नियोजनाच्या अभावामुळे दुसऱ्या दिवशी गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

देवळालीगाव - विज्ञानरूपी ज्ञानाचा अभूतपूर्व खजिना घेऊन नाशिक रोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या विज्ञान एक्‍स्प्रेसमधील प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. २५) झालेली प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रदर्शन न पाहताच परतावे लागले. यामुळे मोठा उत्साह, आनंद मनात घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या सर्व परिस्थितीमुळे दुसरा दिवस गोंधळाचाच ठरला.

पहिल्याच दिवशी सायंकाळी पाचपर्यंत शहरातील तब्बल साठ शाळांतील विद्यार्थ्यांसह परिसरातील असंख्य नागरिकांनी भेट देऊन प्रचंड प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशीही शहरासह जिल्हाभरातून प्रचंड संख्येने विद्यार्थी सकाळपासून आले होते. 

विज्ञान एक्‍स्प्रेसच्या देशभरातील वेळापत्रकानुसार गाडी नाशिक रोड रेल्वेस्थानकात २४ जुलै ते २६जुलै (तीन दिवस) यादरम्यान थांबणार होती; परंतु नंतर गाडीतील व्यवस्थापकांनी ही गाडी केवळ दोनच दिवस थांबणार असून, एक दिवस धुळे स्थानकाकडे पाठविली जाणार असल्याची माहिती ऐनवेळी कळविली. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी ताण वाढला. या गाडीचा शेवटचा दिवस असल्याने आज जिल्हाभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. नाशिक रोड रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक चार या ठिकाणी पोलिसांनी पुन्हा एकेरी वाहतूक सुरू केल्याने विज्ञान एक्‍स्प्रेसकडे जाताना कसरत करूनच चालावे लागले. वाढलेल्या गर्दीला प्रशासनाला हाताळता आले नाही. त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. धावतपळतच प्रदर्शन ओझरते पाहावे लागले. प्रदर्शन व्यवस्थित समजून घेता न आल्याने विद्यार्थी नाराज झाले.

नियोजनशून्य कारभारामुळे आज प्रदर्शन चांगले पाहता आले नाही. कुठलीही गोष्ट नीट समजून घेता आली नाही. बहुतेक ठिकाणी समजून सांगितलेही नाही. केवळ धावपळ करत पुढे पळावे लागले.  
- अरुण जगताप, नाशिक

दुपारपासून आमच्या शाळेच्या मुलांनी रांगा लावल्या होत्या. परंतु सायंकाळपर्यंत ताटकळूनही हाती काहीच लागले नाही. प्रदर्शन न पाहता रिकाम्या हाती परतावे लागल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
- गणेश जाधव, लासलगाव

एक दिवस पळविला धुळ्याने
विज्ञान एक्‍स्प्रेस उद्या (ता. २६) धुळे रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार असल्याने सकाळी दहा ते सायंकाळी पाच यादरम्यानची वेळ अपुरी पडत असल्याने अनेकांना प्रदर्शनाला मुकावे लागणार आहे. शिवाय गर्दीमुळे अगोदरच विज्ञान गाडीचा किड्‌स झोन बोगी बंद असल्याने खास लहान बालकांना तसेच प्राथमिक शाळेतील मुलांना रेल्वेस्थानकात येऊनही विज्ञानाची जादू व त्यातील मनोरंजनापासून मुकावे लागल्याची खंत अनेकांच्या चेहऱ्यावर दिसली.