रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेविरुद्ध ठेवीदारांचा मोर्चा

raysoni
raysoni

सटाणा - जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था ठेवीदारांच्या रक्कमा देण्यास सातत्याने टाळाटाळ करीत आहे. एकीकडे पतसंस्थेचे प्रशासक थकीत कर्जदारांकडून संपूर्ण व्याजासहित वसुली करत आहे. मात्र ठेवीदारांना ठेवींवरील व्याज न देता १०० टक्के परताव्याची पावती देऊन प्रत्यक्षात २० टक्के रक्कमेचाच परतावा दिला जात आहे. ठेवीदारांवर होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडून हक्काचा पैसा परत मिळविण्यासाठी येत्या ३१ मे रोजी जळगाव येथे आयोजित 'आक्रोश मोर्चा'मध्ये राज्यातील पतसंस्थेच्या सर्व ठेवीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरा यांनी काल रविवार (ता.२०) रोजी येथे केले. 

येथील राजस्थानी मंगल कार्यालयात आज दुपारी पतसंस्थेच्या राज्यातील ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. मंडोरा बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष सुधाकर पाटील, धनसिंग वाघ, पन्नालाल भांगडिया, राजकुमार सोनी, योगेश मोगरे, भास्कर शिरसाठ, कैलास मालपाणी आदी उपस्थित होते.

श्री. मंडोरा म्हणाले, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेत (बीएचआर) राज्यातील सर्वसामान्य ठेवीदारांच्या ७०० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मुदती संपल्यानंतरही त्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रायसोनी सोसायटीचा विकास व विस्तार पाहून ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने आपल्या ठेवी या बँकेत ठेवल्या. परंतु काही दिवसातच या सोसायटीतील गैरप्रकार उघडकीस आले. त्यामुळे सर्व ठेवीदार ठेवी परत मागत आहेत. काही ठेवीदारांच्या मुलामुलींचे लग्न ठरले आहे. मात्र, ठेवी परत मिळत नसल्यामुळे ते होऊ शकलेले नाहीत. काहींना आजारपणासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र त्यांनाही उपचारासाठी स्वत:चा पैसा मिळू शकलेला नाही. 

शाखा सुरु होत्या तेव्हा ठेवीदार शाखेत जाऊन संपर्कात होते. त्यानंतर संचालक मंडळाने हळू हळू राज्यातील सर्वच शाखांना कुलूप लावून संबंधित शाखांचे दप्तर, संगणक आदी वस्तू जळगाव शाखेत घेऊन आले. त्यामुळे ठेवीदार वारंवार जळगाव येथे येऊ शकत नाही. सोसायटीतर्फे वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही पैसे देण्यात आलेले नाहीत. जळगाव शाखेत जितेंद्र कंडारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र २ ते ३ वेळा निवेदने देऊनही प्रशासकांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नसल्याने सर्व ठेवीदार वैतागले आहेत. त्यामुळे सर्व ठेवीदारांनी ता.३१ मे रोजी थेट जळगाव येथे आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही श्री. मंडोरा यांनी केले. 

अशोक पगारे, अरुणा पाटील, माधव पाटील, चित्रा बधान, शांताबाई खैरनार, निर्मला मालपाणी, नरहर जाधव, श्रद्धा कदम, अरुणा सोनवणे, विनायक बोरसे, शागीर मन्सुरी, संतोष कदम, सोपान दुसाने, पुष्पा अहिरराव, धनंजय पंडित, रमेश सोनवणे, आशा पवार आदींसह सटाणा, नामपूर, चांदवड, मालेगाव, कळवण, देवळा, मनमाड, येवला व नाशिकचे ठेवीदार बहुसंख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com