अंदाजपत्रकासाठी वरिष्ठांचीच कसरत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

धुळे - महापालिकेचे 2016-17 चे सुधारित आणि 2017-18 चे चालू अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच आता कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. विभागप्रमुखांकडून जमा-खर्चाचा ताळमेळ येत नसल्याने वारंवार पत्रव्यवहार, बैठका घ्याव्या लागत आहेत. 

महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी 15 फेब्रुवारीलाच प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना उलटल्यानंतरही अंदाजपत्रकाचा ताळमेळ बसलेला नाही. नोटाबंदीनंतर जमा रकमेचा ताळमेळ जुळविताना विभागप्रमुखांच्या नाकी नऊ आले आहेत. हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून समजते. मुख्य लेखापरीक्षकांनीही वस्तुनिष्ठ अंदाजपत्रकासाठी जमा-खर्चाचा ताळमेळ व विभागासाठीची आर्थिक गरज याची काटेकोर माहिती सादर करावी, अशा सूचना विभागप्रमुखांना यापूर्वीच दिल्या आहेत. पत्रव्यवहारासह विभागप्रमुखांची त्यांनी बैठकही घेतली. 

आज पुन्हा बैठक 
अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने आयुक्त संगीता धायगुडे यांनी आज पुन्हा विभागप्रमुखांची बैठक घेतली. आपापल्या विभागाचा वस्तुनिष्ठ जमा-खर्च सादर करा, फुगविलेली आकडेवारी सादर करू नका, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्याचे समजते. अशी माहिती देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिल्याचेही समजते. एकूणच अंदाजपत्रकासाठी विभागप्रमुखांकडून व्यवस्थित माहिती येत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच आता कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: dhule municipal corporation budget