आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचा शंखनाद

एल. बी. चौधरी
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

आगामी ग्रामपंचायत व पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त येथील सोमेश्वर मंदिर प्रांगणात सोनगीर, नगाव, लामकानी, कापडणे गटातील भाजप तसेच माजी आमदार (कै.) द.वा. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी भदाणे होते.

सोनगीर (जि. धुळे) : धुळे तालुक्यातील 35 गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार आज झालेल्या तालुक्यातील चार गटांच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यातून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप सर्व प्रथम मैदानात उतरली असून शंखनाद केला आहे. कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन भाजपचे मनोहर भदाणे यांनी केले.  

आगामी ग्रामपंचायत व पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त येथील सोमेश्वर मंदिर प्रांगणात सोनगीर, नगाव, लामकानी, कापडणे गटातील भाजप तसेच माजी आमदार (कै.) द.वा. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी भदाणे होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राम भदाणे, बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ए. के. कासार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आधार माळी, बुरझडचे माजी सरपंच जगन्नाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, किसान सेलचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष आर. के. माळी, जिल्हा परिषद सदस्य शामलाल मोरे, वैद्यकीय आघाडीचे डॉ.अजय सोनवणे, डॉ. युवराज नवटे, माजी सरपंच दंगल धनगर, नेहरु युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रविराज माळी, शहराध्यक्ष साहेबराव बिरारी, श्याम माळी आदी उपस्थित होते. 

केंद्रात व राज्यात भाजप सरकार मात्र स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असल्याने ते काहीच काम करु शकत नाही. फक्त भूलथापा देण्याचे काम करतात. त्यामुळे मतदारसंघाचा पाणी, आरोग्य व सिंचन योजनेचा विकास झाला नाही. त्यांचा राजकीय अभ्यास नाही. केवळ पैशांच्या जोरावर निवडून आले. चुकीच्या हाती सत्ता दिल्याने सोनगीरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात घ्या. असे आवाहन मनोहर भदाणे यांनी केले. 

भाजयुमोचे अध्यक्ष राम भदाणे म्हणाले की कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत केल्यास ते आपल्या पक्षाला मतदान करतील. प्रत्येक गावात अनेक कार्यकर्ते आहेत. सर्वांना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होता येणार नाही. म्हणून कुठेही बंडखोरी, भानगडी न करता योग्य उमेदवाराच्या पाठीशी सगळी शक्ती उभी करू. व इतरांना सरपंच, विविध कार्यकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य आदी जागांवर सामावून घेतले जाईल. तालुक्यात काहींनी खुनशी राजकारण केले. कार्यकर्त्यात भांडणे लावली. त्यामुळे विकास खुंटला. 

भाजप शासनाने लोकनियुक्त सरपंच निवड जाहीर केली. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात सरपंचला कामे करणे भाग पडेल. आपल्या विरोधी सदस्यांच्या वॉर्डात कामे न करण्याचे खुनशी व गलिच्छ राजकारण संपणार आहे. मात्र कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. संतोष पाटील यांनी प्रास्ताविक करून सुत्रसंचलन केले.