महापालिकेत पहिल्या दिवशी 15 लाखांच्या कराचा भरणा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

धुळे  - मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती माफीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी 15 लाख रुपये कर भरणा झाला. गेल्या वर्षीही पहिल्या दिवशी साधारण अशीच स्थिती होती. सहा मार्चपर्यंत शास्तीवर 50 टक्के सूट आहे. दरम्यान, मालमत्ताधारकांची कर भरण्यासाठी महापालिकेत गर्दी झाली होती. 

मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्याची मागणी झाल्यानंतर आयुक्त संगीता धायगुडे यांनी दोन टप्प्यांत शास्ती माफीचा निर्णय जाहीर केला. 27 फेब्रुवारी ते पाच मार्चदरम्यान शास्तीवर 50 टक्के, तर 6 मार्च ते 20 मार्चदरम्यान 25 टक्के सूट देण्यात आली आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. शास्तीवर सूट दिल्याने महापालिकेत थकबाकीदारांची मोठी गर्दी उसळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे चित्र पाहायला मिळाले नाही. 

15 लाखांचा भरणा 
शास्तीवर 50 टक्के सूट देण्यास आजपासून सुरवात झाली. आज पहिल्या दिवशी सात लाख 55 हजार 533 रुपये रोख, पाच लाख 59 हजार 515 धनादेशाने आणि एटीएम, डेबिट कार्डच्या माध्यमातून एक लाख 81 हजार 738 असा एकूण 14 लाख 96 हजार 786 रुपयांचा कर भरणा झाला. महापालिकेतील एचडीएफसी बॅंकेच्या काउंटरवर रोकड व धनादेश स्वीकारण्याची सुविधा होती, तर पीओएस मशिनवर एटीएम, डेबिट कार्डद्वारे कर अदा करण्याची सुविधा मालमत्ता कर विभागात होती. शास्तीवर 50 टक्के सूट पाच मार्चपर्यंत, तर 6 ते 20 मार्चदरम्यान 25 टक्के सूट आहे. गेल्या वर्षी शास्ती माफी दिल्यानंतर पहिल्या दिवशी अर्थात 16 फेब्रुवारीला 14 लाख 56 हजार रुपये कर भरणा झाला होता. यंदा 14 लाख 96 हजार 786 रुपयांचा भरणा झाला आहे.