिवसेना 13, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20 आणि कॉंग्रेस 10 असे पक्षीय बलाबल आहे. आता 67 जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेला भाजप आपला गड कायम राखणार काय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला यश
पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती भाजपला फायद्याची
खडसे - महाजन वाद शमविण्यास पाटील दुवा
गुलाबराव पाटलांना मंत्रिपद मिळाल्यामुळे शिवनेचेही आव्हान
कॉंग्रेस, राष्ट्रवादीची ताकद कमकुवत
नोटाबंदीच्या परिणामांमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीला आशा