लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

नाशिक - मुंबई- नाशिक महामार्गावर पिस्तूलचा धाक दाखवून चारचाकी वाहनासह एकाची लुटमार केल्याची घटना घडल्यानंतर नाशिक ग्रामीणच्या पोलिस पथकाने दोन संशयितांना नगर जिल्ह्यातून पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या मोटारीसह मोबाईल जप्त केला. मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात लसणाचा ट्रक लुटल्याचीही कबुली या संशयितांना दिली. त्यामुळे आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

महेंद्र साबळे (रा. सातपूर, नाशिक) हे नऊ एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास मोटारीने मुंबईहून नाशिकला येत होते. कल्याण- भिंवडी बायपास येथे चार युवक नाशिककडे येण्यासाठी साबळे यांच्या मोटारीमध्ये बसले. घोटी सिन्नर फाटा येथे एका संशयिताने साबळे यांना पिस्तूलचा धाक दाखवून मोटार थांबविली. साबळे यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम दोन हजार 800 रुपये काढून घेतले. त्यांनी साबळे यांना संगमनेर येथे सोडून मोटारीसह पोबारा केला होता. याप्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक संशयितांच्या मागावर गेले असता, नगर जिल्ह्यातील वेहळगाव या ठिकाणी त्यांनी संशयित राकेश राजेंद्र संसारे (21, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), रजनीकांत संजय गरुड (21, रा. नागापूर एमआयडीसी, नगर) यांना अटक केली.

Web Title: crime in nashik